क्रीडा व मनोरंजन

आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उंचावलेले खेळाडू संकेत सरगर, नितीन मदने यांना तात्काळ नियुक्ती द्या जयंत पाटील यांची मागणी

Spread the love

जयंत पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या नोकऱ्यांबाबत लक्षवेधी..

मुंबई,दि.३ मार्च – आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नाव उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकार नोकरीमध्ये घेत नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर याने कॉमनवेल्थ गेम्स, २०२२ या स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पुरुष ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून दिले आहे. तसेच नितीन मदने याने एशियाटिक स्पर्धेत कबड्डीपटू म्हणून सहभागी होत गोल्ड मेडल पटकावले. ३० एप्रिल, २००५ नुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दि. १ मे,२०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर शासन सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत. या शासन निर्णयातील वर्ग १ पदासाठी आवश्यक असलेले निकष या खेळाडूंनी पूर्ण केलेले असल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविणाऱ्या बहुतांश खेळाडूंना नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूंना थेट ‘वर्ग ‘अ’ नियुक्ती देण्याचा शासन आदेश असूनही त्याकडे प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. खेळासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यानंतरही खेळाडूंची शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे. वयोमर्यादा संपल्यानंतर अर्थात म्हतारे झाल्यानंतर शासकीय नोकरी मिळणार का ? असा टाहो पात्र खेळाडूंकडून फोडला जात आहे. वारंवार चांगली कामगिरी करूनही, तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त करूनही असंख्य खेळाडू शासकीय नोकऱ्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा असे जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!