निष्ठेने जबाबदारी घेवून काम केल्याने आत्मविश्वास वाढतो. – प्रसिध्द वक्ते विठ्ठल कोतेकर.

शिराळा प्रतिनिधी
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक अमोल पाटील होते.श्री. कोतेकर म्हणाले, प्रत्येक गोष्टीची प्रगती अथवा वाढ व्हावी, ही प्रत्येकाची मानसिकता असते. मग तो व्यवसाय, उद्योग, नोकरी, शेती अथवा आपली वा आपल्या कुटुंबाची प्रगती. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रगतीसाठी झटतो. हे सर्व करत असताना निष्ठा, प्रामाणिकपणे, प्रयत्न आणी आत्मविश्वास गरजेचा असतो. पण हल्ली नोकरीत प्रत्येक जण वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतो, अशी स्थिती आहे. आपण कोणतेही काम करा जर का ते बरोबर, प्रगती साधणारे व सर्वांच्या हिताचे असेल तर, आदेशाची वाट पाहू नका.
जबाबदारी घेऊन ते काम पूर्ण करा. त्यात यश मिळाल्यानंतर मिळणारे समाधान लाख मोलाचे असेल.
ते म्हणाले, सुख दुःखे सर्वाच्या वाट्याला येतात. पण त्यांना सामोरे जाताना कणखर मानसिकता ठेवा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सकारात्मकता ठेवता आली पाहिजे. जे आहे, त्यात वाढ करण्याचा व समाधानी असण्याचा प्रयत्न करा. आपण जेथे काम करतो त्यावर निष्ठा ठेवा. आपल्या कामामुळे संस्थेची प्रगती होत असल्यास त्याबरोबर आपलीही प्रगती निश्चित होणार. धकाधकीच्या व गतिमान जीवनात आनंदी रहा. कुटुंबासाठी व स्वतःसाठी वेळ द्या. जीवन अनमोल आहे. त्याकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन ठेवा. व्यसनापासून दूर रहा. आरोग्यसंपन्न जीवन जगा, असा संदेश त्यांनी दिला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांनी केले. कार्यक्रमास कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले.