दहावी बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांच्या अदलाबदलीच्या आदेशाला स्थगिती
सांगली :माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ ( दहावी बारावी बोर्ड मंडळाचे ) राज्यअध्यक्ष मा . त्रिगुण कुलकर्णी साहेब यांच्याबरोबर आज,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुणे येथील बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले .
केंद्र संचालक,पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या केंद्र आदलाबदल रद्द करणे बाबतचा निर्णय संघटनेच्या माध्यमातून ठामपणे मांडण्यात आला व माननीय अध्यक्षांनी तो मान्य ही केला त्याबाबतचे आदेश पुढील दोन दिवसात विभागीय कार्यालयांना कळविण्यात येतील .
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वर्गखोल्यातील सक्ती बाबत : 85 टक्के वर्ग खोल्यांमधील कॅमेरे सध्या असून उर्वरित खोल्यांमध्ये कॅमेरे बसवणे बाबत शाळांनी सहकार्य करावे असे परीक्षा मंडळाकडून सुचित करण्यात आले . त्याबाबत शाळा स्तरावरून कार्यवाही सुरु आहे असे संघटनेकडून सांगण्यात आले .
केंद्र संचालक व पर्यवेक्षक,परीक्षा संदर्भित कामाकरिता मानधनात दहा ते पंधरा टके वाढ करण्याचे मंडळाचे अध्यक्ष यांनी मान्य केले .
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्यास राज्य शिक्षण मंडळाकडून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येईल .
केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या मुख्याध्यापकांना परीक्षाच्या इतर कामातून सूट देण्यात येईल तसेच मुख्याध्यापकांना पेपर तपासणीच्या कामातूनही सूट देण्यात येईल यासाठी शिक्षकांची माहिती पुढील दोन दिवसात अद्यावत करण्यात येत आहे .
परीक्षा संदर्भीय कार्यालयीन कामकाजासाठी शाळेकडून सध्या मोठ्या प्रमाणात स्टेशनरी खर्च होत असल्याचे बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले,त्यानुसार यापुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना स्टेशनरी खर्चासाठी ची रक्कम देण्याबाबत तरतूद करण्याचे अध्यक्षांनी मान्य करून कार्यवाही सुरू करीत असल्याचे सांगितले .
परीक्षा कालावधी दरम्यान उत्तर पत्रिका पोस्टाने पाठवण्याकरिता पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी यापुढे केंद्रावर उपस्थित राहतील व विशेष सुरक्षा यंत्रणेत प्रश्नपत्रिकाही कस्टडीयन पासून शाळेपर्यंत पोहोचणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले .
सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यापुढे एसएससी बोर्डाकडून, विद्यार्थ्याचे नाव,वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने नोंद करण्यात येईल सदरच्या नावाप्रमाणे विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित मिळणार आहे .
. परीक्षा केंद्रावरील खर्च 100 रुपयावरून 300 रुपये,कस्टडीयन पासून शाळेपर्यंत प्रश्नपत्रिका वाहतूक करण्यासाठी विशेष वाहनांची सोय (मोठ्या संख्येतील प्रश्नपत्रिकेसाठी) व परीक्षा केंद्रावर पाणी वाटप करण्यासाठी बंद असलेली अनुदानाची उपलब्धता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे .
शिक्षण संक्रमण पुस्तिका बंद करण्यात येऊन यापुढे शिक्षण संक्रमण नाममात्र दरात डिजिटल स्वरूपात शाळा , शिक्षक व पालकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
मुख्याध्यापक महामंडळाच्या वरील सर्व मागण्या मान्य करून,राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.कुलकर्णी साहेब यांनी सदरचे आदेश विभागीय अध्यक्षांना त्वरित देणार असल्याबाबतचे सांगितले .
या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,उपाध्यक्ष सुनील पंडित, डॉ . डी एस घुगरे, विद्या सचिव संजयकुमार झांबरे, कोल्हापूर विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ . बी बी पाटील, पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पाटणे सर,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव संतोष नाईक,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, मार्गदर्शक पुंडलिक मेमाणे,शिक्षणतज्ञ महेंद्र गणपुले याबरोबर राज्य शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी,सहसचिव प्रमोद गोफणे व अधिकारी उपस्थित होते .


