ताज्या घडामोडी

३९ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा

किशोर–किशोरी गटात धाराशिव, मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा बाद फेरीत
वडाळ्यात खो-खोचा जल्लोष! दुसऱ्या दिवशीही मैदान तापलं
उपउपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट, वडाळ्याच्या मैदानावर चुरशीचा महोत्सव

मुंबई, ता. २६ (क्री. प्र.) : वडाळ्यातील शारीरिक शिक्षण मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या ३९ व्या किशोर–किशोरी (सब ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेने दुसऱ्या दिवशी अक्षरशः रंगत पकडली. प्रत्येक सामन्यात वेग, चपळता, रणनीती आणि जिद्दीचा संगम दिसून आला. किशोर व किशोरी गटात धाराशिव, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली आणि सातारा संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उपउपांत्य (बाद) फेरीत प्रवेश केला आणि स्पर्धेची धग अधिकच वाढवली.

मुंबईचा परभणीवर थरारक एक गुणाचा विजय (किशोर गट)
यजमान मुंबईने परभणीविरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २६–२५ (मध्यंतर १४–११) असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला मिळालेली तीन गुणांची आघाडी मुंबईसाठी निर्णायक ठरली. मुंबईकडून यश जाधव (२ व ३ मि. संरक्षण, २ गुण), अधिराज गुरव (२.१० मि. संरक्षण, ४ गुण), रुद्रसिंग चव्हाण (१ मि. संरक्षण, ६ गुण), आरुष तांबे (नाबाद १.३० मि. संरक्षण, ६ गुण) यांनी सलग ओळीत चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. परभणीकडून सोहम पांचाळ (१.४५ व १.४० मि. संरक्षण, २ गुण), अभंग देशमुख (१.५० व १.१५ मि. संरक्षण), गोविंद शर्मा (२.१० मि. संरक्षण) यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.

मुंबई उपनगरचा हिंगोलीवर एकतर्फी धडाका (किशोर गट)
मुंबई उपनगरने हिंगोलीवर ३२–०५ (मध्यंतर २७–०) असा दणदणीत विजय मिळवत एक डाव राखून २७ गुणांनी सामना जिंकला. मुंबई उपनगरकडून हर्षद शिर्के (नाबाद ७ गुण, नाबाद ३.२० मि. संरक्षण) आणि प्रज्योत गुजर (६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. हिंगोलीकडून अर्जुन कोरडे (१.२० मि. संरक्षण) याचे प्रयत्न अपयशी ठरले.

धाराशिवची बीडवर ठसठशीत सरशी (किशोर गट)
धाराशिव संघाने बीडवर २८–१० असा विजय मिळवत एक डाव राखून १८ गुणांनी बाजी मारली. धाराशिवकडून प्रफुल वसावे (४.५० मि. संरक्षण, ६ गुण), सुरज काकडे (नाबाद १.२० मि. संरक्षण, ४ गुण), ओम पवार (२ मि. संरक्षण, ४ गुण) यांनी सलग प्रभावी खेळ केला. बीडकडून सौरभ खरात (१.३५ मि. संरक्षण, ४ गुण), श्रीयश जाधव (१ मि. संरक्षण) यांनी लढत दिली.

लातूरचा संभाजीनगरवर अटीतटीचा विजय (किशोरी गट)
किशोरी गटात लातूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर हा सामना उत्कंठावर्धक ठरला. लातूरने २६–२४ असा २ गुणांनी विजय मिळवला. मध्यंतराला १२–१३ अशी पिछाडी असतानाही दुसऱ्या डावात लातूरने खेळ उंचावला. लातूरकडून सायली देशमुख (२.४० व १.२० मि. संरक्षण, ६ गुण), संस्कृती शिंदे (१.४० मि., नाबाद १.२० मि. संरक्षण), संध्या घोगरे (६ गुण) यांनी निर्णायक खेळी केली. संभाजीनगरकडून ओजस्वी शिंदे (१.३५ व १.२० मि. संरक्षण, २ गुण), मधुरा पवार (८ गुण) यांचे प्रयत्न कमी पडले.

जालन्याचा नांदेडवर संयमी विजय (किशोरी गट)
जालना विरुद्ध नांदेड सामन्यात जालनाने ३१–२४ असा ७ गुणांनी विजय मिळवला. मध्यंतराला मिळालेली एक गुणाची आघाडी जालनाने कायम राखली. जालनाकडून समिक्षा (३.३० मि. संरक्षण), क्रांती मदन (२.२० व १.४० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नांदेडकडून संगीता मटके (२.२० व १.२० मि. संरक्षण), प्राची डिकळे (६ गुण) यांनी झुंज दिली.

किशोर गट – संक्षिप्त निकाल
रायगडने लातूरचा ३१–१९ असा १२ गुणांनी पराभव केला; नंदुरबारने सिंधुदुर्गवर ४१–०८ असा एक डाव राखून ३३ गुणांनी विजय मिळवला; रत्नागिरीने धुळ्याचा २६–१७ (मध्यंतर १०–१०) असा ९ गुणांनी पराभव केला; अहिल्यानगरने नांदेडवर २९–१३ असा एक डाव राखून १६ गुणांनी विजय नोंदवला.

किशोरी गट – संक्षिप्त निकाल
नंदुरबारने रायगडचा ४८–२० (मध्यंतर २२–१४) असा २८ गुणांनी पराभव केला; अहिल्यानगरने सिंधुदुर्गचा ४४–०२ असा एक डाव राखून ४२ गुणांनी धुव्वा उडवला; बीडने मुंबई उपनगरवर ३०–२४ (मध्यंतर २०–१२) असा १.२० मि. राखून ६ गुणांनी विजय मिळवला.

उद्घाटन सोहळ्यात खो-खोच्या भविष्याचा सूर
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी १४ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा भारतीय खेळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. व्यासपीठावर पद्मश्री उदय देशपांडे, प्रा. डॉ. घनश्याम धोकरट, स्पर्धा समिती अध्यक्ष संदीप तावडे, मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, पंच मंडळ सहसचिव नानासाहेब झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिवछत्रपती पुरस्कार विजेते पराग आंबेकर यांनी मानले. प्रारंभी २४ जिल्ह्यांतील ४८ संघांच्या ७५० खेळाडूंनी भव्य संचलन केले.

असे होणार उपउपांत्यपूर्व सामने
मुले गट : धाराशिव विरुद्ध पालघर, नंदुरबार विरुद्ध रत्नागिरी, रायगड विरुद्ध सातारा, पुणे विरुद्ध मुंबई उपनगर, सांगली विरुद्ध नाशिक, जालना विरुद्ध ठाणे, मुंबई विरुद्ध अहिल्यानगर, सोलापूर विरुद्ध संभाजीनगर.

मुली गट : सोलापूर विरुद्ध अहिल्यानगर, ठाणे विरुद्ध मुंबई, सांगली विरुद्ध जळगाव, परभणी विरुद्ध सातारा, नंदुरबार विरुद्ध धाराशिव, लातूर विरुद्ध पुणे, बीड विरुद्ध जालना, नाशिक विरुद्ध नांदेड.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??