शिक्षक (राष्ट्रनिर्माता) की सर्व्हेअर..
आजच्या काळात शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक राहिलेला नाही, तर तो शासनाचा ‘सर्वसमावेशक दूत’ आणि ‘बहुउद्देशीय कर्मचारी’ बनलेला आहे. वर्गात अध्यापन करणे ही तर जणू ‘साईड ड्युटी’ ठरावी, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.अलीकडचा तुघलकी फर्मान तर हद्द पार करणारा आहे — गावातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून मानव–श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश! आणि विशेष म्हणजे, या मोहिमेसाठी *’नोडल अधिकारी’* म्हणून थेट मुख्याध्यापकाची नियुक्ती!
राष्ट्रनिर्मात्याची ही कसली अधोगती?
ज्या शिक्षकाच्या हातून उद्याचे नेते, सनदी अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्स घडतात; ज्याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्राचा पाया रचला जातो, त्या शिक्षकाला आज ‘कुत्री मोजण्याच्या’ कामाला लावणे, ही राष्ट्राची वैचारिक अधोगती नाही का? जो संपूर्ण समाजाला दिशा देतो, त्यालाच आज दिशाहीन कामात गुंतवले जात आहे.
* समाजाची बदललेली हीन दृष्टी*
सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे आजचा समाज आणि व्यवस्था! जे लोक कधीकाळी शाळेची पायरीही चढले नाहीत किंवा ज्यांना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक नाही, ते आज गुरूंना हीन दर्जाची वागणूक देत आहेत.
*अल्पशिक्षित लोकांचा वरचश्मा:* अनेक ठिकाणी अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोक शिक्षकांना आदेश देताना किंवा त्यांच्यावर टीका करताना दिसतात.
*सन्मान हरवला:* ‘गुरुर्ब्रह्मा’ म्हणणाऱ्या समाजात आज शिक्षकाची ओळख केवळ एक *’सरकारी नोकर*’ अशी करून दिली जात आहे. ज्याने सर्वांना मोठे केले, त्यालाच आज सर्वात खाली खेचण्याचे काम सिस्टिम करत आहे.
* शैक्षणिक ट्रेजेडी*: भवितव्याशी खेळ
ही केवळ शिक्षकांची वैयक्तिक समस्या नाही, तर ही एक *’*नॅशनल एज्युकेशनल ट्रेजेडी’* आहे.
*मानसिक खच्चीकरण:* सातत्याने अशैक्षणिक कामांचा दबाव शिक्षकातील सृजनशीलता मारून टाकतोय.
*विचित्र विरोधाभास:* एकीकडे ‘निपुण भारत’ आणि ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणा’च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे शिक्षकाला ‘मल्टिपर्पज लेबर’ म्हणून वापरायचे, हा मोठा विनोद आहे.
*वेळेची चोरी:* जेव्हा शिक्षक गावात कुत्री मोजत असतो, तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चोरी होत असते.
*बळीचा बकरा:* अधिकार शून्य पण जबाबदारी पूर्ण! सर्वेक्षण शिक्षक करणार, आकडेवारी शिक्षक भरणार… आणि उद्या शाळेचा निकाल कमी लागला की, पुन्हा डोसही याच ‘राष्ट्रनिर्मात्याला’ मिळणार!
आजचा शिक्षक ,मुख्याध्यापक म्हणजे नेमका कोण?
अध्यापक (वेळ मिळाल्यास)
जनगणना व निवडणूक कर्मचारी
लसीकरण व स्वच्छता अभियान समन्वयक
डेटा ऑपरेटर आणि आता… भटक्या कुत्र्यांचा सर्व्हेअर!
वास्तव हेच आहे की,
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा स्थानिक प्रशासनाचा आहे. पण बळीचा बकरा शिक्षकच! आज शिक्षक विचारत आहे: “आम्ही विद्यार्थ्यांची प्रगती मोजायची की गावातल्या कुत्र्यांची संख्या? शाळेचा पट वाढवू की भटक्या कुत्र्यांचा पट बनवू?”
शिक्षक समाजकार्यात सहभागी व्हायला कधीच मागे नाही. पण शिक्षणाशी थेट संबंध नसलेल्या कामांचा अतिरेक हा शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षकाच्या आत्मसन्मानावर झालेला अन्याय आहे. शिक्षकाला ‘शिक्षक’ म्हणूनच जगू द्या आणि काम करू द्या.तरच हा देश टिकेल.
*प्रा.दिलीप जाधव*
*सचिव*
*सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली*



