ताज्या घडामोडी

नव दुर्गा विशेष (माता कालरात्री) डॉ. सोनल बुरघाटे संपादक (आयजेसीएएमएस)

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा येण्यासाठीच बनलेली असतात या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतो. असे सांगणाऱ्या आजच्या आपल्या नव दुर्गा आहेत डॉ. सोनल बुरघाटे, यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी….

तुमच्या विषयी थोडक्यात सांगाल आणि सध्या तुम्ही काय करता?
मी, डॉ. सोनल बुरघाटे, आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज (आयजेसीएएमएस) आणि द लीडर्स ग्लोब इंटरनॅशनल मॅगझिनची संपादक आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, संशोधन क्षेत्रातील संशोधकांना त्यांचे शोध निबंध प्रकाशित करता येतात. मी स्वतः संशोधक असताना अश्या प्लॅटफॉर्मद्वारे, शोध निबंध प्रकाशित केले आहेत. लहान पणापासून मला लिहिण्याची आवड होती. बऱ्याच जणांना लिहिता चांगले येते , पण एक चांगला प्लॅटफ्रॉम् त्यांचे लिखाण प्रकाशित करण्यासाठी मिळत नाही, तेव्हा मी ठरवले की आयजेसीएएमएस च्या माध्यमातून असा प्लॅटफॉर्म द्यावा जेणेकरून प्रत्येकाला ती संधी मिळेल. यामध्ये गुणवत्तापूर्ण असेच वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील संशोधनपर निबंध प्रकाशित केले जातात. ज्यामुळे इतरांनाही ज्ञान आणि प्रेरणा मिळते.

तुमच्या आयुष्यातील प्रेरणादाई व्यक्तिमत्त्वाविषयी सांगाल.
खरी प्रेरणा , मार्गदर्शन आणि पाठिंबा मला मिळाला तो माझ्या आई श्रीमती आशा आणि वडील स्व. श्री. अशोकराव वाटाणे यांच्याकडून. माझ्या आई वडिलांनी कधीही मुलगा आणि मुलगी असा फरक केला नाही. सुरवातीपासूनच आमच्या घरात स्री – पुरुष समानता मला दिसून आली जी आजच्या काळातील गरज आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ दिले. वडिलांच्या प्रत्येक निर्णयामागे माझी आई त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. मुलींनी शिक्षण घ्यावे याविरुद्ध बरेच जण असताना माझ्या आईने माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा दिला. महिला सक्षमीकरणासाठी घरातूनच मिळालेला हा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. मी स्वतःला धन्य मानते आणि अभिमानाने सांगू इच्छिते की मी त्यांची मुलगी आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन जगताना ते तुम्ही कशापद्धतीने सांभाळता.
माझ्या या जीवन प्रवासात एक निर्णायक क्षण असा आला की जेव्हा मला माझ्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यावा लागला आणि काम करावे लागले. यामध्ये मला मोलाची साथ मिळाली ती माझे पती निललोहित बुरघाटे यांची. त्यांनी नेहमीच मला पुढे जाण्यास मदत केली आहे. माझ्या दोन मुलींची आई , कौटुंबिक प्रपंच सांभाळत मी व्यावसायिक काम ही आत्मविश्वासाने करू लागले. असे म्हणतात ना जेव्हा तुम्हाला मिळणारी साथ जर भक्कम असेल तर तुम्ही नक्कीच यश संपादन करू शकता.

असा एखादा अनुभव जेथे तुम्हाला नव दुर्गेचे रूप घ्यावे लागले.
होय, जेव्हा मी (आयजेसीएएमएस) चे काम सुरू केले तेव्हा मला माहीत होते मला बऱ्याच आव्हानांना , समस्यांना सामोरे जावे लागणार आहे . या प्रकारचे काम करत असताना बऱ्याच वेळा मला नव दुर्गेच्या रूप धारण करावे लागले आहे. कधी नम्रता, विनयता , धीरगंभीरता तर कधी वेळ आल्यास कठोरता दाखवत मला काम करावे लागले आहे. कारण जागतिक स्पर्धेत ठिकाव धरायचा असेल तर तुम्हाला धैर्य, जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते. तुम्हाला यश संपादन करायचे असेल तर नेतृत्व गुण , समूहाने काम करणे , वेळेचे व्यवस्थापन , व्यवसायात असलेले धोके आणि अनिश्चितता याचा सामना करणे हे जर तुम्ही साध्य केले तर यश नक्की मिळते आणि मी हेच केले.

आपण सामाजिक कार्यात सामील आहात?
होय, आपण समाजाचे देणे लागत असतो या सामाजिक बांधिलकीतून बऱ्याचदा माझ्याकडे अत्यंत हुशार पण आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले संशोधक विद्यार्थी येतात तेव्हा मी त्यांची गुणवत्ता पाहून मी त्यांचे शोध निबंध मोफत प्रकाशित करते. कुठे तरी मनाला एक समाधान मिळते की त्यांच्या डॉक्टरेट (पीएचडी) मिळवण्याच्या प्रवासात आपण खारीचा वाटा उचलला आहे. एखाद्याचे भविष्य घडविता येणे यापेक्षा दुसरे समाधान नाही.

महिलांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता.
कधीही स्वतःला कमी लेखू नका. आपल्यात केवळ स्वतःला बदलण्याची ताकद नसते तर आपण जग बदलू शकतो. तुम्ही पाहत असलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी तसे प्रयत्न करा.. एकमेकांना साथ , पाठिंबा द्या. लवचिकता , करुणा आणि धैर्य या त्रिसुत्रीच्या साह्याने यश संपादित करा.

शब्दांकन
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन

 

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??