तुमचा पाळीव प्राणी सुरक्षित आहे का ?

लसीकरण आणि नियमित जंतनाशन ही प्रत्येक जबाबदार मालकाची पहिली जबाबदारी आहे.आजकाल अनेक घरांमध्ये कुत्रे आणि मांजरी हे केवळ पाळीव प्राणी राहिलेले नाहीत तर ते कुटुंबातील सदस्य बनले आहेत. त्यांच्या आनंदात आपण आनंदी होतो आणि त्यांच्या आजारपणात तितकेच अस्वस्थही होतो. मात्र, या प्रेमासोबत एक जबाबदारीही येते त्यांच्या आरोग्याची.
पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेकदा अशी परिस्थिती पाहायला मिळते की, काही दिवसांपूर्वीपर्यंत पूर्णपणे निरोगी आणि खेळकर असलेले पिल्लू अचानक अशक्त होऊन उपचारासाठी आणले जाते. सतत उलट्या, रक्तमिश्रित जुलाब, ताप आणि विकनेस अशी लक्षणे दिसतात. तपासणीनंतर निदान होते कॅनाईन पार्वोव्हायरस (Canine Parvovirus Infection) किंवा डिस्टेंपर (Canine Distemper) यांसारखा गंभीर संसर्ग. अशा वेळी प्रत्येक मालकाच्या तोंडून एकच प्रश्न ऐकायला मिळतो “डॉक्टर, हे टाळता आलं असतं का?” आणि उत्तर बहुतेक वेळा एकच असतं होय. वेळेवर लसीकरण झालं असतं तर ही वेळ आली नसती.
लसीकरण म्हणजे आजार झाल्यावर दिले जाणारे उपचार नाहीत, तर आजार होण्यापूर्वी शरीराला दिले जाणारे संरक्षण आहे. प्रत्येक लस प्राण्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट आजारांविरुद्ध लढण्यासाठी तयार करते. त्यामुळे भविष्यात संसर्ग झाला तरी शरीर त्याचा प्रभावीपणे सामना करू शकते.
कुत्र्यांमध्ये पार्वो, डिस्टेंपर, इन्फेक्शस हेपेटायटिस, लेप्टोस्पायरोसिस आणि रेबीज यांसारखे आजार जीवघेणे ठरू शकतात. मांजरींमध्येही पॅनल्यूकोपेनिया, कॅलिसी व्हायरस आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका असतो. यापैकी अनेक आजारांवर उपचार करणे अवघड, खर्चिक आणि काही वेळा निष्फळही ठरते. मात्र योग्य वेळी दिलेल्या लसीमुळे हे धोके मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.
विशेष उल्लेख करावा लागेल तो रेबीजचा. हा असा आजार आहे की, लक्षणे दिसू लागल्यानंतर प्राणी आणि माणूस दोघांसाठीही तो जवळजवळ शंभर टक्के प्राणघातक असतो. त्यामुळे प्रत्येक पाळीव प्राण्याचे रेबीजविरोधी लसीकरण हे केवळ त्या प्राण्याच्या संरक्षणासाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
लसीकरणाइतकेच महत्त्वाचे, पण अनेकदा दुर्लक्षित राहणारे दुसरे पाऊल म्हणजे जंतनाशन. अनेक पिल्लांना जन्मानंतर किंवा आईकडूनच आतड्यांतील जंतांचा संसर्ग झालेला असतो. हे जंत शरीरातील पोषक तत्त्वांवर जगतात. परिणामी वाढ खुंटणे, वजन न वाढणे, अशक्तपणा, रक्ताल्पता, उलट्या, जुलाब, पोट फुगणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.
महत्त्वाची बाब म्हणजे काही आतड्यांतील जंतांचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा धोका अधिक असतो. त्यामुळे नियमित जंतनाशन ही केवळ प्राण्याच्या आरोग्याची बाब नसून संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याशी संबंधित जबाबदारी आहे.
काही मालकांचा असा गैरसमज असतो की, “माझा प्राणी घराबाहेर जात नाही, त्यामुळे त्याला लसीकरण किंवा जंतनाशनाची गरज नाही.” प्रत्यक्षात अनेक विषाणू, जीवाणू आणि परजीवी हे कपड्यांद्वारे, पादत्राणांद्वारे, दूषित
वस्तूंमधून किंवा इतर अप्रत्यक्ष मार्गांनी घरात पोहोचू शकतात. त्यामुळे घरात राहणाऱ्या पाळीव प्राण्यांनाही नियमित प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आवश्यक असते.
आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे हे अधिक शहाणपणाचे आहे. गंभीर संसर्ग झाल्यास अनेक दिवस उपचार, रुग्णालयात दाखल करणे, सलाईन, विविध औषधे आणि मोठा आर्थिक खर्च करावा लागू शकतो. त्याच्या तुलनेत वेळेवर केलेले लसीकरण आणि नियमित जंतनाशन हा अत्यंत सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे.
आज प्रत्येक पाळीव प्राणी मालकाने एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे आपल्या प्राण्याचे प्रेम केवळ त्याच्यासोबत खेळण्यात किंवा त्याला चांगले अन्न देण्यात नाही. तर त्याला आजारांपासून सुरक्षित ठेवण्यात आहे. योग्य वेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरण आणि जंतनाशनाचे वेळापत्रक पाळणे हीच त्याच्याप्रती खरी जबाबदारी आहे.
कारण शेवटी, निरोगी पाळीव प्राणी हा योगायोगाने तयार होत नाही तर तो जागरूक आणि जबाबदार मालकाच्या योग्य निर्णयांमुळे घडतो.
राज संपत शिंदे.
BV.Sc&AH. (Intern.)
मो. : +919175451399
ईमेल : rshinde21401@gmail.com.



