आषाढी एकादशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये भक्तिमय दिंडी सोहळे; वारकरी परंपरेतून संस्कारांचा जागर

सफाळे, दि. २५ :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पालघर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पारंपरिक दिंडी सोहळ्यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा परिचय करून देण्यात आला. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग, पालखी, रिंगण आणि वारकरी वेशभूषेमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
केळवा रोड येथील मेघराज शिक्षण संस्था संचालित इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांच्या सौजन्याने विद्यावैभव विद्यालयात
दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत टाळ-मृदंग, विणा आणि विठ्ठल नामाच्या गजरात विद्यावैभव विद्यालय ते अंबामाता मंदिर अशी दिंडी काढण्यात आली. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी भगवे ध्वज हातात घेत अभंग गात रिंगण व पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, शिस्त, सेवाभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक प्रमोद पाटील, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी, सत्यवान भोईर, विविध पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा आगरवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. प्रमुख शिक्षिका सुरेखा गुळवे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
दरम्यान, न्यू इंग्लिश स्कूल, शिरगाव येथेही आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिर ते विठ्ठल मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारली. ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण शिरगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शिक्षकांनीही लेझीम व रिंगणात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील, योग शिक्षक सुभाष पाटील, विश्वस्त सुजित पाटील, सुचिता पाटील तसेच मुख्याध्यापिका कांचन पाटील उपस्थित होत्या.
याचप्रमाणे नूतन विद्या विकास मंडळ संचालित आदर्श विद्या मंदिर, केळवे येथे ‘स्वच्छतेची वारी’ या संकल्पनेतून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून भजन-कीर्तन सादर केले तसेच विठ्ठल-रखुमाईची भूमिका साकारून ग्रामस्थांचे लक्ष वेधले. आदर्श विद्या मंदिर ते केळवे बाजार आणि श्री शीतलामाता मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या वारीत टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मुख्याध्यापक हेमंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या दिंडी सोहळ्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, भक्ती, स्वच्छता, सामाजिक ऐक्य आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.



