ताज्या घडामोडी

बाप: सावलीतला सूर्य..

माणूस जन्माला येतो तेव्हा पहिला स्पर्श आईचा असतो. पण पहिली सावली बापाची असते. ती सावली कधी जाणवत नाही, कारण ती डोक्यावर सतत असते. उन्हाची तीव्रता कळू देत नाही. बाप हा घराचा कळस नसतो, तो पाया असतो. जमिनीत गाडलेला. दिसत नाही, पण त्याच्यावरच सगळा डोलारा उभा असतो.

आईचं प्रेम पावसासारखं आहे. बरसतं, भिजवतं, लगेच कळतं. बापाचं प्रेम विहिरीसारखं आहे. खोल. वरून शांत. पण तहान लागली की त्याचीच आठवण येते. वपुंनी म्हटलं ते खरंच आहे. आई टाकून बोलते. बाप मूक राहतो. त्याची माया शब्दात मोजता येत नाही. ती कृतीत दिसते. नवे बूट घेताना त्याने घातलेले जुने सॅंडल बघितले की त्याची माया कळते. आपल्या फी साठी त्याने टाळलेला सिनेमा बघितला की त्याचं प्रेम समजतं.

बापाशी भांडणाऱ्या पोरांची संख्या जगात सगळ्यात जास्त असेल. कारण बाप म्हणजे ‘नाही’. सायकल मागितली की नाही. मित्रांबरोबर ट्रिपला जायचं म्हटलं की नाही. रात्रभर जागायचं म्हटलं की नाही. तेव्हा तो व्हिलन वाटतो. पण वर्षांनी कळतं की त्या ‘नाही’ मध्ये आपली सगळी ‘होकार’ लपलेली होती. तो ओरडायचा, कारण त्याला आपण रस्त्यात पडू नये असं वाटायचं. तो रागवायचा, कारण त्याला आपलं भविष्य दिसायचं.

बाप असणं म्हणजे एकटेपणाचं दुसरं नाव.
कभी हँसी और खुशी का मेला है पिता
कभी कितना अकेला और तन्हा है पिता

घरात सगळे हसतात तेव्हा तो कोपऱ्यात हसतो. सगळे रडतात तेव्हा तो खांबासारखा उभा राहतो. त्याला रडायची परवानगी नसते. कारण तो रडला तर घर कोसळेल अशी त्याची भीती असते. माँ तो कह देती है अपने दिल की बात. पण बाप? सब कुछ समेट के आसमान सा फैला है पिता. त्याच्या मनातलं वादळ त्यालाच माहीत.

एक गोष्ट सांगतो. अमिताभ बच्चन नावाचा पोरगा. देखणा, उंच, आवाज दमदार. पण स्ट्रगल करत होता. वडील कोण? हरिवंशराय बच्चन. हिंदी साहित्यातले सूर्य. नेहरू-गांधी घराण्याशी घरोबा. स्वतः परराष्ट्र मंत्रालयात मोठे अधिकारी. हवे तर एका मिनिटात पोराचं काम झाले असते. पण त्यांनी केलं नाही. का? कारण ते बाप होते. वशिला देणारे काका, मामा नव्हते.

अमिताभ कलकत्त्याला कारकुनी करत होता. आकाशवाणीने आवाज नाकारला होता. नैराश्य, चीड, राग. तरुण रक्त उसळत होतं. एक दिवस वैतागून तो बापाला म्हणाला, “बाबूजी, आपने हमे पैदा ही क्यों किया?”

विचार करा. पोटच्या पोराने असं विचारावं. काळीज तुटतं. हरिवंशराय काही बोलले नाहीत. रागावले नाहीत. उपदेशाचे डोस दिले नाहीत. सकाळी उठून त्यांनी एक कागद घेतला. चार ओळी लिहिल्या आणि बाहेर पडले. अमिताभने ती चिठ्ठी वाचली. नाव होतं ‘नयी लीक’.

“जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर, मेरे बेटे मुझसे पूछते है कि हमे पैदा क्यों किया था? मेरे पास जवाब नही है. क्योकि मेरे बाप ने भी मुझसे बिना पूछे मुझे पैदा किया था. उनके बाप ने भी. जिंदगी की कशमकश पहले भी थी, आज भी है, कल भी होगी. तुम ही नई लीक रखना. अपने बेटो से पूछकर उन्हे पैदा करना.”

हे उत्तर होतं. बापाने मुलाला रस्ता दाखवला नाही. त्याने संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान एका चिठ्ठीत मांडलं. ‘तुझी लढाई तूच लढ. मी आहे पाठीशी, पण तुझ्या जागी नाही.’ हेच संस्कार अमिताभला शहेनशाह बनवून गेले. वशिला करून मिळालेली खुर्ची तात्पुरती असते. संघर्षातून मिळालेलं सिंहासन कायमचं असतं. बापाने तेच दिलं.

बाप म्हणजे एक जहाज. खवळलेल्या समुद्रातून आपल्याला पैलतीराला नेणारं. स्वतःवर लाटा झेलणारं, पण आपल्याला कोरडं ठेवणारं. ते जहाज किनाऱ्यावर असेपर्यंत आपण निश्चिंत असतो. वादळाची भीती वाटत नाही. पण एक दिवस ते जहाज दिसेनासं होतं. तेव्हा कळतं की आपण समुद्रात एकटे आहोत. तेव्हा त्याने शिकवलेलं पोहणं कामी येतं.

आता जरा थांबा आणि विचार करा. बाप म्हणजे फक्त जन्मदाता का? छे. ही व्याख्या खूप छोटी आहे. पितृत्व हे नातं नाही, ती जबाबदारी आहे. ती भूमिका आहे. ती अनेकजण निभावतात.

शाळेत पहिलं अक्षर गिरवून घेणारा मास्तर, तो बापच असतो. ‘पडलास तरी चालेल, पण पुन्हा उभा रहा’ असं सांगणारा क्रीडाशिक्षक, तो बापच असतो. ऑफिसमध्ये चूक झाली तेव्हा पाठराखण करणारा सिनियर, तो बापच असतो. रात्री अपरात्री दवाखान्यात धावून येणारा शेजारी, तो बापच असतो. शब्दांनी आयुष्य बदलणारा लेखक, विचारांनी दिशा देणारे शिवराय, बाबासाहेब, ते सगळे पितृतुल्य आहेत. कारण त्यांनी आपल्याला घडवलं.

इतकंच काय. ज्या शाळेत शिकलो ती इमारत, ज्या मैदानावर पडलो आणि उठलो ते मैदान, ज्या घराने ऊन, पाऊस झेलला ते छप्पर, ज्या मातीत खेळलो ती धरती, हा सारा निसर्ग. हे सगळे मुक बाप आहेत. ते बोलत नाहीत, पण संस्कार करतात. शिस्त शिकवतात. लढायला शिकवतात. जगायला शिकवतात.

म्हणून पितृदिन एका दिवसापुरता मर्यादित ठेवू नका. ‘पिता’ या शब्दाचा अर्थ मोठा करा. ज्याने ज्याने तुम्हाला काही दिलं, त्या प्रत्येकाला मनातून नमस्कार करा. कृतज्ञता व्यक्त करायला मुहूर्त लागत नाही.

बाप गेला की पोरकं व्हायला होतं. पण खरं सांगू? बाप कधीच जात नाही. तो आपल्या सवयींत राहतो. आपल्या निर्णयांत राहतो. आपल्या चांगल्या कामात राहतो. त्याने बांधलेली घडी आपण विस्कटू नये, हीच त्याला खरी आदरांजली.

आज डोळे मिटा. तुमच्या आयुष्यातल्या त्या सगळ्या जहाजांना आठवा. ज्यांनी तुम्हाला वादळातून बाहेर काढलं. दृश्य असोत वा अदृश्य. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. फक्त एकच करू शकतो. आपणही कुणासाठी तरी असंच जहाज बनू शकतो. हीच पितृत्वाची खरी परंपरा आहे.
*प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली.*
*सचिव*
*,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.*
*राज्य कोषाध्यक्ष*
*कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??