कंटेकुर येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न..

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; योगाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित
मुरूम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) : कंटेकुर, ता. उमरगा येथीलजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रविवारी (ता.२१) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देणारा हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सरपंच विजयाताई जमादार, मुख्याध्यापक नागेंद्र समन, राम कलबुर्गे, पांडुरंग धुमाळ, महादेव गायकवाड, वसंत कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवी, असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांकडून योगासने आणि प्राणायामाचे सादरीकरण योग शिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन व पद्मासन यासारख्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच प्राणायामाचे प्रकार करून दाखवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगामुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि शरीर निरोगी राहते, याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी यावेळी योगविषयक घोषवाक्ये सादर करत योगाच्या प्रसाराचा संदेश दिला. केवळ आजचा दिवसच नव्हे, तर नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी सामूहिक योगाभ्यास आणि योग प्रतिज्ञा घेऊन केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक लक्ष्मण येवते, लतिफ लदाफ, लक्ष्मीबाई शिकारे, चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे आदींनी परिश्रम घेतले. लक्ष्मीकांत पटणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : कंटेकुर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत योग दिन प्रात्यक्षिकाद्वारे सादर करताना शिक्षक, मान्यवर व विद्यार्थी.



