
वाढदिवस म्हटला की केक, फटाके, सत्कार आणि अनाठायी खर्च अशीच सर्वसाधारण पद्धत पाहायला मिळते. मात्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री. संतोष पटकारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा आणि समाजाला प्रेरणा देणारा आदर्श घालून दिला. अनाठायी खर्चाला फाटा देत त्यांनी *डोंगरदऱ्या-खोऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप* करून वाढदिवसाचे औचित्य सामाजिक बांधिलकीतून साजरे केले.
रायगड जिल्ह्यातील जांभवली, ता. खालापूर येथे आयोजित कार्यक्रमात श्री. संतोष पटकारे यांनी ३५ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप* केले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सुमारे २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य* स्वतःच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्रवीण काकडे* यांनी संतोष पटकारे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “संतोष पटकारे यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ते दरवर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ‘कै. महादेव पटकारे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे.”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजातील प्रत्येकाने जर अशाच प्रकारे वाढदिवस, सत्कार किंवा इतर कार्यक्रमांवरील खर्चाचा काही भाग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला, तर समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे ऋण फेडणे अशक्य असले तरी अशा कृतीतून ते काही प्रमाणात उतरवण्याचा प्रयत्न करता येतो,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.या सामाजिक उपक्रमाचा विस्तार शेलू, ता. कर्जत* येथेही करण्यात आला. तेथे रामचंद्र पुकळे, शिवाजीराव दातीर आणि आनंदराव कचरे यांच्या सहकार्याने आणखी *४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप* करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमातून एकूण अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळाली.
या कार्यक्रमास विठ्ठल आखाडे, चंद्रकांत आखाडे, चंद्रकांत हिरवे, मारुती झोरे, संतोष झोरे, गौरव कोळापटे, सुनील लांबोर, लक्ष्मण आखाडे, लक्ष्मण खरात, बाळासाहेब गोरे, मोहन हिरवे, अश्विनी खरात, किसाबाई आखाडे, रामदास आखाडे, चिमीबाई खरात* यांच्यासह समाजबांधव, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. संतोष पटकारे यांनी वाढदिवसाला केवळ शुभेच्छांचा सोहळा न बनवता तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला हातभार लावणारा सामाजिक संकल्प बनवला. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजातील इतरांनीही हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, अशी भावना व्यक्त होत आहे.



