
अक्कलकोट तालुका प्रतिनिधी :- अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आत्तापासूनच जोरदार तयारी चालू आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी आरक्षित झाले असून यासाठी प्रामुख्याने धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने धनगर समाजातील तीन युवक थेट सरपंच पदासाठी कंबर कसली असून त्याप्रमाणे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर हेही यावेळी आपले नशिब आजमावत आहेत. ते गावामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, संगणक वाटप, टि शर्ट वाटप, रक्तदाब शिबीरात भेटवस्तू तसेच गावकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, कृषी विभाग आदी शासकीय कार्यालयात जनतेच्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात. माडकर हे सुशिक्षित आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे आणि गेल्या पंधरा वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्याचा अनुभव असल्याने गावातील तरुण वर्गाचा व महिला वर्गांचा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले विठ्ठल खरात हेही थेट सरपंच पदासाठी दंड थोपटले आहेत. त्यांना माजी सरपंच बाजीराव खरात, सोसायटी चेअरमन धनराज बिराजदार, माजी उपसरपंच सिध्दाराम बगले, सिध्दाराम बिराजदार, शिवशंकर कत्ते यांचे समर्थक आहे. खरात हे दुग्धव्यवसाय करीत असल्याने त्यांचा थेट संपर्क जनतेशी आहे. त्यांचे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. ते मितभाषी असून सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तीमत्व आहे. गावातील पारंपारिक बाजीराव खरात व शिवशंकर कत्ते पॅनल विरुद्ध फालू बिराजदार व मलकू कत्ते या पॅनलमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. तर तिसरीकडे जय भवानी क्लॉथ सेंटरचे मालक बसवंत धायगोडे हे थेट सरपंच पदाच्या शर्यतीत भाग घेतला असून त्यांना माजी सरपंच फालू बिराजदार, प्रभारी सरपंच माणिक धायगोडे, माजी सोसायटी चेअरमन मल्लिकार्जुन कत्ते, विठ्ठल कत्ते, अप्पुशा पाटील, मशिद शेख यांचा पाठिंबा आहे. धायगोडे हे कापडाचे व्यापारी असल्याने त्यांचा थेट संपर्क गावातील जनतेशी आहे. त्यांचा गणेश मंडळ, नवरात्र महोत्सव मंडळ, खंडोबा याञा यामध्ये हिरिरीने सहभाग असतो. त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. गावातील तीनही उमेदवार हे धनगर समाजाचे असून त्यांना निवडून येण्यासाठी मुस्लिम, लिंगायत, दलित समाज बांधव यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कसं सरस आहोत यासाठी जनतेला सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक दोन्ही पॅनेलच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर हे दंड थोपटल्याने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकुणच सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर तारखेकडे लागले आहे.



