
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अमराठी रिक्षाचालक व मालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘ मराठी माझी संवाद भाषा ‘ या मराठी भाषा प्रशिक्षण वर्गाचे बोईसर येथे आज दिनांक १९ जून २०२६ रोजी सुरुवात करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन सि.टी.ई.एस. इंग्रजी माध्यम शाळा एम.आय.डी.सी. नाका येथे उत्साहात पार पाडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर – तारापूर’ शाखेचे अध्यक्ष प्रा. संजय घरत यांनी प्रास्ताविकेतून प्रशिक्षणाचे महत्त्व व भूमिका रिक्षाचालकांना पटवून दिली. कोमसाप जिल्हा प्रतिनिधी सुहास राऊत यांनी मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रिक्षाचालकांचा प्रवाशांबरोबर संवाद अधिक सुलभ हवा यासाठी आपण सर्वांनी प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन केले.
संघटनेचे प्रतिनिधी राजाराम पवार यांनी प्रवाशांनी रिक्षावाल्यांबरोबर मराठीतच बोलले पाहिजे. तसेच संघटनेचे प्रतिनिधी संदीप पाटील यांनी रिक्षाचालकांनी लवकरात लवकर प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक परिवहन अधिकारी हेमचंद्र कोळेकर यांनी प्रशिक्षणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किती महत्त्वाचे आहे हे पटवून देऊन सर्वांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे हे सांगितले. याप्रसंगी संघटनेचे रितेश भोणे, परितोष ठाकूर, अखिलेश सिंग, बाबासाहेब गाजरे, कोषाध्यक्ष संदीप घरत, सदस्य उल्हास पाध्ये, सौ. अंजना सावे, मुख्याध्यापिका रोहिणी नाईक, दिपक रावरे, उपस्थित होते. तेहतीस रिक्षाचालकांनी प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात केली. कोमसाप सचिव डॉ. स्मिता माळवदे यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले.
१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत रिक्षाचालकांनी मराठी भाषा प्रशिक्षण वर्गातून अवगत केली पाहिजे; केली नाही तर जो शासनाकडून आदेश निघेल त्याला रिक्षाचालक जबाबदार असतील. तरी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी मराठी भाषा सोप्या पद्धतीने शिकून त्याचे प्रमाणपत्र अवगत करावे.—– हेमचंद्र कोळेकर, परिवहन अधिकारी.



