ताज्या घडामोडी

६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महिलांमध्ये धाराशिव तर पुरुषांमध्ये पुणे अजिंक्य धाराशिव–पुण्याचा राज्यात दबदबा

पुरुषांत पुण्याची हॅट्रिक, महिलांत धाराशिवचे सलग दुसरे जेतेपद
पुण्याचा शुभम थोरात व धाराशिवची अश्विनी शिंदे ठरले अष्टपैलू

बीड, दि. २२ डिसेंबर (क्री. प्र.) : बीड येथील श्रीमती योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडलेल्या ६१ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांच्या गटात धाराशिव तर पुरुषांच्या गटात पुणे संघाने विजेतेपद पटकावत आपला दबदबा कायम राखला. पुरुष गटात पुण्याने सलग हॅट्रिक साधली, तर महिलांमध्ये धाराशिवने सलग दुसऱ्या वर्षी राज्य अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत पुण्याचा शुभम थोरात आणि धाराशिवची अश्विनी शिंदे अष्टपैलू खेळाडू ठरले.

महिला अंतिम सामना : धाराशिवची पुण्यावर थरारक मात
महिलांच्या अंतिम सामन्यात धाराशिव विरुद्ध पुणे अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर धाराशिवने पुण्यावर २८–२६ असा २ गुणांनी निसटता विजय मिळवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात दोन्ही संघांना ड्रीम रनचे प्रत्येकी ४ गुण मिळाले. धाराशिवकडून मैथिली पवार (१.५२, १.२० मि. संरक्षण व ६ गुण), अश्विनी शिंदे (२.२०, २.५० मि. संरक्षण व ४ गुण), संध्या सुरवसे (१.५० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२.१०, १.५० मि. संरक्षण व ४ गुण), कोमल धारवाटकर (१.४० व १.२० मि. संरक्षण), श्वेता नवले (नाबाद १.२० व २.०० मि. संरक्षण), भाग्यश्री बडे (६ गुण) यांनी झुंजार खेळ करत सामना शेवटपर्यंत रंगतदार ठेवला.

पुरुष अंतिम सामना : पुण्याचा मुंबई उपनगरवर कडवा विजय
पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुणे विरुद्ध मुंबई उपनगर अशी प्रतिष्ठेची लढत झाली. मध्यंतराला दोन्ही संघ १६–१६ अशा बरोबरीत होते. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याने संयम राखत मुंबई उपनगरवर ३४–३२ असा २ गुणांनी निसटता विजय मिळवून अजिंक्यपदाची हॅट्रिक साकारली. पुण्याकडून शुभम थोरात (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), सुयश गरगटे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), रविकिरण कचवे (६ गुण), प्रतीक वाईकर (१.४० व १.१५ मि. संरक्षण) यांनी निर्णायक कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदवणकर (१.४५, १.२५ मि. संरक्षण व ८ गुण), निहार दुबळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), धीरज भावे (नाबाद १.३०, १.०५ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी प्रभावी खेळ करत शेवटपर्यंत झुंज दिली.

अष्टपैलू कामगिरीने वेधले लक्ष
या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने क्रीडारसिकांचे लक्ष वेधले. पुरुष गटात पुण्याच्या शुभम थोरातने तर महिला गटात धाराशिवच्या अश्विनी शिंदेने सातत्यपूर्ण खेळ करत संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला.

वैयक्तिक पुरस्कार विजेते
राजे संभाजी पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) : शुभम थोरात (पुणे), उत्कृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), उत्कृष्ट आक्रमक : सुयश गरगटे (पुणे)

अहिल्या पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) : अश्विनी शिंदे (धाराशिव), उत्कृष्ट संरक्षक : प्रियांका इंगळे (पुणे), उत्कृष्ट आक्रमक : मैत्री पवार (धाराशिव)

बक्षीस वितरण : राज्य खो-खोला नवे तेज
या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस अध्यक्ष नवनीत काॅवत, कामगार विमा संचालक डॉ.अशोक थोरात जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अरविंद विद्याधर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जे.पी शेळके अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशन बीडचे अध्यक्ष श्री ऋषिकेश शेळके सचिव श्री विजय जाहेर यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी तसेच अनेक पदाधिकारी, कार्कर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

विजयाचा थरार, खेळाडूंची जिद्द! अंतिम सामने महाराष्ट्र खो-खोला नव्या उंचीवर नेणारे अविस्मरणीय संग्राम ठरले. उत्कृष्ट आयोजन, खेळाडूंची झुंजार कामगिरी आणि शेवटपर्यंत रंगत टिकवणाऱ्या सामन्यांमुळे बीडमध्ये पार पडलेली ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र खो-खोच्या इतिहासात लक्षवेधी ठरली असून धाराशिव व पुण्याच्या यशाने राज्य क्रीडाक्षेत्रात नवे तेज निर्माण झाले आहे. उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत, उत्कृष्ट नियोजन आणि तुफानी संघर्षाने भरलेली ही स्पर्धा महाराष्ट्र खो-खोच्या वैभवशाली भविष्याची दिशा दाखवून गेली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??