स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता तारा : क्रांतीसुर्य बर्डे गुरुजी ! आज वाटेगावात बर्डे गुरुजींचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा होणार !

स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता तारा अर्थात क्रांतीसुर्य म्हणून ज्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये उल्लेख आहे, ते वाटेगावचे बर्डे गुरुजी यांचा आज ४३ वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी वाटेगाव तालुका वाळवा येथे साजरा होत आहे.
बर्डे गुरुजी म्हणजेच क्रांतिवीर दादा आप्पाजी बर्डे गुरुजी ! पारतंत्र्याचा काळ होता तो ! या देशावर ब्रिटिशांची सत्ता होती. स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता तो ! राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला होता. बर्डे गुरुजी त्यावेळी शिक्षक म्हणून काम करीत होते. महात्मा गांधीजींचे हरिजन साप्ताहिक ते नेहमी वाचत असंत. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे ४ एप्रिल १९३० ला त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. ६ एप्रिलला ते सातारा येथील सत्याग्रही छावणीत दाखल झाले. त्यांनी घरी पत्र पाठवले आणि सांगितले, स्वातंत्र्य मंदिर उभारण्याचे काम चालू आहे. त्या मंदिराच्या पायातील एखादी कपार होण्याचे भाग्य मला लाभत आहे. हे आपल्या घराण्यास एक भूषण आहे.
दिवसेंदिवस चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. ही चळवळ मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. सत्याग्रहींच्या अंगावर घोडेस्वार घातले. २३ जून १९३० ला सोलापूरला बर्डे गुरुजी गेले. तेथे सत्याग्रह केला. बर्डे गुरुजींना एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. वेळोवेळी एकत्रित त्यांना ७ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. सन १९३१ ला गांधी आयर्विन कराराने सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता झाली. त्यामुळे बर्डे गुरुजींचीही तुरुंगातून सुटका झाली.
बर्डे गुरुजींच्या जीवनात सत्याग्रहाला फार महत्त्व आहे. सोलापूर येथे कलेक्टर, डीएसपी यांना नोटीस देऊन त्यांनी सत्याग्रह केला. १९ स्वातंत्र्य सेनानींनी यामध्ये भाग घेतला. बर्डे गुरुजींनी कोल्हापुरातील खासबाग मैदानात मोठी सभा घेतली. त्या सभेतच त्यांना पेटलोंड सत्याग्रहाबद्दल पकडण्यात आले. त्यांना चार महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सुटका झाल्यावर त्यांनी काँग्रेसचे सभासद वाढवण्याचे काम सुरू केले. ते वाळवा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी १९३४ साली कुपर पार्टीचा पराभव करून काँग्रेसच्या भाऊसाहेब सोमण यांना प्रचंड बहुमताने निवडून आणले.
बर्डे गुरुजींनी क्रांतिसिंह नाना पाटील, गजानन गायकवाड यांच्या सहकार्याने किर्लोस्करवाडी येथे गाव काँग्रेस कमिटीची स्थापना केली
१९३४ साली बिळाशी येथे सातारा जिल्हा काँग्रेसचा मेळावा घेतला. या मेळाव्याचे अध्यक्षपद काकासाहेब गाडगीळ यांना दिले. सन १९४२ च्या आंदोलनात बर्डे गुरुजींनी सातारा जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ८६ पाटलांचे राजीनामे घेतले व प्रतिसरकारचा कारभार चालु केला. जंगल सत्याग्रह केला. जंगले खुली करून न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांना पकडण्यासाठी ५००० रुपयेचे बक्षीस जाहीर केले. बेळगाव येथे फितुरीने त्यांना पकडले गेले. सन १९४६ साल उजाडले. बर्डे गुरुजींची जेलमधून सुटका झाली. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या उत्साहाला उधान आले. लोकांनी उत्स्फूर्तपणे बैलगाड्या सजवल्या. १०१ बैलगाड्यांची रांग लावून त्यांची कासेगाव पासून वाटेगावपर्यंत भव्य मिरवणूक काढली.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. सर्व देशभर आनंदाची लाट उसळली. स्वातंत्र्यानंतर विधायक आणि रचनात्मक कार्यास त्यांनी वाहून घेतले. या भागातील जनतेच्या आग्रहावरून ते सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले व ते बहुमताने निवडून आले. जिल्हा परिषदेच्या कारभाराला चांगले वळण लावण्यासाठी त्यांनी बहुमोल सहकार्य केले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत असे आढळल्याने त्यांनी प्रखर विरोध केला. परंतु या माध्यमातून समाधानकारक कार्य घडत नाही असे आढळल्यावर त्यांनी पोस्टकार्ड पाठवून जिल्हा परिषदेच्या सदसत्वाचा राजीनामा दिला. १२सप्टेंबर १९८२ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचा स्मृतीदिन दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून समाज प्रबोधनाचा वसा आणि वारसा आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. अनेक साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निमित्ताने वाटेगावला हजेरी लावली आहे. विविध स्पर्धा सातत्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या निमित्ताने घडत असते. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन!
शब्दांकन..
वसंत शिंगारे, सर, वाटेगावसं,चालक, प्राथमिक शिक्षक पतसंस्था ८३२९८७४७५७