भारतीय नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान राखलाच पाहिजे…..प्रा. डॉ. सायबण्णा घोडके

मुरूम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रध्वजाची कल्पना ही राष्ट्रीय एकात्मता, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे प्रतीक म्हणून उदयास आली. सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर देशात स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली. त्या काळात एकसंध राष्ट्रीय ध्वज नव्हता. २२ जुलै १९४७ रोजी संविधानसभेने सध्याचा राष्ट्रध्वज स्वीकारला. या राष्ट्रध्वजाचा प्रत्येक नागरिकांनी मान-सन्मान राखलाच पाहिजे, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरघर तिरंगा अभियानांतर्गत बुधवारी (ता. १३) रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. घोडके म्हणाले की, राष्ट्रध्वजाचे महत्त्व केसरी : साहस, त्याग, निःस्वार्थता, पांढरा : सत्य, शांती, प्रामाणिकपणा, हिरवा : समृद्धी, शेती, प्रगती, अशोक चक्र : न्याय, धर्म, सतत गतीशीलता व प्रगती असून राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून तो स्वातंत्र्य, लोकशाही व सार्वभौमत्वाची आठवण करून देत राष्ट्रध्वजाचा पूर्व इतिहास विस्ताराने त्यांनी या वेळी मांडला. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. सपाटे यांनी राष्ट्रीय प्रतीके आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास कायम स्मरणात ठेवला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रताप सिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक बावगे तर आभार डॉ. रवी आळंगे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित व्याख्याना प्रसंगी डॉ. सायबण्णा घोडके बोलताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार व अन्य.