पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीची ५६ वी वार्षिक सभा उत्साहात सेवानिवृत्तांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सफाळे,
पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभ पालघर येथील शिक्षक पतपेढी भवन येथे संपन्न झाला.
सध्या पतपेढीची पाच विभागीय कार्यालये असून पालघर येथे दोन सुसज्ज सभागृहे कार्यरत आहेत. पतपेढीचे एकूण २३१३ सभासद असून १७.०५ कोटी रुपयांचे भागभांडवल आणि यावर्षी २.०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा असा पतपेढीचा आलेख आहे. सभासदांच्या ८९.९१ कोटी रुपयांच्या ठेवी पतपेढीकडे असून, गृहकर्ज ३० लाख आणि आकस्मित कर्ज ८० हजार रुपये इतके दिले जाते. यावर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात आला.
वर्षभरातील उत्कृष्ट कार्याबद्दल पतपेढीच्या कर्मचारी रीना पाटील यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात आला. तसेच दगडू अहिरे या कर्मचाऱ्याला उत्कृष्ट कर्मचारी अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पतपेढीच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील, संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, माजी अध्यक्ष संतोष पावडे, संघटनेचे माजी अध्यक्ष व पतपेढीचे विद्यमान संचालक प्रमोद पाटील, उपाध्यक्ष सुहास पारधी, कार्यवाह नामदेव पाटील, संचालक रखमा ढोणे, संजय पाटील, जयंता पाटील, शुभांगी पाध्ये, रंजन दुमाडा, विनोद मिश्रा, मायकल घोंसालवीस, गिरीश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संजय पाटील आणि शुभांगी पाध्ये यांनी केले.