ताज्या घडामोडी

दत्तक घेतलेल्या विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप….. शैक्षणिक पालकत्व एक हात मदतीचा..!

मुरुम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : येथील सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारे डॉ. शिवाजी सिद्राम शिंदे यांनी गरजु दत्तक घेतलेल्या तीन विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप सोमवारी (ता. ११) रोजी शिंदे गल्ली येथे करण्यात आले. यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, रुपाली शिंदे, धम्मचारी धम्मभूषण, मनोहर शिंदे, धनराज शिंदे यांच्या हस्ते प्रतीक्षा प्रभाकर कांबळे, आयशा अल्लाउद्दीन ढोबळे, रोशनी राजू कांबळे या गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आपण समाजाचं देणं लागतो या हेतूने काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आसपास आहेत. मुरूमचे सुपूत्र हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी क्षेत्रीय प्रबंधक या पदावर कार्यरत असलेले डॉ. शिवाजी शिंदे, त्यांच्या पत्नी रुपाली शिंदे या दोघांच्या विचारांमुळे त्यांनी शैक्षणिक पालकत्व अभियानांतर्गत परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थिनींना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून दिली आहे. ज्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. शिकून काहीतरी मोठे बनण्याची जिद्द आहे परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे अडचणीचे आहे. अशा विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे डॉ. शिवाजी शिंदे यांनी योजिले. या उपक्रमामुळे मुलींचे शिक्षण मध्येच बंद होणार नाही व त्या स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनतील, असा विश्वास डॉ. शिंदे, रुपाली शिंदे यांनी उपस्थित दत्तक मुलींशी आणि उपस्थिता संवाद साधताना व्यक्त केला. शिक्षणामुळे या मुली पुढे जाऊन आदर्श महिला, गृहिणी, माता बनून एक आदर्श कुटुंब व आदर्श समाज घडवतील, असे ते म्हणाले. डॉ. शिवाजी शिंदे व रुपाली शिंदे कै. सिद्राम गंगाराम शिंदे (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करतात.
धम्मचारी धम्मभूषण मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दानशील मनुष्य रणांगणावर जायला निघालेल्या एखाद्या उत्साही योद्धयासारखा असतो. प्रेमळ दयाशील दाता आदराने दान देतो आणि आपल्या अंतःकरणातील द्वेष, मत्सर, क्रोधादी सर्व विकारांना हद्दपार करतो. दानशील पुरुषाला मुक्तीचा मार्ग गवसलेला असतो. कार्यक्रमाकरिता ऐश्वर्या शिंदे, सचिन शिंदे, ज्योतीराम शिंदे, वसंत शिंदे, धनराज शिंदे, वैभव कटके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन तात्यासाहेब शिंदे तर आभार मनोहर शिंदे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, माता उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शिंदे कुटुंबीयांकडून दत्तक घेतलेल्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करताना शिवाजी शिंदे, रूपाली शिंदे व अन्य.

 

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??