ताज्या घडामोडी

प्रो कबड्डीसाठी पुणेरी पलटणचे सराव शिबीर सफाळ्यात सुरू

पालघर जिल्हा प्रतिनिधी

प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पुणेरी पलटण संघाचा पूर्वतयारी शिबिराचा शुभारंभ सफाळे येथील ओमटेक्स अकॅडमीमध्ये नुकताच सुरू झाला आहे. २५ दिवस चालणाऱ्या या विशेष सराव शिबिरासाठी संघातील १९ खेळाडूंनी हजेरी लावली असून, येथे खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा, सुसज्ज जिम आणि संतुलित आहार मिळत असल्याने सफाळ्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.

सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतच्या सरपंच तनुजा कवळी, उपसरपंच राजेश म्हात्रे, पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी रणजी क्रिकेटपटू राजेश सुतार यांच्या उपस्थितीमध्ये या सराव शिबिराचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या येथील ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर करण्यात आला.

संघाचे फिटनेस ट्रेनर संग्राम मांजरेकर, मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर, तसेच अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सरावाचे वेळापत्रक सकाळी ७ ते १० – शारीरिक फिटनेससाठी, तर संध्याकाळी ५ ते ९ – कौशल्य, खेळातील रणनीती आणि मानसिक तयारीसाठी ठेवण्यात आले आहे.

कर्णधार अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघामध्ये यंदाच्या हंगामासाठी चढाईसाठी सचिन तन्वर, तर डाव्या कव्हरसाठी गुरुदीप सिंग या दोन नवोदित आणि होनहार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याआधी बेंगळुरू व पुणे येथे सराव सत्र पार पडले असून, यावर्षी आता संघाने विजयी मोहिमेची आखणी सफाळ्यात सुरू केली आहे.

पुणेरी पलटणचे खेळाडू ३६५ दिवस कठोर सराव आणि स्पर्धात्मक मानसिकतेने मैदानात उतरत असून, यंदाच्या प्रो कबड्डी हंगामासाठी संघ पूर्ण सज्ज झाला आहे.

प्रतिक्रिया…
प्रो कबड्डी च्या सरावासाठी आवश्यक असलेले वातावरण येथे आहे. विशेषतः येथील व्यवस्थापन मंडळ खेळाडूंची विशेष काळजी घेते. सरावासाठी उत्कृष्ट अशी ॲकॅडमी आहे.
– अशोक शिंदे, अर्जुन अवॉर्ड प्राप्त
मार्गदर्शक, पुणेरी पलटण संघ

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??