ताज्या घडामोडी

प्रतिभा विद्यामंदिर, विरार येथे लायन्स इंटरनॅशनलतर्फे वृक्षारोपण व शाळा बगीचा विकास ५० हून अधिक क्लब्सचा सहभाग; ७५० हून अधिक वृक्षांची लागवड

पालघर जिल्हा प्रतिनिधी

लायन्स इंटरनॅशनल जिल्हा 3231A3 अंतर्गत ग्लोबल फोकस एरिया – पर्यावरण विभागाच्या वतीने नुकताच प्रतिभा विद्यामंदिर, खानिवडे, विरार येथे भव्य वृक्षारोपण व शाळा बगीचा विकास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक लायन्स क्लब्स सहभागी झाले. यावेळी सुमारे ७५० लहान-मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या उपक्रमाचे मुख्य पाहुणे जिल्हा राज्यपाल लायन मनोज बाबूर व फर्स्ट लेडी लायन बरखा बाबूर होते. यांच्यासह लायन नटवर बंका, लायन विकास सराफ, माजी जिल्हा राज्यपाल लायन प्रशांत पाटील, डॉ. ख्वाजा मुदस्सीर, लायन उर्वी रजिस्ट्रार, लायन भावना पटेल, लायन सुनील लवटे, लायन श्रद्धा मोरे, लायन हनुमंत भोसले, लायन अतुल दांडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्य पाहुण्यांच्या हस्ते शाळा बगीच्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर १०० हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील १००० विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत प्लास्टिक आणि ई-वेस्ट संकलनातही भाग घेतला.

उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली प्रबोधन व्याख्याने. लायन आरती सावूर यांनी “ताणतणाव व्यवस्थापन”, डॉ. विकास पाटोळे यांनी “शाश्वत इको व्हिलेज”, लायन उमेश मेस्त्री यांनी “आर्थिक आरोग्य” आणि लायन डॉ. उमेश जोशी यांनी “कचरा व्यवस्थापन” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या उपक्रमासाठी लायन्स जिल्हा प्रशासनाकडून शाळेला ₹५००० ची देणगी प्रदान करण्यात आली. तसेच लायन्स क्लब ऑफ गोकुळधाम यशोधाम कडून सर्व विद्यार्थ्यांना स्नॅक्स आणि स्टेशनरी वाटप करण्यात आले. याशिवाय ग्रीन प्लस फाउंडेशन कडून पाच होतकरू मुलींना प्रत्येकी ₹५,००० ची शिष्यवृत्ती देण्यात आली.

डॉ. उमेश जोशी (अध्यक्ष – पर्यावरण, जिल्हा 3231A3) यांनी सांगितले की, “या उपक्रमामागे केवळ वृक्षारोपण नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹१.८० लाख असून सहभाग, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन ही खरी कमाई आहे.”

शाळेचे मुख्याध्यापक महेश कुडू यांच्यासह शाळेचे अध्यक्ष नरसू पाटील, कार्यवाह पंढरीनाथ किणी यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??