नव दुर्गा विशेष – शैलपुत्री सुहासिनी ताई सदाशिव बिवलकर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
सावित्रीबाई फुले नी स्री शिक्षणाचा वसा घेऊन त्यासाठी स्वतः त्रास सहन करत मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. तसेच कार्य आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात सावित्रीबाई फुले यांचा वसा पुढे चालवत आहेत , शिक्षणासाठी गरजू मुलींनाच नव्हे तर मुलांनाही आर्थिक मदत करत आहेत. यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी….
तुमच्या विषयी काय सांगाल.
मी सुहासिनी बिवलकर, रिटायर्ड आर. बी. आय ऑफिसर. माझे पती सदाशिव बिवलकर. आम्हा दोघांनाही आधी पासून सामाजिक कार्य करण्याची इच्छा खूप होती. पण दोघांच्या नोकरीमुळे तेवढा वेळ मिळत नव्हता. तरी पण माझे पती त्यांना जी आर्थिक मदत करता येईल ती करत होते. एखाद्या गावात शाळेसाठी एखादी रूम असेल, शाळेसाठी मुलांची फी असेल , गावाच्या विकासासाठी आर्थिक मदत करत असत.
रिटायर्ड झाले की सहसा, प्रत्येक जण सतःसाठी आयुष्य जगत असतो. पण वयाच्या 75 व्या वर्षातही तुम्ही शिक्षणासाठी घेतलेला वसा पार पाडत आहात. या कार्याविषयी सांगाल.
माझे पती गेल्यानंतर आणि मीही रिटायर्ड झाल्यानंतर आधी पासून ठरवल्या प्रमाणे शिक्षणासाठी गरजू हुशार विद्यार्थ्यांना आणि विशेषतः विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य करणे हा एकच उद्देश ठेवून मी माझे कार्य गेली 20 वर्ष झाले करत आहे. विविध संस्था ज्या शिक्षणासाठी काम करतात त्यांना देणगी देऊन, व्यक्तिगत जर कोणी माझ्या कडे आले एखादी केस घेऊन तर त्या ची गरज किती , कशी आहे ते पाहून मी आर्थिक मदत करत असते. हे सर्व मी आणि माझ्या पतीने जमवलेल्या पैशाचा उपयोग मी अशा पद्धतीने करते. स्वतःसाठी सगळेच जगतात , पण समाजातील लोकांसाठी आपल्याकडून जे करता येईल ते करू या उद्देशाने मी हे कार्य चालू ठेवले आहे. न थकता , न थांबता हे कार्य मला सतत चालू ठेवायचे आहे. जोपर्यंत मी करू शकेल , तोपर्यंत मी ते करेल.
शिक्षणासाठी नव्हे तर इतर कारणांसाठी देखील तुम्ही मदत करत असतात. त्याविषयी काय सांगाल .
दुष्काळ ग्रस्त भाग असेल , पूरग्रस्त भागातील केंद्र किंवा राज्य सरकार तर्फे जे देणगी साठी आव्हान केले जाते , किंवा इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मी देणगी देत असते . एखाद्याच्या गरजेला आपण काम आलो यातच खूप मोठा आनंद आहे. या वयात हे करताना खूप समाधान आणि आनंद मिळतो.
त्यांचं बरोबर एखाद्या गावाच्या विकासासाठी , शाळेच्या विकासासाठी देखील देणगी दिली आहे.
हे कार्य करत असताना तुम्हाला कौतुकाची थाप म्हणून मिळालेल्या पुरस्कार विषयी काय सांगाल .
मी स्वतः कोणताही पुरस्कार , अवॉर्ड मला मिळावा यासाठी मी कार्य करत नाही. तर मनापासून हे करायचे होते म्हणून मी ते करते . त्यामुळे कितेक संस्थांनी मला पुरस्कार देऊ केले . पण मी ते स्वीकारले नाही. सन्मान , पुरस्कार यापेक्षा कितेक पटीने जेव्हा एखादी मुलगी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागते , तो माझ्या साठी खरा पुरस्कार आहे. असे मला वाटते.
आजपर्यंत तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीतून उच्च स्थरावर पोहचलेल्या मुला – मुलींचे काही अनुभव सांगाल.
हो, शिक्षणासाठी अगदी बारावी पासून ते उच्च शिक्षण असेल , शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत असेल अशा बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती स्वरूपात दिलेली आर्थिक मदत त्यांना आज चांगल्या नोकरी पर्यंत घेऊन गेली आहे. जेव्हा ते त्यांचा हा आनंद माझ्या बरोबर शेअर करतात. त्यावेळी आपण करत असलेल्या कार्याचे सार्थक झाले असेच वाटते.
आजच्या महिला आणि युवतींना तुम्ही काय संदेश द्याल.
तुमच्या कडे जे आहे त्याचा वापर तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी करा. जसे पैसा असेल तर चांगल्या कार्यासाठी आर्थिक मदत करा. पैसा नसेल पण जर तुमच्याजवळ कौशल्य , टॅलेंट, ज्ञान असेल तर ते शेअर करा , दुसऱ्याला तुमच्या या गुणांचा वापर करून मदत करा.