ताज्या घडामोडी

ठेकेदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण शिराळ्यात आंदोलनाची दिशा, ५० लाख मदतीसह सरकारी नोकरीची मागणी.

प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे

शिराळा (३० जुलै 2025):
शिराळ्यातील नागमणी गेस्ट हाऊस येथे आज ठेकेदार हर्षल पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण मिटिंग घेण्यात आली. या बैठकीस शिराळा सु.बे . अभियंता संघटना, मजूर संस्था संघटना, अखिल भारतीय सरपंच संघटना, शिराळा तालुका ठेकेदार संघटना, तसेच जय शिवराय शेतकरी संघटना शिराळा व इतर संबंधित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. हर्षल पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे घटक कोणते होते याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
बैठकीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
प्रमुख मागण्या : –
हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.त्यांच्या घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करावे.बांधकाम, पाणीपुरवठा व इतर शासकीय विभागांना तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून इतर ठेकेदारांवर आर्थिक ताण येऊन आत्महत्येसारख्या घटना घडू नयेत.
ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण :
हर्षल पाटील यांच्यासारखे अनेक ठेकेदार आज काम करूनही थकलेल्या बिले न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत असून नैराश्यग्रस्त आहेत. शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून हर्षल पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??