विद्यार्थ्यांसाठी वाटद-खंडाळा महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव न्यायमूर्ती आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन.
रत्नागिरी: २४ जुलै २०२५
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी तर्फे रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील श्रीम. पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचेकडील कॉमन मिनिमम प्रोग्राम सन २०२५ अंतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायमूर्ती आर. आर. पाटीलसाहेब हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते . भारतीय संविधान कलम १७ द्वारे रद्द झालेल्या अस्पृश्यता व अत्याचार याबाबत ‘ॲट्रॉसिटी अँड अनटचेबिलिटी इन को-ऑर्डिनेशन विथ द स्टेट गव्हर्मेंट’ या विषयावर तसेच सार्वजनिक क्षेत्रात केंद्रशासन व राज्यशासन यांच्यामार्फत कोणकोणत्या सेवासुविधा, योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “केवळ न्यायालयात चालणाऱ्या प्रक्रियेतूनच समाजातील घटकांना न्याय मिळतो असं नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना, वंचित आणि उपेक्षित घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध आहे. यासाठी असे कायदेविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.”
यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्य लोकअधिरक्षक कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार समिती रत्नागिरीचे ॲड. उन्मेष मुळ्ये यांनी देखील उपस्थित राहून शिक्षणाचा मूलभूत अधिकार व बाल संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कायदासाठी अरुण मोर्ये यांनी केले तर सूत्रसंचालन प्रभाकर धोपटसर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामनाथ आडाव व सचिव समीर बोरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य जगतापसर, आनंद पाटीलसर, राजेश जाधवसर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे तेजस मोडक, महेंद्र नार्वेकर, सर्व शिक्षकवृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.