जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लोक सहभाग वाढला पाहिजे – आ. जयंतराव पाटील

वाळवा पंचायत समितीत विशेष शैक्षणिक कार्यशाळा संपन्न
इस्लामपूर :प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लोक सहभाग वाढला पाहिजे. असे मत माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले. ते वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने “एकजुट- सर्वांगीण शालेय विकासासाठी” या उद्देशाने आयोजित विशेष शैक्षणिक कार्यशाळेत उपस्थित राहून बोलत होते .यावेळी आ. पाटील पुढे बोलताना म्हणाले की, वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. आबासाहेब पवार यांनी पुढाकार घेऊन आज गावपातळीवरील सर्वांना एकत्रित करत ह्या कार्यशाळेचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.मॉडेल स्कूल संकल्पनेतून आपण आपल्या तालुक्यातील शाळांचा भौगोलिक विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक शाळांची भौगोलिक गुणवत्ता सुधारली आहे. जास्तीत जास्त लोकांनी शिक्षण घेतल्याने अर्थार्जनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. म्हणून शैक्षणिक गुणवत्ता देखील सुधारण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.
यासाठी महिन्यातून एकदा शाळा व्यवस्थापन समितीने बैठक घेऊन शाळेच्या व विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत चर्चा केली पाहिजे. विविध क्षेत्रातील निवृत्त अधिकारी किंवा ग्रामस्थांचा सहभाग वाढवून अधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न प्रत्येक गावाने केला पाहिजे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून गावपातळीवर सर्वांनी एकत्र येऊन शाळेत वातावरण उत्तम ठेवता आले पाहिजे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी प्रगतीचा लेखाजोखा विद्यार्थ्यांच्या समोर मांडला तर शाळेबद्दल व शिक्षणाबद्दल मुलांची ओढ वाढेल. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होईल. त्यांना ध्येय ठरविण्यासाठी मदत होईल.यावेळी गटविकास अधिकारी श्री. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार, ग्यानप्रकाश फाउंडेशनचे अजय पाडळे, प्रशांत भोसले, तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.