माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण

मुरूम, ता. उमरगा, ता. २९ (प्रतिनिधी) : पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायभिमुख शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण पत्रकारिता, अंगणवाडी-बालवाडी सेविका प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, संवाद कौशल्य यासारखे अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब मुरूम सिटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामार्फत ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित प्रमाणपत्राचे वितरण सोहळा मंगळवारी (ता. २९) रोजी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र आळंगे, पत्रकार राजेंद्र कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या अभ्यासक्रमासाठी ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांचा एकूण निकाल ८९ टक्के लागला. यामध्ये श्रीमती रेखा सूर्यवंशी (प्रथम), लिंबाजी सुरवसे व विकास गायकवाड (द्वितीय), अप्पाराव पाटील (तृतीय), योगिता हरके व जगदीश सुरवसे (चतुर्थ), प्रियंका गायकवाड (पाचवी) क्रमांक पटकाविला तर महादेव पाटील, मोहन जाधव, आकाश पोतदार, विशाल देशमुख, प्रभाकर महिंद्रकर आदींनी विशेष श्रेणी मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, पत्रकार हा निर्भीड व रोखठोक असला पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अशा सर्टिफिकेट कोर्सचा विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, पत्रकारांनी वास्तविकतेचे भान ठेवून लेखनातून समाज प्रबोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी व्यवसाय व नोकरी करत-करत निरंतर शिक्षण घेऊन स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. यावेळी डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. सुजित मटकरी, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकुंद धुळेकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. सुशिल मठपती, डॉ. अरुण बावा, डॉ. रमेश आडे, अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभ्यासक्रमाचे समन्वय प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. राम बजगिरे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वाटप करताना मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी.