ताज्या घडामोडी

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे गौतमी नदीत पाणीसाठा वाढला

Spread the love

पावस :—केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील पावस गौतमी नदीवर भूमिगत बंधाऱ्यासह कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा गेल्यावर्षी बांधण्यात आला होता . त्याला यावर्षी सरपंच चेतना सामंत आणि प्रविण उर्फ बाय शिंदे यांच्या सुचनेनंतर झडपे बसविण्यात आली . त्यामुळे या नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे . तसेच या परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे .रत्नागिरी जिल्हाधिकारी एम . देवेंदर सिंह आणि जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवायला सुरुवात केली . त्यातूनच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पावस ग्रामपंचायतीमध्ये नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गौतमी नदीतील गाळ काढण्यात आला . त्यासाठी रत्नागिरी तालुक्याचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून भरीव निधीही दिला . त्यामुळे गौतमी नदी गेल्यावर्षी प्रवाहित झाली होती . यावर्षी शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा आणि बंधारे मिशनच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पावस ग्रा.पं.च्या सरपंच चेतना सामंत , उपसरपंच प्रविण
शिंदे , ग्रामसेवक विनोद गुरव तसेच तंटामुक्त अध्यक्ष संतोष सामंत आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी केलेल्या चांगल्या योगदानामुळे हा बंधारा पूर्ण झाला . त्यासाठी स्थानिक सदस्य अजय पानगले , मनिषा शिंदे , सरिता चव्हाण यांनी नियमितपणे यावर लक्ष केंद्रीत केले होते . अखेर या कोल्हापुरी बंधाऱ्याला झडपे बसवून ती झडपे झिरपू नयेत म्हणून त्यामध्ये माती टाकून पूर्णपणे बंधारा बंद करण्यात आला . त्यामुळे या गौतमी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला असून सुमारे १ कि.मी. परिसर पाण्याने व्यापून गेला आहे . हा बंधारा प्रसिद्ध उद्योजक किरण शिंदे यांनी साकारला असून येणाऱ्या पर्यटकांनाही तो आता मोहित करु लागला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!