नव दुर्गा विशेष – माँ कुष्मांडा डॉ. रंजना कदम – पोवार

संस्थापिका – उमेद केअर सेंटर
आजकालच्या धकाधकीच्या/स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी/स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. अश्या वेळी आपल्या कुटुंबातील उमेदीची वर्षे हरपलेल्या वयोवृद्ध, आजारी किंवा अंथरुणाला खिळलेल्या कुटुंबीयांची काळजी घेणे फारच जिकिरीचे असते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती अंथरुणाला खिळली तरी त्या व्यक्तीची नर्सिंग केअर घेणे व तिची देखभाल करणे फारच कठीण होऊन जाते. अशावेळी या आजारी प्रियजनांची घरच्याप्रमाणे काळजी व नर्सिंग केअर घेणाऱ्या माणसांची फारच गरज वाटू लागते. अश्या वेळी उमेदीची वर्षे हरपलेल्यासाठी उमेद घेऊन येणाऱ्या आजच्या आपल्या नव दुर्गा आहेत, डॉ. रंजना कदम – पोवार. यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी….
उमेद केअर सेंटर (नर्सिंग केअर) ची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने झाली?
माझ्या मैत्रिणीच्या आई – बाबा त्यांना देखभालीची गरज होती. मैत्रीण नोकरी करत असल्याने आम्ही दोघी अश्या प्रकारचे एखादे सेंटर आहे का म्हणून पूर्ण पुणे, मुंबई विविध ठिकाणी चौकशी केली . वृध्दाश्रम खूप होते पण जिथे आपली व्यक्ती म्हणून पूर्ण काळजी घेऊन त्यांना बरे केले जाईल आणि एका नवीन उमेदीने ते घरी परत येतील असे सेंटर आम्हाला कुठेही भेटले नाही . नेमकी हीच गरज ओळखून समाजाचे ऋण फेडण्याच्या विचारापोटी “उमेद केअर सेंटर” या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी काळजीवाहू सेंटरची स्थापना ७ सप्टेंबर २००० साली केली. यासाठी मला मोलाची साथ आणि सहकार्य मिळाले ते पती डॉ. राजाराम पोवार यांचे. तेव्हापासून आजपर्यंत गेली २५ वर्षे अहोरात्र हजारो वयोवृद्ध, आजारी, अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची प्रेमाने देखभाल करून अनेक कुटुंबीयांना जगण्याची ‘उमेद’ उमेद केअर सेंटरने दिली.
उमेद केअर सेंटरमध्ये कोणाला अॅडमिट करता येते? आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात.
१. अंथरुणाला खिळलेले (बेडरीडन), २. पॅरलिसीस, ३. फ्रॅक्चर, ४. कोमा, ५. अल्झायमर (स्मृतिभ्रंश), ६. डिमेंशिया, ७. कॅन्सर, ८. बेडसोअर असे सर्व प्रकारचे पेशंट असतात. त्यांना १. प्रशिक्षित व प्रेमळ नर्सेसद्वारे देखभाल. २. रोज डॉक्टरांकडून तपासणी. ३. प्रत्येकाच्या आजारांप्रमाणे आहार. ४. इमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या उपकरणांची सोय. ५. सर्वच सण-वार, आजी-आजोबांचे वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात. ६. अनाथ आजी-आजोबांचा मोफत सांभाळ केला जातो. ७०% लोकांकडून परवडेल इतकीच फी घेतली जाते. आणि 30% लोकांना जे रस्त्यावर सोडून दिलेले अनाथ आई – वडील आहेत . त्यांना मोफत उपचार दिले जातात.
उमेद केअर सेंटर सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागले?
तसे रोजचा दिवसच आमच्या सर्वांसाठी आव्हानात्मक असतो. पण मला आठवते जेव्हा मी सेंटर सुरू केले त्यावेळी आमच्या कडे स्मृतीभ्रंश झालेले पेशंट आले होते . जे अंथरुणाला खिळलेले होते. स्मृतीभ्रंश विषयी आम्हाला पेशंट च्या घरच्यांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती. जसं जसे रोज मी आणि माझा स्टाफ त्यांची देखभाल करत होतो तसे आम्हाला हे जाणवायला लागले. ही पहिलीच केस असल्याने मलाही लक्षात येत नव्हते. तेव्हा मी या संदर्भातील संबंधित लेख वाचायला सुरुवात केली. अमेरिकेतील एका लेखकाने लिहिलेल्या लेखात स्मृतीभ्रंश आणि त्याचे टप्पे याविषयी वाचल्यावर लक्षात आले की हा स्मृतीभ्रंश चा एक प्रकार आहे. आणि त्यात वेगवेगळे टप्पे आहेत. जे मला आणि माझ्या स्टाफ ला समजून घेणे आणि पेशंटला तश्या पद्धतीने हॅण्डल करणे आम्हाला खूप आव्हानात्मक होते. हळू हळू याचा सखोल अभ्यास केल्यावर आम्ही पूर्ण तःह अश्या केसेस दाखल करून त्यांची व्यवस्थित देखभाल करत त्यांना पूर्णपणे बरे करू लागलो.
तुम्ही याबरोबरच काही वेगळे उपक्रम करता का ?
कोविड चा परिणाम जितका इतर क्षेत्रावर झाला तसा आमच्या सेंटर वर हि झाला . पण त्यावेळी नर्सिंग , नर्सेस याना खूप मागणी होती. मी रिमांड होम मधील काही मुलींना दत्तक घेतले आहे . माझ्या इथे त्यांच्यासाठी राहणे – खाणे – पिणे याबरोबरच नर्सिंग चे प्रशिक्षण आणि नंतर त्यांचे लग्न करून त्यांना चांगल्या घरात सेटल करणे . हा एक स्तुत्य असा उपक्रम राबविला जातो. नर्सिंग चा एक कोर्स मी स्वतः डिझाईन केला आहे. त्यामुळे या मुलींनाच नव्हे तर ज्यांना नर्सिंग या क्षेत्रात यायचे आहे , करिअर करायचे आहे अश्या मुलींना देखील हा कोर्स करता येतो आणि बऱ्याच महिला आणि मुलींनी याचा लाभ घेतलेला आहे . आणि आज त्या चांगल्या हॉस्पिटलस मध्ये कार्यरत आहे. कोविड काळात माझ्या कडे शिकलेल्या नर्सेस ला काम मिळाले आणि त्या अर्थार्जन करू शकल्या.
उमेदच्या या आगळ्या वेगळ्या कार्याची दखल घेऊन विविध संस्था आणि समाजाने उमेदला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
भविष्यातील तुमच्या नवीन प्रोजेक्ट विषयी काय सांगाल.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात डिप्रेशन, डेमेंशिया आणि अल्झायमर या मानसिक आजारांचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येते. यासाठी याविषयीची जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. हे कशामुळे , का होते ? असे पेशंट कसे ओळखायचे, म्हणजे लगेचच त्यावर उपचार करता येतील. यासाठी मी याची मोफत जनजागृती कार्यशाळा कॉलेज, शाळा आणि संस्था या द्वारे व्याख्यान, या मानसिक आजाराशी झुंज देणाऱ्या पेशंटशी बोलून समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. जे पूर्णपणे मोफत असेल.
आजच्या युवती आणि महिलांना काय संदेश द्याल.
आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या पुरताच न करता इतरांपर्यंत ते पोहचवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचे स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करा आणि त्या साठी केवळ चार भितींमध्ये न राहता घराबाहेर पडा आणि स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण करा. तुमच्यातील कलागुण , तुमचे कार्य नक्कीच दुसऱ्यांना उमेद देण्यासाठी उपयोगी येतील.
शब्दांकन..
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन