ताज्या घडामोडी

लालठाणे गावात ‘कॉर्डन सिस्टीम’द्वारे पिण्याच्या पाण्याचा शाश्वत उपाय, सुधीर पाटील यांचे प्रतिपादन  – लायन डॉ. दीपक चौधरी यांच्या पुढाकाराने नवे जलसंधारण मॉडेल

सफाळे ता.२१

ऐतिहासिक तांदूळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या लालठाणे गावाने पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात केली आहे. डोंगराच्या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी साठवून ते गावाला दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे मॉडेल जिल्ह्यात इतरत्रही उपयुक्त ठरेल असा आशावाद विना वर्ल्डस चे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या माध्यमातून आणि सी एस आर पार्टनर वीणा वर्ल्डच्या सहकार्याने पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. दीपक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि झोन चेअर पर्सन प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने लालठाणे येथे बांधण्यात आलेल्या

कॉर्डन सिस्टीम’ या अभिनव जलसंधारण प्रकल्पाचे उद्घाटन  रविवारी (तारीख २१) मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुधीर पाटील उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना  पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तथा जिल्हा जलसंवर्धन प्रमुख डॉ. दीपक चौधरी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या या गावातील महिलांना आणि नागरिकांना दररोज २ ते ३ किमी पायपीट थांबणार असून अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात इतरत्रही निर्माण केले जातील. लायन्स क्लबच्या माध्यमातून आता पर्यंत105 पेक्षा अधिक चेक डॅम बांधून झाले आहेत. जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा सारख्या भागामध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी लायन्स क्लब ने पुढाकार घेतला आहे.लालठाणे गावाच्या डोंगरमाथ्यावर अनेक लहान झरे आहेत, मात्र ते झरे वापरात न येता वाया जात होते. यावर उपाय म्हणून ‘कॉर्डन सिस्टीम’ वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये: डोंगरमाथ्यावर ३०,००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. परिसरातील सर्व नैसर्गिक झऱ्यांचे पाणी या टाकीत एकत्र करून पाईपलाइनद्वारे हे पाणी गावात पोहोचवले आहे . या योजनेमुळे लालठाणे गावातील नागरिकांना पावसाळ्यानंतर संपूर्ण वर्षभर स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांची पायपीट थांबेल, आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळेल आणि गावात स्वच्छतेची पातळीही उंचावेल.या योजनेच्या अंमलबजावणीत स्थानिक ग्रामस्थ, जलतज्ज्ञ, आणि सामाजिक संस्था सक्रिय सहभाग असून, हा प्रकल्प इतर पाणीटंचाईग्रस्त गावांसाठीही एक आदर्श मॉडेल ठरू शकतो. या अभिनव प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वीना वर्ल्डस चे अध्यक्ष सुधीर पाटील, जलसंवर्धन प्रमुख तथा पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. दीपक चौधरी, झोन चेअर पर्सन प्रमोद पाटील, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष श्रीकांत परब, लायन्स क्लब ऑफ सफाळे चे प्रेसिडेंट मनोज म्हात्रे,, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश चुरी, लालठाणे गावच्या उपसरपंच जुईली पाटील, सामाजिक कार्यकर्ते जतिन पाटील, माधव पाटील तसेच लायन्स क्लबचे मेंबर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??