राष्ट्रीय अभियंता दिन ईश्वरपुर येथे साजरा

दिनांक 15 सप्टेंबर हा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. सदर अभियंता दिनाचे औचित्य साधून महावितरण मधील इस्लामपूर विभागांतर्गत सर्व अभियंत्यांनी सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) मार्फत आजचा हा अभियंता दिवस डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालय इस्लामपूर येथे जाऊन साजरा केला. महावितरण चे इस्लामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता व संघटनेचे माजी पदाधिकारी माननीय श्री विजय माळी साहेब यांनी अभियंता दिन केवळ औपचारिकतेपुरता साजरा न करता समाजासाठी उपयुक्त ठरेल असे कार्य घडावे, हीच खरी अभियंत्यांची जबाबदारी आहे व समाजातील वंचित, गरजवंत व दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देणे हे प्रत्येक अभियंत्यांचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. त्याच अनुषंगाने इस्लामपूर विभाग अंतर्गत कार्यरत महावितरणमधील अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर निवासी शाळेला बसण्यासाठी 3 वर्गांसाठी 12 बेंच भेट दिले. तसेच अभियंता सौ. शैलजा जगताप मॅडम यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या दिवशी सर्व दिव्यांग विद्यार्थी यांना खाऊ वाटप केला. सदर कार्यक्रमा वेळी SEA संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी श्री गणेश आवळे,सर्कल सेक्रेटरी श्री ओमकार डूके,व सचिन जगताप साहेब यांनी आपआपल्या मनोगतामधे या मूकबधिर शाळेतील सर्व विद्यार्थी भविष्यातील डॉक्टर इंजिनीयर सारख्या उच्च पदावर नक्की काम करतील असा विश्वास व्यक्त केला व सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी यांना विद्युत सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमावेळी SEA सोसायटीचे व्हा.चेअरमन जितेंद्र पाटील, SEA विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन जाधव,विभागीय सचिव अमोल भेडसगावकर,नेर्लेकर डॉक्टर व महावितरण मधील सर्व उपकार्यकारी अभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक अभिमन्यू पाटील सर यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल SEA संघटनेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “महावितरणच्या अभियंत्यांनी दिलेली ही भेट आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तसेच त्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेला यामुळे मोठा आधार मिळेल, व यातूनच सक्षम व सुसंकृत भावी पिढी घडेल अशी आशा व्यक्त केली.