ताज्या घडामोडी

नाना पाटेकर – अभिनयाच्या पलीकडचा माणूस

भारतीय सिनेसृष्टीत काही नावे अशी आहेत जी केवळ अभिनेता म्हणून उरत नाहीत. ती एक प्रवृत्ती बनतात, एक विचार बनतात, एक ज्वालामुखी बनतात. नाना पाटेकर हे अशाच ज्वालामुखीचे नाव आहे. ज्याच्या पोटात शांतता आहे, पण वेळ आली की जो आग ओकल्याशिवाय राहत नाही.

नाना पाटेकर म्हणजे काय? हा प्रश्न सोपा नाही. ते एकाच वेळी अनेक गोष्टी आहेत. ते क्रांतिवीर आहेत, ते प्रहार आहेत, ते परिंदा आहेत, ते वेलकम आहेत, आणि ते नाम फाउंडेशनवाले नाना सुद्धा आहेत. त्यांना एका चौकटीत बसवणे अशक्य आहे, कारण चौकट मोडणे हाच त्यांचा स्थायीभाव आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनय, संवादफेक आणि व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्याची शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले.

नानांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तो जगणे वाटतो. ते भूमिका करत नाहीत, ते भूमिका जगतात. त्यांचा प्रत्येक संवाद हा घशातून येत नाही, तो पोटातून येतो. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता असते, एक आग असते. ती आग कॅमेऱ्याला जाळते आणि प्रेक्षकाच्या काळजात घुसते.

`परिंदा (१९८९) मधील अण्णा आठवतो? विधू विनोद चोप्रांचा तो चित्रपट. मुंबईच्या अंडरवर्ल्डवरचा. त्यात नाना खलनायक होते, पण असे खलनायक की ज्याच्याकडे पाहून भीती वाटण्यापेक्षा त्याच्या वेडेपणाचे आकर्षण वाटावे. त्या भूमिकेने नानांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला – सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा.

मग आला `अग्निसाक्षी(१९८९). जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित यांच्यासोबत. त्यात एक विकृत, संशय घेणारा नवरा. बायकोवर जीवापाड प्रेम करणारा, पण त्या प्रेमातच तिला गुदमरवणारा. त्या भूमिकेसाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दोन वर्षात दोन राष्ट्रीय पुरस्कार.

आणि मग आला तो चित्रपट, ज्याने नानांना देवत्व दिले – `क्रांतिवीर’ (१९९४). मेहुल कुमार दिग्दर्शित. “आ गयी है… क्रांतिवीर की बारी” आणि तो दीड मिनिटाचा एकाच शॉटमधला मोनोलॉग – “आए… एक हिंदुस्तानी…”

तो मोनोलॉग आजही प्रत्येक कॉलेजच्या स्टेजवर, प्रत्येक भाषणात ऐकू येतो. वर्तमानपत्राच्या बातम्या वाचत, व्यवस्थेवर थुंकणारा तो प्रताप. भ्रष्टाचार, जातीयवाद, राजकारण यावर आग ओकणारा तो नायक. त्या भूमिकेसाठी नानांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर मिळाले. नाना म्हणजे क्रांतिवीर हे समीकरण तेव्हापासून पक्के झाले.

`तिरंगा” मधला तो कडक देशभक्त पोलीस, `अपहरण मधला बिहारचा बाहुबली राजकारणी तब्बल, `अब तक छप्पन`मधला एन्काउंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे – प्रत्येक भूमिका वेगळी, प्रत्येक भूमिका अंगावर येणारी.

आणि मग एका क्षणात नाना आपल्याला हसवतात. `वेलकम`मधला उदय शेट्टी. “कंट्रोल… उदय… कंट्रोल…” म्हणणारा डॉन. त्याच तोंडाने, त्याच डोळ्यांनी ते आपल्याला पोट धरून हसवतात. हेच नानांचे वेगळेपण आहे. ते रडवतात तेव्हा डोळ्यात पाणी येते आणि हसवतात तेव्हा पोट दुखते. कारण ते दोन्ही खरे असते.

त्यांच्या संवादफेकीची शैली तर अभ्यासाचा विषय आहे. शब्द चावून-चावून फेकणे, मधेच एकदम शांत होणे, आणि मग ज्वालामुखीसारखा फुटणे. हा नाना पाटेकर पॅटर्न आज अनेकजण कॉपी करतात, पण मूळाची सर कॉपीला येत नाही.

नाना पाटेकर यांचा प्रवास केवळ हिंदी चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीशी त्यांचे जवळचे नाते होते. किंबहुना, नानांचा पाया हाच मराठी आहे.

त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे. वडील दिनकर पाटेकर चित्रकार. आई. घरची परिस्थिती बेताची. नानांनी आपले शिक्षण मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून घेतले. ते मूळचे चित्रकार. आणि चित्रकाराची नजर त्यांच्या अभिनयात दिसते. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक हावभाव ते चित्रासारखा रंगवतात.

अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही त्यांनी काम केले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये `गमन या चित्रपटातून झाली. पण खरी ओळख मिळाली ती ८० च्या दशकात. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

मराठीत त्यांनी `प्रहार हा चित्रपट दिग्दर्शित केला. एका सैनिकाच्या आयुष्यावरचा. त्यांच्या स्वतःच्या लष्करी प्रशिक्षणाच्या अनुभवावरून. त्यांनी `प्रहार,’ साठी टेरिटोरियल आर्मीमध्ये तीन वर्षे सेवा केली, खरोखर कमांडो ट्रेनिंग घेतले. नाना असे का करतात? कारण त्यांना दिखावा करायचा नाही, त्यांना जगायचे असते. तो सिनेमा आजही मराठीतील सर्वोत्तम सिनेमांपैकी एक मानला जातो.

`नटसम्राट (२०१६) हा मराठी सिनेमाच्या इतिहासातला मैलाचा दगड. वि.वा. शिरवाडकरांच्या नाटकावर आधारित. एका नटाची शोकांतिका. अप्पा बेलवलकर. नानांनी ती भूमिका केली नाही, ती जिवंत केली. त्या चित्रपटात नाना नव्हते, अप्पाच होते. ज्या वयात लोक रिटायर होतात, त्या वयात नानांनी आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्कृष्ट भूमिका केली. “कुणी घर देता का घर…” म्हणताना थिएटरमध्ये प्रेक्षक रडला नाही तरच नवल.

मराठी रंगभूमीवर त्यांनी `पुरुष`गिधाडे सारखी नाटके गाजवली. विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले.

नाना पाटेकर बद्दल बोलायचे तर केवळ त्यांच्या सिनेमांबद्दल बोलून चालणार नाही. त्यांच्या सिनेमाबाहेरच्या आयुष्याबद्दल बोलावेच लागेल. कारण तिथेच खरा नाना आहे.

नाना हा इंडस्ट्रीतला सर्वात परखड, स्पष्टवक्ता माणूस मानला जातो. त्याला खोटेपणा सहन होत नाही. सेटवर वेळेवर येणे, आपले संवाद पाठ असणे, सहकलाकारांचा आदर करणे – या गोष्टी नानांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे अनेकदा ते उद्धट, तापट वाटतात. पण हा तापटपणा अहंकारातून नाही, तर कामावरच्या निष्ठेतून येतो.

२०१५-१६ च्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळत होता. शेतकरी आत्महत्या करत होते. तेव्हा मुंबईत एसीमध्ये बसून ट्विट करण्यापेक्षा नाना थेट मातीत उतरले. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी `नाम फाउंडेशन काढली.या फाउंडेशनने आजवर हजारो शेतकऱ्यांच्या विधवांना मदत केली आहे. त्यांना चेक देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, गावांमध्ये पाणी अडवणे, नदी खोलीकरण करणे. नाना स्वतः विदर्भात, मराठवाड्यात फिरतात. अनवाणी. कोणताही गाजावाजा नाही. कोणतीही जाहिरात नाही. ते म्हणतात, “मदत ही दान नाही, ती जबाबदारी आहे.”

त्यांचे राहणीमान आजही अत्यंत साधे आहे. मुंबईत वन बेडरूमच्या घरात राहतात. स्वतःची शेती करतात. स्वतःचे कपडे स्वतः धुतात. कोट्यवधी रुपये कमवणारा माणूस इतका साधा कसा राहू शकतो? पण नाना राहतात. कारण त्यांना माहीत आहे – “पोट भरेपर्यंत पैसा पाहिजे, त्यानंतर तो फक्त आकडा आहे.”

लष्कराबद्दल त्यांना असले प्रेम सर्वांना माहीत आहे. कारगिल युद्धाच्या वेळी ते स्वतः बॉर्डरवर जाऊन जवानांसोबत राहिले होते. जवानांसाठी ते देवासारखे आहेत.

वादांचाही त्यांच्या आयुष्यात वाटा आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा ते वादात सापडले. पण नानांनी कधीही आपली भूमिका बदलली नाही. ते जे आहेत, तेच दिसतात. आणि जे दिसतात, तेच असतात. “दिसावं तसं असावं, असावं तसं वागावं” हे वाक्य नानांना तंतोतंत लागू पडते.

आज वयाच्या ७५ व्या वर्षीही नाना तितकेच सक्रिय आहेत. द` काश्मीर फाइल्स,ओले आले“नटसम्राट` ‌ नंतरही ते सतत काहीतरी नवीन करत आहेत. ओटीटीवरही त्यांनी काम केले आहे.

नाना पाटेकर यांची गोष्ट ही केवळ एका अभिनेत्याची गोष्ट नाही. ती एका आर्टिस्टची गोष्ट आहे, जो चित्र काढतो, भूमिका जगतो. ती एका सैनिकाची गोष्ट आहे, जो देशावर प्रेम करतो. ती एका शेतकऱ्याची गोष्ट आहे, जो मातीवर प्रेम करतो. आणि ती एका माणसाची गोष्ट आहे, जो माणुसकीवर प्रेम करतो.

म्हणूनच नाना पाटेकर हे नाव नाही, तो एक विचार आहे. तो विचार सांगतो – “अभिनयात खोटे चालेल, पण आयुष्यात खरेपणा पाहिजेच.”
*नानांना भावपूर्ण श्रद्धांजली…!!*

*प्रा दिलीप आनंदराव जाधव सांगली*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??