प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पुरुषांच्या मैदानावर श्री समर्थ, विद्यार्थी केंद्र, सरस्वती, वैभव, अन् अमर हिंदची विजयी धडक!
श्री समर्थ आणि सरस्वतीचे एकतर्फी विजय; विद्यार्थी केंद्राची चुरशीच्या लढतीत बाजी
मुंबई, दि. २० नोव्हेंबर (क्री. प्र.) : प्रतिस्पर्ध्याला गुणांसाठी झुंजवणारी आक्रमकता, संरक्षणात संयम आणि निर्णायक क्षणी विजयाची संधी साधण्याची धमक… पुरुषांच्या खो-खो मैदानावर दुसऱ्या दिवशी या गुणांचा प्रत्यय आला! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित आणि अथेना ग्लोबल लॉजिस्टिक पुरस्कृत पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या लढतींमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी वैभव स्पोर्ट्स क्लब, श्री समर्थ व्यायाम मंदिर, विद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि अमर हिंद मंडळाने विजय मिळवत आगेकूच केली. काही संघांनी प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने नमवले, तर विद्यार्थी क्रीडा केंद्राने अखेरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय खेचून आणला.
वैभवची संघशक्तीवर एक डाव तीन गुणांनी मात
पुरुषांच्या पहिल्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने संघशक्तीचा १५-१२ असा एक डाव आणि तीन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला १५-५ अशी भक्कम आघाडी मिळवणाऱ्या वैभवने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड घट्ट केली. वैभवच्या निहाल पंडित (२.१० मिनिटे संरक्षण व ५ गुण), प्रणव कुंभार (२.२० मिनिटे संरक्षण), मोहक सावंत (२ मिनिटे संरक्षण) आणि निमेश चौगुले (३ गुण) यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. संघशक्तीकडून सुजल शिंत्रे (२.३० व १.३० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि आर्यन जाधव (६ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला; मात्र सुरुवातीची मोठी पिछाडी भरून काढण्यात त्यांना अपयश आले.
श्री समर्थची ॐ साईश्वरवर दमदार बाजी
दुसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने ॐ साईश्वर सेवा मंडळाचा १४-११ असा एक डाव आणि तीन गुणांनी पराभव करत शानदार विजय नोंदवला. मध्यंतराला १४-५ अशी आघाडी घेत श्री समर्थने प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक वर्चस्व मिळवले. श्री समर्थच्या अक्षय खापरे (२.३० मिनिटे संरक्षण व ४ गुण), सूरज खाके (२.३० मिनिटे संरक्षण व ३ गुण), साहिल अवघडे (१.३० मिनिटे संरक्षण) आणि यश बोरकर (३ गुण) यांनी श्री समर्थच्या विजयाला आकार दिला. पराभूत ॐ साईश्वरकडून साई टेंबुलकर (१ मिनिट संरक्षण व २ गुण), आदित्य राणे (१ मिनिट संरक्षण व १ गुण) आणि सोहम कांबळे (३ गुण) यांनी लढत रंगवली; मात्र विजयाची संधी साधण्यात त्यांना अपयश आले.
विद्यार्थी क्रीडा केंद्राची चुरशीच्या लढतीत बाजी
दिवसातील सर्वाधिक चुरशीच्या सामन्यांपैकी एक ठरलेल्या तिसऱ्या लढतीत विद्यार्थी क्रीडा केंद्राने अमर हिंद मंडळाचा १२-११ असा एका गुणाने पराभव केला. मध्यंतराला ११-६ अशी आघाडी असलेल्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने अखेरच्या टप्प्यात प्रतिस्पर्ध्याचे आव्हान परतवून लावत विजय मिळवला. सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब झाले. विद्यार्थीच्या प्रतीक घाणेकर (२.२० मिनिटे व नाबाद २ मिनिटे संरक्षण), शुभम शिंदे (१.३० व १.३० मिनिटे संरक्षण व ३ गुण), सम्यक जाधव (१.१० व १.३० मिनिटे संरक्षण व १ गुण) आणि हर्ष कामतेकर (१.३०, १.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) यांनी विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले. अमर हिंदकडून प्रणय प्रधान (१.२० व १ मिनिट संरक्षण व ३ गुण), प्रसाद राडीये (१.३० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि निरव पाटील (१.१० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी शेवटपर्यंत झुंज देत सामना रंगतदार केला. मात्र एका गुणाने विजय हुकल्याने अमर हिंदला निराशेचा सामना करावा लागला.
सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा श्री समर्थ ‘ब’वर एक डाव पाच गुणांनी विजय
पुरुषांच्या चौथ्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने श्री समर्थ व्यायाम मंदिर (ब)चा १४-९ असा एक डाव आणि पाच गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी मोठी आघाडी मिळवणाऱ्या सरस्वतीने प्रतिस्पर्ध्याला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. सरस्वतीच्या ओंकार घवाळी (२.१० मिनिटे संरक्षण व ५ गुण), राहुल जावळे (२.४० मिनिटे संरक्षण व १ गुण), श्रीकांत वल्लकाठी (२.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) आणि प्रसाद पठाडे (२ मिनिटे संरक्षण व १ गुण) यांच्या प्रभावी कामगिरीने सरस्वतीला सहज विजय मिळवून दिला. श्री समर्थ (ब) कडून साई गुरव (१.२० व १.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) आणि मुफीद लांजेकर (१ व १.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) यांनी प्रतिकार केला; पण मोठी पिछाडी कमी करण्यात त्यांना यश आले नाही.
श्री समर्थची विजय क्लबवर सरशी
संक्षिप्त निकालात श्री समर्थ व्यायाम मंदिरने विजय क्लबचा ४-२ असा एक डाव आणि दोन गुणांनी पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. श्री समर्थने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखत विजयाची नोंद केली.
अमर हिंदची युवक क्रीडा मंडळावर आठ गुणांनी मात
दिवसाच्या आणखी एका पुरुष सामन्यात अमर हिंद मंडळाने युवक क्रीडा मंडळाचा १२-४ असा आठ गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. अमर हिंदने आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत विजय मिळवला.



