ताज्या घडामोडी

मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालय,बीवायएल नायर हॉस्पिटल,लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायन मध्ये शिक्षण घेणारे फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी या विषयांतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी दिनांक 30 जुलै 2025 पासून शासनाच्या धर्तीवर विद्यावेतन (Stipend) वाढीची मागणी करत आहेत.

या संदर्भात M.A.P.O.R.I. (Maharashtra Association of Physiotherapy and Occupational Therapy Residents and Interns – BMC Division) या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी माननीय आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर सौ. रितू तावडे यांची भेट घेऊन विद्यावेतनवाढीसंदर्भातील निवेदन सादर केले.

विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत महापौर महोदयांनी या विषयावर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान M.A.P.O.R.I. – BMC Division तर्फे खालील प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. चैतन्य ढाकणे (OT)

डॉ. सिद्धेश खंडागळे (OT)

डॉ. तनय भराडकर (PT)

डॉ. ऋषिकेश माळवे (PT)

यावेळी माननीय आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या विद्यावेतनवाढीच्या मागणीसाठी सहकार्य करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला.

ठळक मुद्दे – शासन व मुंबई महानगरपालिका विद्यावेतनातील तफावत

राज्य शासनाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दिनांक 1 जून 2025 पासून शासन निर्णय क्रमांक.एमइडी-1024/प्र.क्र.285/24/शिक्षण-2 या अंतर्गत वाढ करण्यात आली आहे.

इंटर्न विद्यार्थ्यांचे विद्यावेतन: ₹1,750 वरून ₹8,000 प्रतिमहिना.

पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे विद्यावेतन: ₹17,360 वरून ₹34,790 प्रतिमहिना.

मात्र, राज्य शासनाच्या धर्तीवर विद्यावेतनवाढीची मागणी करूनही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीचे इंटर्न व पदव्युत्तर विद्यार्थी अद्याप या वाढीपासून वंचित आहेत.

समान शैक्षणिक पात्रता, समान जबाबदाऱ्या आणि समान स्वरूपाचे काम असूनही विद्यावेतनात असलेली ही तफावत दूर करून मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनाही शासनाच्या धर्तीवर सुधारित विद्यावेतन लागू करावे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागणीला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??