ताज्या घडामोडी

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
ॐ समर्थ भारत, श्री समर्थ, शिवनेरी, ॐ साईश्वर, सरस्वती कन्या आणि ॐ साईश्वर पुरुष संघाची विजयी आगेकूच
माटुंग्यात खो-खोचा धडाका! मुंबई संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी

मुंबई, दि. २० नोव्हेंबर (क्री. प्र.) : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२६-२७ ला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी महिलांचे पाच आणि पुरुषांचा एक सामना रंगला. महिलांमध्ये ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, श्री समर्थ व्यायाम मंदिर, शिवनेरी सेवा मंडळ, ॐ साई ईश्वर सेवा मंडळ आणि सरस्वती कन्या संघाने, तर पुरुषांमध्ये ॐ साईश्वर सेवा मंडळाने विजयाची पताका फडकावली. जिल्ह्याच्या अजिंक्यपदाबरोबर मुंबई संघातील स्थानासाठी सुरू झालेल्या या संघर्षाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून रंगत वाढवली. मैदानावर चपळाई, पाठलागात आक्रमकता, संरक्षणात संयम आणि प्रत्येक गुणासाठी जीव ओतून लढण्याची जिद्द… अशा खो-खोच्या अस्सल थराराने माटुंग्यातील ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे मैदान पहिल्याच दिवशी दुमदुमले!

मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रोहित राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. रुपाली ठाकूर, विश्वस्त वैशाली भिडे-बर्वे, अथेना ग्लोबल लॉजिस्टिकचे अल्बर्टिनो मस्करेन्हास व सहाय्यक महाव्यवस्थापक श्री प्रसाद राऊळ, महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन क्षितिज वेदक, ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे विश्वस्त उन्मेष नरवणे, अभिजात एंटरप्रायझेसच्या संस्थापक वसुधा देशपांडे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब तोरसकर, मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, नितीन पाटील यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि खो-खो कार्यकर्ते उपस्थित होते.

ॐ समर्थ भारतचा संघशक्तीवर पहिला विजय
महिलांच्या सलामीच्या सामन्यात ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरने संघशक्तीचा १०-७ असा पराभव करत तीन गुणांची विजय साजरा केला. मध्यंतराला ५-३ अशी आघाडी मिळवणाऱ्या ॐ समर्थ भारतने उत्तरार्धातही आपली पकड कायम ठेवली. विजयी ॐ समर्थ कडून अवनी पाटील (४ गुण, १.१० मिनिटे संरक्षण व १ गुण), श्रिया ताम्हणकर (२ गुण, १.३० मिनिटे संरक्षण) आणि गौरी बारे (नाबाद ३ मिनिटे संरक्षण, ३ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. पराभूत संघशक्ती कडून ईशाली आंब्रे (२.४० मिनिटे, ३ मिनिटे संरक्षण व ३ गुण), अथश्री तेरवणकर (२.२० मिनिटे, १.३० मिनिटे संरक्षण) आणि काजल मोरे (१.५० मिनिटे, १.३० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र विजयाचे पारडे प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने झुकले.

श्री समर्थची दमदार बाजी; अमर हिंदवर एक डाव दोन गुणांनी मात
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने अमर हिंद मंडळावर ९-७ अशी मात करत एक डाव आणि दोन गुणांनी विजय नोंदवला. मध्यंतराला ९-२ अशी मोठी आघाडी मिळवणाऱ्या श्री समर्थने प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची संधीच दिली नाही. श्री समर्थच्या श्रिया नाईक (नाबाद ५.३० मिनिटे संरक्षण व ३ गुण), सोनम शेलार (२.३० मिनिटे संरक्षण व ३ गुण) आणि तन्वी मोरे (२.२० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांच्या प्रभावी कामगिरीने श्री समर्थच्या विजयाला आकार दिला. पराभूत अमर हिंदकडून नताशा नतापे (३.१० मिनिटे संरक्षण), प्राजल पताडे (२ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि मधुर पेडणेकर (१.३० मिनिटे संरक्षण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण श्री समर्थची आघाडी मोडण्यात त्यांना अपयश आले.

शिवनेरीचा दोन गुणांनी विजय; वैभवची झुंज अपुरी
महिलांच्या तिसऱ्या लढतीत शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा ९-७ असा दोन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला ३-३ अशी बरोबरी असल्याने सामना अखेरपर्यंत चुरशीचा राहिला; निर्णायक क्षणी शिवनेरीने बाजी मारली. शिवनेरीच्या आरुषी गुप्ता (३ गुण, १.४० मिनिटे संरक्षण व ३ गुण), मुस्कान शेख (१.४० मिनिटे, २.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि सिद्धी शिंदे (२.५० व ३.२० मिनिटे संरक्षण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत वैभवकडून स्फूर्ती चांदुरकर (५ गुण, २ मिनिटे संरक्षण), मानसी आंबोकर (२.१० व १.३० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि अवंतिका आंबोकर (२ मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र दोन गुणांची कमतरता वैभवला विजयापासून दूर ठेवून गेली.

ॐ साई ईश्वरची एक डाव तीन गुणांनी सरशी
महिलांच्या चौथ्या सामन्यात ॐ साई ईश्वर सेवा मंडळाने आर्य सेनाचा ९-६ असा एक डाव आणि तीन गुणांनी पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. मध्यंतराला ९-२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या ॐ साई ईश्वरने सामन्यावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवले. ॐ साई ईश्वरच्या कादंबरी तेरवणकर (३.२० मिनिटे संरक्षण व २ गुण), आर्या आचरेकर (३ मिनिटे संरक्षण व ३ गुण) आणि यशस्वी कदम (३.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) यांच्या अष्टपैलू कामगिरीने संघाला सहज विजय मिळवून दिला. पराभूत आर्य सेनाकडून प्रतीक्षा राज (३ मिनिटे संरक्षण व १ गुण) आणि आरुषी पवार (१ मिनिट संरक्षण व १ गुण) यांनी प्रतिकार केला; पण मोठी पिछाडी भरून काढणे त्यांना शक्य झाले नाही.

सरस्वती कन्येचा एकतर्फी विजय; ॐ समर्थ भारतला धक्का
महिलांच्या पाचव्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचा ९-६ असा एक डाव आणि तीन गुणांनी दणदणीत पराभव केला. मध्यंतराला ९-२ अशी आघाडी घेत सरस्वती कन्या संघाने सामन्याच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक वर्चस्व मिळवले. पहिल्या सामन्यात विजयी ठरलेल्या ॐ समर्थ भारतला दुसऱ्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

पुरुषांमध्ये ॐ साईश्वरची विजयी सलामी; सरस्वती ‘ब’ची झुंज निष्फळ
पुरुषांच्या एकमेव सामन्यात ॐ साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लब (ब) चा १५-१३ असा दोन गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. मध्यंतराला ९-८ अशी निसटती आघाडी असलेल्या ॐ साईश्वरने उत्तरार्धातही ती टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. ॐ साईश्वरच्या प्रशिक मोरे (२.२० व १.४० मिनिटे संरक्षण व ४ गुण), साई टेंबुलकर (२.३० व २.१० मिनिटे संरक्षण), सार्थक माडीये (१ गुण व नाबाद १.१० मिनिटे संरक्षण) आणि तनिष साटम (६ गुण) यांनी निर्णायक कामगिरी बजावली. पराभूत सरस्वती स्पोर्ट्स क्लब (ब) कडून ओमकार खरंगटे (२.३० व १.४० मिनिटे संरक्षण व २ गुण), आरुष तांबे (१.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि अक्षय दहींबेकर (४ गुण) यांनी विजयासाठी संघर्ष केला. मात्र दोन गुणांची पिछाडी भरून काढण्यात त्यांना अपयश आले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??