ताज्या घडामोडी

माणसातला देवमाणूस : माणूसमित्र सुरेश पवार

चकाकते ते सर्वच सोने नसते” — ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो. पण सोनं न चकाकता, मातीत मिसळून, मातीचा सुगंध होऊन जगणारं माणूस भेटणं, हे खरं भाग्य. तसंच एक भाग्य म्हणजे सुरेश पवार. नावातच ‘सुरेश’ — सुरांचा ईश, विश्वासाचा अधिपती. आणि आयुष्यभर त्यांनी आपल्या नावाला जागलं, नावाप्रमाणेच जगणं सार्थ केलं.
शेक्सपिअरने विचारलं होतं, What is in the name? नावात काय आहे? पण सुरेश पवार यांच्या बाबतीत हे वाक्य उलटं ठरतं. नावातच सारं काही आहे. सुरेश म्हणजे जो सुरेल आहे, जो विश्वास देतो, जो आधार देतो. आणि हाच सुरेश, नाशिकच्या गिरणा काठचा देवदूत होऊन, महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात ‘माणूसमित्र’ म्हणून ओळखला गेला.
मोठं पद, मोठी श्रीमंती, मोठी खुर्ची… ही सगळी बैलाच्या झुलीप्रमाणे असतात. झूल काढली की उरतो तो फक्त माणूस. अनेकजण झुलीलाच आपलं अस्तित्व समजतात. पण सुरेशभाऊंनी झूल बाजूला ठेवली आणि माणूस म्हणून जगणं निवडलं. म्हणूनच ते पदापेक्षा मोठे झाले, श्रीमंतीपेक्षा श्रीमंत झाले.
हा पाय जमिनीवर असलेला अवलिया आहे.
आजपर्यंतच्या कवी, लेखक, साहित्यिक परिवाराच्या इतिहासात एक असा माणूस, जो जवळपास शंभर टक्के सर्वांच्या आमंत्रित कार्यक्रमांना आवर्जून जातो, भेट देतो, शुभेच्छा देतो. हे काम सोपं नाही. त्यासाठी मन मोठं लागतं, वेळ देता आला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं आपली वाटली पाहिजेत.
सुरेश पवार हे तेच करतात. कुणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा असो, कुणाचा सत्कार असो, कुणाच्या घरातलं सुख असो वा दुःख असो — सुरेशभाऊ तिथे असणारच. “जाल तेथे यशस्वी भव” हा आशीर्वाद घेऊन ते जातात आणि जातील तिथे यशाचं वातावरण निर्माण करतात.
महाराष्ट्रातील बहुतांशी साहित्यिक बांधवांची पूर्ण नावं त्यांना पाठ आहेत. कुणी म्हणेल, हे कसं शक्य आहे? पण ज्याच्या डोक्यात साहित्यिकांचा सातबारा उतारा जपलेला असतो, ज्याच्या हृदयात प्रत्येक लेखकासाठी एक स्वतंत्र कप्पा असतो, त्याला हे शक्य होतं. ते चतुरस्र आहेत, पण चतुराईचा वापर ते कधी कुणाला कमी लेखण्यासाठी करत नाहीत, तर कुणालाही मोठं करण्यासाठी करतात.
माझ्यासारख्या सामान्य लेखकाला खांद्यावर घेऊन, गळ्यात हात घालून, समवेत जमिनीवर बसणारा हा माणूस… हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हा अनुभव आहे. मोठ्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसणं, हीच तर खरी लोकशाही. हीच तर खरी माणुसकी.
असाध्य ते साध्य करणारा प्रयत्नवादी
“असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे” — तुकाराम महाराजांची ही ओळ सुरेश पवार यांच्या जगण्याचा मंत्र आहे.
जे खळांची व्यंकटी सांडो.
तया सत्कर्मी रती वाढो.
या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले आयुष्य जगले.
ते केवळ भावनिक माणूस नाहीत, तर सूक्ष्म नियोजन करणारे, कच्चे दुवे आणि बलस्थानं जाणणारे, यशस्वी संयोजक आहेत. एखादा कार्यक्रम ठरवला की तो यशस्वी होणारच, याची खात्री त्यांच्या नियोजनात असते. कारण ते कामाला काम समजत नाहीत, ते कामाला ‘सेवा’ समजतात.
डोंगर, दर्‍या, कड्या-कपारीतील लेखक, साहित्यिक आणि आदिवासी समाजाच्या प्रत्येक गरीबाच्या लेकराला ‘माझा वाटणारा’ हक्काचा मित्र, मार्गदर्शक म्हणजे सुरेश पवार. शहरातल्या मोठ्या सभागृहातही ते तेवढेच आपले वाटतात आणि खेड्यातल्या झोपडीतही तेवढेच आपले वाटतात. हेच तर त्यांचं वेगळेपण आहे.
प्रशासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी रस्त्यावर उभा राहून, “माझा साहित्यिक बांधव प्रामाणिक आहे, कष्टकरी आहे” असं बेधडक सांगणारा आणि कुठल्याही कामात बाजू घेणारा विश्वासार्ह देवमाणूस दुर्मिळच.
“दोस्ती में दूरी तो आती रहती है,
फिर भी सच्ची दोस्ती दिलों को मिला देती है”
ही शायरी सुरेशभाऊंच्या मैत्रीसाठीच लिहिली असावी, असं वाटतं.
नदीला वाहतं करणारा माणूस
सुरेश पवार’ हा त्यांच्या कार्याचं यथार्थ वर्णन करणारा लेख आहे. नाशिक म्हटलं की गोदावरी, कुसुमाग्रज आणि समृद्ध साहित्य परंपरा आठवते. याच साहित्यिक भूमीत गेल्या काही वर्षांत एका गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेने आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साहित्य विश्वाला नवी दिशा दिली आहे.
‘पुस्तकावर बोलू काही’ हा उपक्रम आज केवळ कार्यक्रम राहिलेला नसून, साहित्यिकांना जोडणारा एक व्यापक सांस्कृतिक आंदोलन बनले आहे. दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नियमितपणे पुस्तकावर बोलू काही चे कार्यक्रम वेळेवर सुरू होतात आणि वेळेवर संपतात. साहित्य क्षेत्रातील उपक्रमामध्ये सातत्य आणि वेळेचे नियोजन याचा सुंदर मेळ साधणारा हा उपक्रम म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
या उपक्रमामागे सातत्याने कार्यरत असलेले नाव म्हणजे सुरेश पवार. गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि सुरेश पवार म्हणजे एकच अक्षर द्वैतातील एक महाकाव्यच आहे, असं वर्णन केलं जातं.
त्यांनी ‘गिरणा’ या नावाने स्वतःला नाव दिलं. नदी वाहत राहते म्हणून तिचं अस्तित्व टिकतं. त्याचप्रमाणे साहित्याचा प्रवाहही अखंड वाहत राहिला पाहिजे, या विचारातून सुरेश पवार यांची कार्यपद्धती आकाराला आलेली दिसते.
शहरासोबतच ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजपर्यंत ३२३ सारस्वत या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या साहित्यावर व्यक्त झाले. पहिल्या ३२३भागातील साहित्यिकांना बोलण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, विवेक उमाळगावकर, बी. बी. वाघ, बीबी शेखर पाटील, यशवंत पाटील, रवींद्र माजरुकर, राजेंद्र उगले, प्र. द. कुलकर्णी, आ. नानासाहेब बोरस्ते,अशोक कुमावत ,
प्रतिभा जाधव, लक्ष्मण महाडिक, प्रकाश होळकर, अरुण झांजळे, डॉ. राजेंद्र भलमे, डॉ. एम. के. पाटील, डॉ. दिलीप धोंगडे, राजेंद्र दिघे, डॉ. रावसाहेब शिंदे, उत्तम कोळगावकर, अलकाताई दाभाडे, जयश्री वाघ, तुकाराम डिंडोळे, योगाचार्य अशोक पाटील, विजयकुमार भिडे, विठ्ठल ताथे, संधान यांच्यासह 300 साहित्यिकांनी आतापर्यंतच्या भागात सहभाग घेतला. त्यामुळे हा साहित्याचा प्रवास अधिक प्रवाही झाला आहे.
‘पुस्तकावर बोलू काही’ च्या माध्यमातून नाशिकच्या साहित्य विश्वाला दिले हक्काचे व्यासपीठ हीच त्यांची खरी ओळख आहे.
“नदी जशी वाहते, तशी माणुसकी वाहत राहिली पाहिजे,
थांबला तो संपला, वाहिला तो जिंकला”
हीच त्यांची शिकवण.
गिरणा काठचा शेर, महाराष्ट्राचा गौरव
“फिक्र ना कर नादान, ये शिवा का आखाडा है,
जिसके वंशो ने आलमगीर को, इस जमीन मे गाडा है”
हा शिवाचा आखाडा म्हणजे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचा, नाशिक गिरणा गौरव परिवाराचा शेर म्हणजे सुरेश पवार. ते शेरासारखे धाडसी आहेत, पण हरणासारखे हळवेही आहेत. त्यांच्यात कणखरपणा आहे आणि कोमलताही आहे.
सालस, प्रेमळ, संवेदनशील व्यक्तिमत्त्व. उत्तम संघटक. उतारवयात तरुणांना लाजवणारं एनर्जेटिक पर्सनॅलिटी. प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्याची क्षमता बाळगणारे. लहानमोठ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे. समाजहितासाठी तनमनधनाने योगदान देणारे. फोनवर कोणतेही काम फत्ते करणारे उत्तम जोडीदार व सर्वसामान्यात रमणारे उत्तम सेवक. संघटना, पदाधिकारी तथा सामान्य समाज बांधवांशी उत्तम समन्वय साधणारे. परिस्थिती बघून उत्तम निर्णय घेणारे निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व. चांगल्या वाईट माणसांची पारख ठेवणारा गुणग्राहक नेता. कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा उत्तम कुटुंबवत्सल माणूस. कर्तव्यासाठी न थकता रात्रंदिवस अविरत धावत असणारा अवलिया. चिरतरुण पर्सनॅलिटी शाबूत ठेवणारा…
ही यादी संपत नाही, कारण त्यांचे गुण संपत नाहीत.
खरा मित्र कोण?
खरा मित्र म्हणजे कोण? हे स्वतःच्या वर्तणुकीतून प्रतिबिंबित करणारा मित्रांमधील सूर्य म्हणजे सुरेश पवार. त्यांनी योजलेल्या आखणीतून अनेक मित्रांना योग्य मार्ग दाखवला. मला तर वास्तवतेची जाणीव करून दिली. खरा मित्र कोणास म्हणावे, हे देखील जाणवले.
“हजारों दोस्त मिलते हैं ज़िन्दगी की राहों में,
पर सच्चा दोस्त वही, जो साथ दे बाहों में”
उर्दू शायरीची ही ओळ त्यांना तंतोतंत लागू होते. कारण ते फक्त सुखात नाही, दुःखातही खांद्याला खांदा लावून उभे राहतात.
“दोस्ती वो रिश्ता है, जो खून से नहीं, दिल से बनता है” — आणि सुरेशभाऊंची दोस्ती ही दिल से बनलेली आहे.
सर्व जिल्ह्यात नव्हे, राज्यात आदराने ‘माणूसमित्र’ असा नावलौकिक मिळविणारे हे व्यक्तिमत्त्व, हे नाव त्यांना कुणी दिलं नाही, त्यांनी ते कमावलं आहे. माणसांवर प्रेम करून, माणसांसाठी जगून, माणसांसाठी झटून.
पन्नाशी सुपर, आता शतकी इनिंग
आयुष्याची पन्नाशी तर सुपर ठरलीच… आता दुसऱ्या सुपर शतकी इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा! क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, पहिली इनिंग त्यांनी धमाकेदार खेळली. आता दुसरी इनिंग तर त्याहून अधिक दमदार होणार, याची खात्री आहे. कारण त्यांचा स्टॅमिना, त्यांची जिद्द, त्यांची एनर्जी अजूनही तरुणांना लाजवणारी आहे.
वाढदिवस येताच झुलावा आठवांचा हिंदोळा,
सुख आणि आनंदाचा जणू तो सोहळा…
नसावा सुखाच्या सागराला किनारा…
फुलावा समाधानाचा सदोदित पिसारा…
यशाचा सुगंध आपल्या जीवनी दरवळावा,
आनंदरूपी वसंताला नेहमीच बहार यावा…
उमलत्या फुलाप्रमाणे उमलो जीवन…
समृद्धीने भरावे सतत आपले अंगण…
प्रीतीचा झरा अखंड आयुष्यात वाहो…
शुभेच्छांच्या वर्षावात संपूर्ण जीवन न्हावो…
या काव्यओळी (© वंदना कुलकर्णी विटणकर) जणू सुरेशभाऊंसाठीच लिहिल्या आहेत. कारण त्यांचं आयुष्यच एक कविता आहे. एक अशी कविता, जी वाचली की मन भरून येतं.
प्रार्थना
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य, यशस्वी जगण्याचे बळ देवो, हीच प्रामाणिक प्रार्थना. माझ्या या अजातशत्रू मित्रास, सच्च्या समाजसेवकास परमेश्वर उदंड आयुष्य देवो. आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो, ही प्रभूचरणी प्रार्थना.
“तू जिथे जाशील तिथे प्रकाश पसरेल,
तुझ्या असण्यानेच माणुसकीला अर्थ येईल”
सुरेशभाऊ, आपण फक्त एक व्यक्ती नाहीत, आपण एक विचार आहात. एक चळवळ आहात. एक प्रेरणा आहात.
“माणूस म्हणून जन्माला येणं, हे आपल्या हातात नसतं,
पण माणूस म्हणून जगणं, हे आपल्या हातात असतं” — आणि आपण हे जगणं सार्थ करून दाखवलं.
लेखक…
अशोक कुमावत सर
राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, कवी, प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते, सूत्रसंचालक, नाशिक 9881856327

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??