श्री माधवराव पाटील महाविद्यालयात उत्साहात पदवी प्रमाणपत्रांचे वाटप; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मान्यवरांचा भर

मुरूम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित आणि नगर शिक्षण विकास मंडळ संचलित येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीप्रदान समारंभ’ मंगळवारी (ता. ११) रोजी उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, नगरसेवक गणेश अंबर, सूर्यकांत जाधव, डॉ. सतीश शेळके, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष उपलब्धी प्राप्त केलेल्या मान्यवरांचा व प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.
शरण पाटील यांची नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. नितीन हुलसुरे, डॉ. पंकज पाताळे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, एमए, एमएस्सी अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे गौरवासह प्रदान करण्यात आली.
O चौकट : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात येथील तरुण स्वावलंबी आणि गुणवत्तापूर्ण बनला पाहिजे, यासाठी आमची निरंतर वाटचाल सुरू आहे.
— शरण पाटील
अध्यक्ष, उमरगा जनता सहकारी बँक तथा सचिव, नगर शिक्षण विकास मंडळ
O विद्यापीठाने २०१७ पासून महाविद्यालयांमध्येच पदवीदान समारंभ घेण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा, आपल्या अंगी विविध कौशल्ये आत्मसात करावीत आणि मिळवलेल्या पदवीचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा.
— प्रा. डॉ. अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले. पदवीदान समारंभाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड आणि परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरसिंग कदम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. राम बजगिरे यांनी मानले. या समारंभास महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभ प्रसंगी विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी वितरण करताना मान्यवर व अन्य.



