गुंडू पुराणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुमच्या जि.प. कन्या शाळेत पणती वाटप; सामाजिक उपक्रमाचे शहर व परिसरात कौतुक

मुरूम, ता. उमरगा, ता. ५(प्रतिनिधी) :
दिवाळीच्या आनंदात गोरगरीब व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, या उदात्त हेतूने मुरूम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे यांनी आपल्या ३९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवला. वाढदिवसाचा खर्च टाळत त्यांनी मंगळवारी (ता. ३) रोजी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींना दिवाळीपूर्वी पणत्यांचे वाटप करत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक डी. जी. पाटील, प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. राठोड, सहशिक्षक बी. व्हि. गायकवाड, ए. बी. वाघमारे, एस. व्ही. कलशेट्टी, आर. डी. कुलकर्णी, सोनाली स्वामी आणि ए. ए. गायकवाड आदींची प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना पणत्या वाटप करून झाली.
यावेळी शाळेच्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे यांचा फेटा, शाल, पुष्पहार घालून सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश क्षीरसागर, महादेव मंडळे, प्रथमेश टिकांबरे आदींनी विशेष पुढाकार घेतला.
वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी सामाजिक बांधिलकी जोपासत राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल गुंडू पुराणे यांचे शहर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये गुंडू पुराणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पणती वाटप करताना मान्यवर व अन्य.



