दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण!

लोकजागृतीचा फटाका!
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण! घराघरांत लखलखणारे दिवे, दारातील सुंदर रांगोळ्या, फराळाचा सुगंध आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी यांमुळे वातावरण प्रसन्न होते. मात्र, या आनंदोत्सवात फटाक्यांच्या वाढत्या वापरामुळे होणारे प्रदूषण, अपघात आणि सजीवांना होणारा त्रास यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज गरज आहे ती आकाश उजळविणाऱ्या फटाक्यांपेक्षा समाजाला विचार करायला लावणाऱ्या लोकजागृतीच्या फटाक्यांची!
हवेतील प्रदूषण
फटाके फुटल्यानंतर हवेत धूर, सूक्ष्म धूलिकण आणि रासायनिक पदार्थ मिसळतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होऊ शकतो. डोळ्यांची जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात. आधीच वाहनांचा धूर आणि कारखान्यांमुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात फटाक्यांची भर पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
ध्वनिप्रदूषण
फटाक्यांचा कर्णकर्कश आवाजही अनेकांसाठी त्रासदायक ठरतो. रुग्णालयांतील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांच्या शांततेचा भंग होतो. मोठ्या आवाजामुळे कुत्रे, मांजरी आणि इतर प्राणी घाबरून जातात. पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. एवढेच नव्हे, तर फटाक्यांमधून निर्माण होणारी उष्णता, जळत्या ठिणग्या आणि धूर यांमुळे मुंग्या, किडे आणि इतर लहान जीवांनाही इजा होण्याची शक्यता असते. आपल्या आनंदासाठी मुक्या जीवांना भीती आणि वेदना सहन कराव्या लागणे योग्य आहे का? ते आपला त्रास शब्दांत सांगू शकत नाहीत; म्हणून त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे माणुसकीला शोभणारे नाही.
अपघात, भाजणे आणि आर्थिक नुकसान
फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे भाजणे, डोळ्यांना इजा होणे आणि आग लागण्यासारखे अपघातही घडतात. फटाके फोडल्यानंतर रस्त्यांवर साचणारा कचरा परिसर अस्वच्छ करतो. फटाक्यांवर खर्च होणारा पैसा गरजूंच्या मदतीसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी वापरला, तर सणाचा आनंद अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो.
निसर्ग आणि स्वच्छतेची जबाबदारी
याशिवाय, फटाक्यांच्या धुरामुळे परिसरातील झाडे, वनस्पती आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. आपण निसर्गाकडून शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळवतो; त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. सण साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, फटाक्यांचे अवशेष योग्य प्रकारे गोळा करणे आणि लहान मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.
मग लोकजागृतीचा खरा फटाका कोणता?
तो म्हणजे मनामनांत पर्यावरणाविषयी प्रेम, स्वच्छतेची जाणीव आणि सजीवांप्रती करुणा निर्माण करणारा विचार! शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी पर्यावरणपूरक दिवाळीबाबत जनजागृती करावी. पालकांनी मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. दिव्यांची सजावट, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरजूंच्या मदतीतूनही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता येतो. प्रत्येकाने स्वतःपासून बदलाला सुरुवात केली, तर त्याचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडू शकतो.
दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिवे लावणे आणि फटाके फोडणे एवढाच नाही; तर अज्ञानाचा अंधार दूर करून विचारांचा प्रकाश पसरविणे हा आहे. म्हणून यंदा फटाक्यांचा वापर टाळूया किंवा शक्य तितका कमी करूया. हवा स्वच्छ ठेवूया, ध्वनीप्रदूषण कमी करूया आणि प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा आदर करूया.
आकाशात फुटणारा फटाका काही क्षणांत विझतो; पण लोकजागृतीचा फटाका मनामनांत विचारांची ठिणगी पेटवतो. चला, यंदा फटाक्यांचा धूर नको, तर लोकजागृतीचा प्रकाश हवा!
डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.



