ताज्या घडामोडी

लेखक: खाजाबंदेनवाज युसुफ शेख, सहशिक्षक, जि. प. प्रा. शाळा डोकेवस्ती, मोहोळ

“शाळेत या आणि प्रमाण भाषेतच बोला” हा आदेश लहान मुलांच्या गळ्यातील फास ठरतो का? वस्ती, पाडे आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणाऱ्या मुलांची मातृभाषा ही प्रमाण मराठी नसते. ती असते स्थानिक बोली. डोकेवस्ती सारख्या गावातील मुले घरी “आलोय का?”, “काय कराय लागलाय?” “काय करताव ?” ” धुणं ध्वायलीय?”अशी भाषा बोलतात. मग वर्गात अचानक “आला आहात का?”, “काय करत आहात?” ” काय करताय?” ऐकून ती गोंधळतात. याच गोंधळातून शिकण्याची आवड कमी होते. म्हणून बोलीभाषेचा अध्ययन-अध्यापनात योग्य वापर करणे आज काळाची गरज आहे.

*बोलीभाषा म्हणजे अडथळा की साधन?*
बऱ्याचदा शिक्षक आणि पालक बोलीभाषेला “चुकीची भाषा” मानतात. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडाही सांगतो – मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे.

वस्ती शाळेतील विद्यार्थी प्रथम बोलीतूनच जग समजून घेतात. जर आपण थेट प्रमाण भाषेतून शिकवले तर त्यांच्यात 2 अडचणी येतात:
1. *आकलनाची अडचण:* शब्दांचा अर्थ समजत नाही. उदा: “विस्मय” ऐवजी “आश्चर्य वाटलं” म्हटले तर लवकर समजते.
2. *संकोच:* “आपली भाषा चुकीची आहे” या भावनेने मुले वर्गात प्रश्न विचारत नाहीत, उत्तर देत नाहीत.

म्हणून बोलीभाषेला नाकारणे म्हणजे मुलालाच नाकारणे आहे.

*वर्गात आम्ही काय करतो? – डोकेवस्ती शाळेचा अनुभव*
जि. प. प्रा. शाळा डोकेवस्ती येथे गेल्या ३ वर्षांपासून आम्ही “बोली ते प्रमाण” हा सेतू वापरतो.

*1. पहिली पायरी – स्वागत बोलीतून:*
वर्गात प्रवेश करताच “या रे पोरांनो, आज काय शिकायचंय?” असे विचारतो. मुलं मोकळी होतात. मग हळूहळू त्याच वाक्याचे प्रमाण रूप “या मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत?” असे सांगतो.

*2. कथा आणि गोष्टी:*
पाठ्यपुस्तकातील गोष्ट प्रथम मुलांच्या बोलीत सांगतो. मुले रमतात. मग त्याच गोष्टीचे प्रमाण भाषेतील रूप वाचतो. मुले स्वतःच फरक सांगतात. उदा: “पानी” → “पाणी”, “हाय का” → “आहे का”.

*3. शब्दकोश तयार करणे:*
भिंतीवर “आमचे शब्द” नावाचा तक्ता आहे. डावीकडे बोलीतील शब्द, उजवीकडे प्रमाण शब्द. मुले स्वतः शब्द भरतात. याने त्यांना अभिमान वाटतो.

*4. लेखनात मोकळीक:*
निबंध लिहिताना प्रथम 5 मिनिटे मुलांना बोलीत विचार मांडू देतो. मग ते प्रमाण भाषेत लिहायला सांगतो. याने विचार अडत नाहीत.

*याचे काय फायदे झाले?*
1. *गुणवत्ता वाढली:* मुले आता घाबरत नाहीत. वर्गातील सहभाग ५०% ने वाढला.
2. *गळती कमी झाली:* “शाळेत आपली भाषा चालत नाही” हे कारण संपले.
3. *प्रमाण भाषा लवकर आली:* बोलीला विरोध न करता सेतू वापरल्याने 3 महिन्यात मुले प्रमाण मराठीत लिहू-बोलू लागली.
4. *आत्मविश्वास:* “माझी भाषा महत्वाची आहे” हा भाव निर्माण झाला.

*शिक्षकांसाठी 3 महत्वाच्या सूचना*
1. *नाकारु नका, दुवा बना:* बोली चूक म्हणून टाळू नका. तिला प्रमाण भाषेकडे नेणारा पूल बनवा.
2. *ऐका आणि समजून घ्या:* मुलं काय सांगू पाहताहेत ते आधी समजून घ्या. नंतर भाषेची दुरुस्ती करा.
3. *पालकांना सामील करा:* पालक मेळाव्यात बोलीचे महत्व सांगा. घरी बोली बोलू द्या, शाळेत दोन्ही शिकतील.

भाषा म्हणजे केवळ व्याकरण नाही, तर ती ओळख आहे. वस्ती शाळेतील मुलांची बोली ही त्यांची ताकद आहे. त्यांनाही ताकद त्यांच्या घरातून आईपासून प्राप्त झालेली आहे. त्या ताकदीचा वापर करूनच आपण त्यांना प्रमाण भाषेच्या उंचीवर नेऊ शकतो. शाळा म्हणजे बोली नष्ट करण्याचे कारखाने नसून, बोलीतून प्रमाणाकडे नेणारी वाट असली पाहिजे.

`बोली जपली तरच भाषा टिकेल, आणि भाषा टिकली तरच शिक्षण रुजेल.`

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??