ताज्या घडामोडी

*वारी -२१

आषाढी एकादशीची पहाट झाली की पंढरपूर जागं होतं. पण हे जागं होणं नेहमीच्यासारखं नसतं. मंदिराच्या पायऱ्यांवरची गर्दी, चंद्रभागेच्या वाळवंटावर पसरलेले लाखो वारकरी, आणि हवेत विरघळलेला “विठ्ठल विठ्ठल”चा गजर. एकवीस दिवस चाललेल्या पायवारीची अखेर याच दिवशी होते असं वाटतं. पण ज्यांनी एकदा तरी वारी अनुभवली आहे त्यांना ठाऊक आहे, वारी इथे संपत नाही. ती इथूनच खरी सुरू होते.

ज्येष्ठाच्या शेवटच्या आठवड्यातच पंढरपुरात एक वेगळी चाहूल लागते. देवालयातील नित्याचे काही विधी थांबतात. यालाच “पलंग निघणे” म्हणतात. विठ्ठलाला विश्रांतीसाठी जो पलंग आहे तो बाजूला केला जातो. कारण आता विश्रांतीचा काळ संपला. लाखो लेकरं भेटायला येणार आहेत.

विचार करा. जो जगाचा बाप आहे तो स्वतःच्या झोपेचा त्याग करतो, फक्त भक्तासाठी. आषाढभर तो उभा राहतो. हात कटीवर, डोळ्यात वाट पाहण्याची आस. हीच तर खरी देवाची व्याख्या आहे. भक्तासाठी थांबणारा देव. आणि भक्तासाठी धावणारा वारकरी.

मंदिराबाहेर ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो. दूरवरून भगव्या पताका दिसू लागतात. ती पताका म्हणजे फक्त कापडाचा तुकडा नाही. ती आहे श्रद्धेची निशाणी.

संतांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गांनी निघतात. आळंदीहून ज्ञानेश्वर माऊली, देहूहून तुकोबाराय, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ, पैठणहून एकनाथ महाराज. प्रत्येक पाऊलासोबत अभंग वाढतो, प्रत्येक मुक्कामासोबत प्रेम वाढतं.

आषाढीच्या दोन दिवस आधी सर्व पालख्या वाखरीला एकत्र येतात. आणि मग होतं ते प्रसिद्ध रिंगण. घोडा मैदानात येतो, वारकरी गोल करून नाचतात, आणि मधोमध फक्त भगवी ध्वजा फडकते. त्या क्षणी जातीचा, पंथाचा, श्रीमंत गरीबाचा सगळा भेद विरघळतो. फक्त एकच ओळख उरते, “मी विठ्ठलाचा वारकरी.”

दशमीच्या दिवशी संत नामदेव महाराज मूर्ती रूपात पालख्यांच्या स्वागताला जातात. वारकऱ्यांसाठी हा क्षण सर्वात मोठा असतो. “नामदेव आले म्हणजे विठ्ठलच आला” अशी त्यांची भावना असते. कारण नामदेवांनीच तर विठ्ठलाला पहिल्यांदा “माझा विठ्ठल” म्हटलं. त्यांच्या स्वागतासोबतच पंढरीच्या वेशी उघडतात आणि मिरवणूक आत येते.

आषाढी एकादशी. चंद्रभागेत पहाटेपासूनच स्नानाला सुरुवात होते. थंड पाण्यात बुडून उठणारा प्रत्येक देह विठ्ठल नामाने गरम झालेला असतो. स्नानंतर नगर प्रदक्षिणा, मंदिराच्या कळसाला नमस्कार, आणि मग तासंतास रांगेत उभं राहून दर्शनाची वाट.

अनेकांना गर्दीमुळे प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन होत नाही. तरीही कुणी नाराज होत नाही. कारण वारकरी शाळेत शिकलेला असतो. विठ्ठल फक्त गाभाऱ्यात नाही. तो समोरच्या वारकऱ्याच्या ताटात आहे, थकलेल्या माऊलीला दिलेल्या पाण्यात आहे, रस्त्यात अडखळणाऱ्याला दिलेल्या हातात आहे.

रात्रभर पंढरपूर झोपत नाही. ठिकठिकाणी कीर्तन, भजन, हरिपाठ. लहान मुलंही टाळ घेऊन “राम कृष्ण हरी” म्हणतात. त्या रात्री विठ्ठलही जागाच असतो असं म्हणतात. कारण लेकरं जागी असतील तर बाप कसा झोपू शकेल.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे द्वादशीला गोपाळपुरात काला होतो. दही, दूध, पोहे, साखर एकत्र करून केला जाणारा हा प्रसाद म्हणजे वारीच्या सांगतेचा मंगल सोहळा. कृष्णाने गोकुळात गोपांसोबत काला केला होता, तशीच आठवण इथे होते. इथे कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. सगळे एका पंक्तीत बसतात.

आणि मग सुरू होतो परतीचा प्रवास. पालख्या परत फिरतात. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दोन भाव एकत्र दिसतात. एकीकडे भेटीचा आनंद, दुसरीकडे विरहाचं दुःख. जाताना प्रत्येक जण पांडुरंगाला एकच सांगतो, “पुढल्या आषाढीला पुन्हा बोलाव.”

पण खरी परीक्षा इथूनच सुरू होते.

वारीचे एकवीस दिवस संपतात. टाळ मृदुंग पेटीत जातात. भगवी पताका कपाटात दुमडून ठेवली जाते. आणि माणूस पुन्हा आपल्या नेहमीच्या आयुष्यात परततो.

इथेच प्रश्न उभा राहतो. वारीत आपण ज्याला “माऊली” म्हणत होतो, त्याच्याशी ऑफिसमध्ये कुरघोडी का करतो. वारीत जो भुकेला होता त्याला घास भरवला, तोच माणूस घरी आल्यावर शेजाऱ्याच्या अडचणींकडे डोळेझाक का करतो. वारीत आपण जात-पात विसरलो, मग वर्षभर ती पुन्हा का आठवते.

याचा अर्थ असा नाही की वारी व्यर्थ आहे. वारी व्यर्थ नाही. वारी म्हणजे रिचार्ज आहे. एकवीस दिवसांचा चार्ज जो आपल्याला पुढची ३४४ दिवसं पुरायला हवा. बॅटरी संपली की पुन्हा चार्ज करायला पंढरी आहे. पण चार्ज झाला की दिवा सतत तेवत ठेवायचा असतो.

संत तुकाराम म्हणतात, “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुला”. हा फक्त अभंग नाही. ही आचारसंहिता आहे. संत ज्ञानेश्वरांनी “विश्वचि माझे घर” म्हटले. संत नामदेवांनी भक्तीला माणुसकीची जोड दिली.

जर वारीत प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतो, तर वारीनंतर तो दिसेनासा का होतो. उत्तर सोपं आहे. पंढरपुरात विठ्ठल दिसतो कारण तिथे आपण स्वतःला विसरतो. अहंकार, स्वार्थ, मत्सर हे सगळं घरी ठेवून जातो. आणि घरी आल्यावर ते परत उचलतो.

म्हणून खरी वारी पंढरपूरला जाणं नाही. खरी वारी आहे रोज माणूस बनणं.
जो वृद्धाश्रमातल्या आईला स्वतःची आई मानतो तो वारकरी.
जो रस्त्यावरच्या हमालाला “दादा” म्हणतो तो वारकरी.
जो स्पर्धेत असूनही दुसऱ्याच्या यशाने आनंदतो तो वारकरी.
जो स्वार्थापेक्षा सेवेला मोठं मानतो तोच खरा वारकरी.

आज आपण सुट्टी मिळाली की शिमला, गोवा, दुबईला जातो. फोटो काढतो, स्टेटस ठेवतो. वाईट नाही. पण एकदा महाराष्ट्रातल्या तीर्थांना तरी जा. आळंदी, देहू, पैठण, नांदेड, त्र्यंबक. तिथे फक्त दगडाची मूर्ती नाही. तिथे शेकडो वर्षांची तपश्चर्या आहे. तुकारामांचा गाथा आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे.

तुकोबाराय म्हणतात,
“येती वारकरी |वाट पाहातों तोंवरी |
“तुका म्हणे येती| जाईन सामोर पुढती ||”

वारकरी येणार आहेत म्हणून तुकाराम वाट पाहतात. कारण त्यांना माहिती आहे, वारकरी फक्त पायांनी चालत नाहीत. ते निरोप घेऊन येतात. “पांडुरंगाने काय सांगितलं” हा निरोप घेऊन येतात.

लोक म्हणतात मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट. वारकरी हसतो आणि म्हणतो, “याची देही याची डोळा”. ह्याच जन्मात, ह्याच डोळ्यांनी मोक्ष अनुभवता येतो. कसा? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी जगता. जेव्हा तुमच्या वागण्यातून कुणाला आधार मिळतो. जेव्हा तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द प्रेमाचा होतो.

वारी हेच शिकवते. मोठे यज्ञ, कठीण तप, अफाट पैसा याची गरज नाही. एक निर्मळ मन, अखंड नाम, आणि संतांनी दाखवलेला मार्ग. एवढं पुरेसं आहे.

म्हणूनच म्हणतात, पंढरीची वारी म्हणजे चालता चालता मोक्षाचा मार्ग.

वारी संपली असे आपण म्हणतो. पण खरं तर वारी कधीच संपत नाही. ती फक्त रूप बदलते. एकवीस दिवस ती पायात असते. उरले दिवस ती मनात असावी लागते.

पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला भेटता येतं. पण विठ्ठलासारखं बनण्यासाठी रोज माणुसकीने जगावं लागतं. अहंकाराची पताका खाली ठेवावी लागते आणि माणुसकीची पताका खांद्यावर घ्यावी लागते.

आषाढ गेला तरी मनातला आषाढ तेवत ठेवा. टाळ मूक झाले तरी मुखातलं नाम चालू ठेवा. पालखी परत गेली तरी मनाची पालखी सतत पंढरीकडे जाऊ द्या.

कारण वारी पावलांची नसते. वारी मनाची असते. आणि मनाची वारी कधीच संपता कामा नये.

“भेटी लागी जीवा, लागलीसे आस” ही आस फक्त आषाढापुरती नाही. ती आयुष्यभराची आहे. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत वारी आहे.
*प्रा .दिलीप आनंदराव जाधव,सांगली.*
*राज्य कोषाध्यक्ष*
*कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य.*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??