ताज्या घडामोडी

मुरूम, ता. उमरगा, ता. २९ (प्रा. महेश मोटे, प्रतिनिधी) :
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात वाढणारी आर्द्रता आणि हवेतील गारवा यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता प्रभावित होते. श्वास नलिका आकुंचन पावल्यामुळे श्वास घेणे कठीण होत असून, हवेतील सूक्ष्म बुरशी, धुलिकण आणि घरातील ओलावा यामुळे दम्याच्या रुग्णांच्या त्रासात मोठी वाढ होत आहे. छोट्याशा निष्काळजीपणाामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन प्रकृती बिघडू शकते, म्हणूनच या ऋतूत योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
​नागरिकांनी पावसात भिजणे शक्यतो टाळावे आणि बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा. भिजल्यास ओले कपडे लवकरात लवकर बदलून शरीर कोरडे ठेवावे. धूर, धूळ आणि तीव्र वास असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. दम्याच्या रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणि इन्हेलरचा वापर नियमित करावा, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

​या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…
श्वास सोडताना किंवा घेताना छातीतून शिटीसारखा घरघर आवाज येणे, सतत धाप लागणे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पहाटे सतत खोकल्याची उबळ येणे ही दम्याची प्राथमिक लक्षणे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

​घरातील ओलावा आणि बुरशी ठरतेय त्रासदायक…

घरातील भिंतींना आलेला ओलावा आणि घरात वाळत घातलेल्या ओळसर कपड्यांमुळे बुरशीचे प्रमाण वाढते. या ओलाव्यामुळे उशी, गाद्या आणि सोफ्यांमध्ये सूक्ष्म ‘डस्ट माईट्स’ तयार होतात. तसेच गालिच्यामध्ये साचलेल्या ओलाव्यामुळे दुर्गंधी आणि ॲलर्जी पसरवणारे घटक निर्माण होतात, ज्यामुळे श्वसनाचा त्रास बळावतो.

​पावसाळ्यात त्रास वाढण्याची प्रमुख कारणे…
​वातावरणात वाढलेली आर्द्रता व हवेतील गारवा.
​घरातील ओलावा, बुरशी, धूळ, धूर आणि प्रदूषित हवा.
​परागकण व इतर ॲलर्जी निर्माण करणारे घटक.
​सर्दी, विषाणूजन्य संसर्ग आणि इतर श्वसनविकार.
​पावसाळ्यातील

आहार-विहार कसा असावा ?
शिळे, थंड किंवा फ्रिजमधील पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे आणि नेहमी ताजे व गरम अन्नच सेवन करावे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात आले, तुळस, हळद, जिरे आणि लसूण या घटकांचा आवर्जून समावेश करावा. तसेच जास्त तेलकट, तुपकट, थंड पेये व अति आंबट पदार्थ खाणे टाळावे, कारण यामुळे कफ वाढू शकतो.

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी ?
​घरातील खोल्या शक्य तितक्या हवेशीर ठेवाव्यात.
​भिंती, कपडे, गाद्या व घरातील वस्तूंमध्ये ओलावा साचू देऊ नये.
​बुरशी दिसल्यास ती सुरक्षित पद्धतीने स्वच्छ करून पुन्हा वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
​धूर, धूळ आणि ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांपासून लांब राहावे.
​डॉक्टरांनी दिलेली औषधे व इन्हेलर नियमित घ्यावेत.
​सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा संसर्ग झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
​पुरेशी विश्रांती आणि नियमित झोप घ्यावी.

पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे दम्याचा त्रास खात्रीने वाढू शकतो. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्हेलरचा डोस नियमित घ्यावा, थंड हवेपासून स्वतःचे रक्षण करावे आणि घरातील ओलावा व बुरशी वाढू देऊ नये. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळून लक्षणे जाणवताच तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
— डॉ. नितीन डागा, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब, मुरूम

सध्या फ्लूचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखी व अशक्तपणा जाणवतो पण त्वरित उपचार न झाल्यास काही लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात. ज्यामध्ये रुग्णांना अजिबात भूक न लागणे, दम लागणे, फुफ्फुसामध्ये पाणी साचणे. ज्यामुळे हृदय व फुफ्फुसावर ताण येतो व ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते, असे इमर्जन्सी टाळण्यासाठी लवकरात लवकर तपासणी व लसीकरण होणे फार गरजेचे आहे.
– डॉ. शिल्पा डागा
डागा हॉस्पिटल, मुरूम

​पावसाळ्यात दूषित पाणी व वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि जुलाब यांसारखे आजार बळावतात. नागरिकांनी उकळून व गाळून पिण्याचे पाणी वापरावे, ताजे अन्न खावे आणि हातांची स्वच्छता राखावी.
​कोणतीही लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असल्यास क्षयरोग (TB) तपासणी करून घ्यावी. लहान बालके आणि वयोवृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

– डॉ. महेश अर्दाळे
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरूम

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??