पीव्हीपी मध्ये आयकर दिनानिमित्त पोस्टर सादरीकरणातून करजागृती

कवठेमहांकाळ : दि.२४ (प्रतिनिधी – प्रा. विजय कोष्टी)
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयकर दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (तात्या) शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी डॉ. भगवान मोहिते, प्रा. विजय कोष्टी, डॉ. किरण सकट, डॉ. पूजा माळी, वाणिज्य विभागातील प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. भगवान मोहिते यांनी प्रास्ताविकात आयकर दिनाचे महत्त्व, करजागृतीची आवश्यकता आणि जबाबदार नागरिक घडविण्यात अशा उपक्रमांची भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांनी आयकर व्यवस्था, करभरण्याचे महत्त्व, डिजिटल करप्रणाली, करदात्यांची कर्तव्ये आणि राष्ट्रनिर्मितीतील कराचे योगदान या विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि विषयाच्या प्रभावी मांडणीचे उपस्थितांनी कौतुक केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करप्रणालीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, आयकर दिनाचे औचित्य साधत वाणिज्य विभागाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (तात्या) शिंदे, उपाध्यक्ष सुरेश (बापू)पाटील, सचिव सुदर्शनदादा शिंदे, केंद्र संचालक विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली सदर उपक्रमाचे नियोजन डॉ.पूजा माळी, प्रा. एस. एस. कदम, प्रा. रमेश वसावे, प्रा. कु. पी. एस.गडीकर यांनी यशस्वीपणे केले.



