आषाढी एकादशी : अठ्ठावीस युगांच्या वाटेचा सोहळा

आषाढ महिन्याची पहिली एकादशी आली की पंढरपूर फक्त एक गाव राहत नाही. ती एक भावना होते. महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका होते. वारीचा दिंड्या, टाळ-मृदुंगाचा गजर, “ज्ञानोबा-तुकाराम” ची गर्जना आणि विटेवरच्या सावळ्या-सावळीची वाट पाहणारी लाखो डोळी.
आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक गोष्ट सांगितली जाते. “रखुमाई रुसली आणि अठ्ठावीस युगे झाली विठ्ठल तिची विनवणी करतोय” ही गोष्ट. आषाढी म्हणजे नेमकं हेच आहे. रुसवा-मनवण्याचा, भक्तीचा, आणि वाट पाहण्याचा महापर्व.
एकादशीच्या आदल्या रात्री रखुमाईचं ते ठणकावून सांगणं, “उद्या तुम्ही कुठेही जाणार नाही”. हे ऐकलं की आपल्याला आपलंच घर आठवतं. सणाच्या दिवशी बायको म्हणते “आज कुठेही जायचं नाही”, आणि नवरा ऑफिसचा फोन आला की पळतो.
पण इथे फरक आहे. विठ्ठलाचं “हो ग” म्हणणं म्हणजे फक्त होकार नाही. ते एक वचन आहे. गृहस्थाचा धर्म आहे. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत. दोन माणसांनी एकमेकांसाठी काढलेला वेळ आहे.
आषाढी एकादशीला आपण विठ्ठलाला उपवास घालतो. पण खरं पाहिलं तर रखुमाईने त्या दिवशी विठ्ठलाला उपवास घातला होता. “माझ्यासाठी थांब” हा उपवास. आणि तो उपवास आजही सुरू आहे. कारण अजूनही तो तिची वाट पाहतोय.पहाटे “दळिता कांडिता तुज गाईन अनंता” हा आवाज आला आणि विठ्ठल उठला. का? कारण जनी म्हातारी उपाशी असेल. एकादशी म्हणजे फक्त पोटाला उपास नाही. तर दुसऱ्याचं पोट भरणं आहे.
वारकरी संप्रदायाचं हेच ब्रीद आहे. “दीन-दुर्बळा सेवा”. वारीत चालताना कुणी पाणी देतो, कुणी भाकर देतो, कुणी पाय चेपतो. हीच ती जनीची सेवा आहे.
मग श्रीखंड्या होऊन नाथांच्या घरी पाणी भरणं. कान्होपात्रेच्या आर्ततेला धावणं. नामदेवाच्या नेवैद्यासाठी घास घेणं. या सगळ्या कथा आषाढीच्या दिवशी का आठवतात? कारण एकादशीला आपण देवाला सांगतो, “आज फक्त तुझ्यासाठी”. पण देव म्हणतो, “मी आजही त्यांच्यासाठी आहे ज्यांना माझी गरज आहे”.
आषाढीचा खरा उपास हाच आहे. स्वतःचा अहंकार, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी उभं राहणं.
“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” म्हणत सावताच्या मळ्यात जाणारा विठ्ठल. आषाढ महिना म्हणजे पेरणीचा महिना. शेतकरी राबतो. आणि त्याच्या राबण्यात देवाला विठाई दिसते.
वाटेत गोरा कुंभाराचं बाळ. मातीत नाचणारा बाळ आणि “केशवाचं ध्यान” करणारा बाप. इथे विठ्ठल शिकवतो की कर्म आणि भक्ती वेगळी नाहीत. बाळाला वाचवणं हेच मोठं पूजन आहे.
आणि शेवटी देहूला “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणणाऱ्या तुकारामावर सावली धरणं. निसर्ग, शेती, कष्टकरी. हेच महाराष्ट्राचं आषाढी रूप आहे.
म्हणूनच वारीत सगळे चालतात. शेतकरी, कारखानदार, डॉक्टर, शिक्षक. सगळ्यांच्या हात टाळ. कारण आषाढी सांगते, तुमचा व्यवसाय काहीही असो, तुमचा विठ्ठल तुमच्या कामात आहे.
संध्याकाळ झाली. “चल सारीपाट खेळू” असं विठ्ठल म्हणाला. रखुमाई घाबरली. “परत उठून जाल”. आणि खरंच गेला. “विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले” म्हणून त्या चार भावंडांकडे गेला.
हीच तर आषाढीची वेदना आहे. संसार आणि परमार्थ यांच्यातली ओढाताण. रखुमाईला वाटतं “तू फक्त माझा”. पण विश्वाला वाटतं “तू आमचा”.
आणि रखुमाई रुसून गेली. तेव्हापासून आजतागायत अठ्ठावीस युगे झाली. आजही आषाढी एकादशीच्या दिवशी पुजारी गाभाऱ्यात उभा राहून म्हणतो, “येग येग रखुमाई”.
विचार करा. साक्षात परमेश्वर 28 युगांपासून बायकोची वाट पाहतोय. यापेक्षा मोठी प्रेमाची व्याख्या काय असेल? आणि यापेक्षा मोठा धडा काय असेल की नात्यात गैरसमज झाला तर तो मिटवायला वेळ लागू शकतो. पण वाट पाहणं थांबवायचं नसतं.
आषाढीला लाखो वारकरी पंढरपूरला का येतात? कारण सगळे रखुमाईची मनधरणी करायला येतात.
“तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना” हे फक्त संतांचं वाक्य नाही. ते आपल्या घराचंही सत्य आहे. घरातली गृहिणी रुसली की घर चालत नाही. समाजातली माया रुसली की समाज चालत नाही.
वारीत चालणारा प्रत्येक वारकरी म्हणजे एक दूत आहे. जो विठ्ठलाला सांगतो, “आम्ही आलोय. तू एकटा नाहीस. आणि आम्ही रखुमाईलाही घेऊन येऊ”.
पायात फोड, अंगावर ऊन, तरीही मुखात नाम. हीच ती मनधरणी आहे. “ये रखुमाई, तुझ्याशिवाय त्याला करमत नाही”.
आपण एकादशीला काय करतो? फराळ करतो, उपास करतो. पण खरी एकादशी काय आहे?
एक + दश= दहा इंद्रियांना एक करणे. डोळे – फक्त विठ्ठलाला पाहणे.
कान – फक्त अभंग ऐकणे. जीभ – फक्त नाम घेणे. हात – फक्त सेवेसाठी. पाय – फक्त वारीसाठी.
रखुमाईने विठ्ठलाला जसं बांधून ठेवायचा प्रयत्न केला, तसाच आपण या दिवशी आपल्या मनाला बांधतो. कुठेही भटकू नको. फक्त पंढरीच्या दिशेने.
अठ्ठावीस युगे म्हणजे किती? आपल्या कल्पनेच्या पलीकडे. तरीही तो उभा आहे. का?
कारण प्रेमात वेळेचं गणित नसतं. आई मुलाची वाट पाहते तसं. शेतकरी पावसाची वाट पाहतो तसं. वारकरी आषाढीची वाट पाहतो तसं.
आषाढी एकादशी आपल्याला हेच शिकवते. आयुष्यात काही नाती अशी असतात ज्यांच्यासाठी आयुष्यभर वाट पाहावी लागते. काही चुका अशा असतात ज्या सुधारायला युगे जातात. पण प्रयत्न थांबवायचा नसतो. “येग येग” म्हणत राहायचं.
खरं सांगू? आपण सगळे कधी ना कधी रखुमाई होतो. “माझ्यासाठी वेळ दे” म्हणून रुसतो. आणि आपण सगळे कधी ना कधी विठ्ठलही होतो. “मला जावंच लागेल” म्हणून वचन मोडतो.
आषाढी एकादशी हा दोघांमधला पूल आहे. वारकरी त्या पुलावरून चालत जातात. टाळ वाजवत, गजर करत.
आज पंढरपूरच्या गर्दीत उभं राहून डोळे बंद करा. तुम्हाला दोन आवाज ऐकू येतील.
एक – “उद्याचा दिवस माझा” म्हणणारी रखुमाई.
दुसरा – “येग येग रखुमाई” म्हणणारा विठ्ठल.
आणि मधेच आपण. आपल्या रुसव्यांसह, आपल्या धावपळीसह.
म्हणूनच आषाढी एकादशी फक्त सण नाही. ती आरसा आहे. आपल्या नात्यांचा, आपल्या जबाबदाऱ्यांचा, आणि आपल्या वाट पाहण्याचा.
चला तर मग. या आषाढीला आपणही एक वचन घेऊ. कुणाची तरी मनधरणी करू. कुणासाठी तरी थांबू. आणि देवाला सांगू, “पांडुरंगा, तू एकटा नाहीस. आम्ही आहोत तुझ्यासोबत रखुमाईला मनवायला”.

प्रा.दिलीप आनंदराव जाधव, सांगली.
*राज्य कोषाध्यक्ष*
*कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.*



