
मुरूम, ता. उमरगा (प्रतिनिधी) :
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणणे आणि गतीशील प्रशासनाद्वारे योजना थेट घरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने उमरगा येथील आदर्श महाविद्यालय येथे बुधवारी (ता. २२) रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि महाआरोग्य शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वल्वाने करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांचे सहअध्यक्ष तथा संयोजक शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. राम सोलंकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
O आ. बसवराज पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या बळीराजासाठी मुख्यमंत्री पाणंद मुक्त योजनेच्या माध्यमातून सर्व रस्ते मजबुतीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून, मराठवाड्यात सर्वात जास्त पाणंद रस्त्यांची कामे आपल्या उमरगा तालुक्यात झाली आहेत.
आपला तालुका एक ‘मॉडेल तालुका’ म्हणून ओळखला जावा, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, जागतिक बँकेचे कर्ज आणून उमरगा येथे उभारलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कोरोना काळात झालेला फायदा अधोरेखित केला. तसेच, हे रुग्णालय २०० खाटांचे करून महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या शिबिरात लातूर, सोलापूर, धाराशिव आणि उमरगा येथील नामवंत व तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची तपासणी केली.
मोफत आरोग्य तपासणी व उपचार यामध्ये कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, तसेच कान, नाक, घसा यांसारख्या आजारांवरील ९,५८५ रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या महारक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ३५६ जणांच्या रक्त तपासणीत ३५ जणांना मधुमेह (शुगर) असल्याचे निष्पन्न झाले. १२० लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले. ५५ जणांचे छातीचे एक्सरे काढण्यात आले असून, त्यापैकी ७ जण टीबी संशयित आढळले. १० जणांची दिव्यांग तपासणी करून युडीआयडी कार्ड काढण्यात आले.
O कार्यक्रमाचे संयोजक शरण पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या दोन लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित ५ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभ वितरणाचे आदेश सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मानले. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.



