
*वारी -१५
महाराष्ट्राच्या संत परंपरेत जिथे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचा गाथा आहे, नामदेवांची कीर्तने आहेत, तिथेच एका स्त्रीच्या अश्रूंनी भिजले आणि भक्तीने उजळले अभंगही तितक्याच तेजाने तेवतात. ती आहे संत बहिणाबाई. तेरा व्या शतकातील मुक्ताई नंतर वारकरी परंपरेत स्त्री कवी म्हणून ज्या नावाचा सर्वात मोठा गौरव होतो ते नाव म्हणजे बहिणाबाई. त्यांचे जीवन म्हणजे दुःख, संघर्ष आणि त्यावर मात करणाऱ्या भक्तीचा ललित महाकाव्यच आहे.
संत बहिणाबाईंचा जन्म इ.स. १६२८ मध्ये झाला. जन्मस्थान आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील “देवगाव”. ही भूमी वारकरी संस्कृतीने नटलेली होती.
त्यांचे वडील आऊजी कुलकर्णी आणि आई जानकीबाई. घराणे देशस्थ ब्राह्मण कुलकर्णी घराणे. वडील गावचे कुलकर्णी असल्याने घरात वेद, पुराण, धर्मग्रंथांचे वातावरण होते. लहानपणापासूनच बहिणाबाईंना ऐकण्याची, टिपण्याची प्रचंड आवड होती. शाळेत जाण्याची संधी मुलींना त्या काळात नव्हती, पण घरातील कीर्तन, प्रवचन आणि आजी-आजोबांकडून ऐकलेल्या संतांच्या गोष्टी त्यांच्या मनावर कोरल्या गेल्या.
बालपणीच त्या अत्यंत भाविक आणि संवेदनशील होत्या. देवगावच्या शेतात, नदीकाठी खेळताना सुद्धा त्यांचे मन विठ्ठलाच्या नामात रमायचे. त्यांचा चेहरा आणि स्वभाव दोन्ही गोड होते. पण त्यांचे हे बालपण फार काळ टिकले नाही. नऊ वर्षे वयातच त्यांचे जीवन एका मोठ्या वळणावर आले.
इ.स. १६३७ साली अवघ्या नऊ वर्षांच्या बहिणाबाईंचा विवाह रत्नाकर पाटक या विद्वान ब्राह्मणाशी झाला. रत्नाकर पाटक हे विदुरा, म्हणजे विधुर होते. वयात खूप अंतर होते.
लग्नानंतर सासरी गेल्यावर बहिणाबाईंना संसाराचे खरे रूप दिसले. सासू-सासऱ्यांचा, नणंदांचा त्रास, सततची कामे आणि अपमान. पती रत्नाकर हे कडक स्वभावाचे आणि शास्त्राचे कट्टर अभिमानी होते. स्त्रीने शिकू नये, अभंग लिहू नयेत असे त्यांचे मत होते.
या अत्याचाराला कंटाळून बहिणाबाईंना पतीसोबत महाराष्ट्रभर भटकावे लागले. पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर अशी अनेक तीर्थस्थळे त्यांनी पायी पालथी घातली. या भटकंतीत त्यांना उपास, अपमान आणि एकाकीपणा सहन करावा लागला. पण याच काळात त्यांच्या मनातील भक्तीची ज्योत अधिक धगधगली.
त्यांचे “आत्मनिवेदन” नावाचे आत्मचरित्रात्मक अभंग याच काळातील आहेत. त्यात त्यांनी आपल्या वेदना, सासरचा त्रास आणि मनातील तळमळ अगदी स्पष्ट शब्दात मांडली आहे:
“सासू सासरा नणंदा। माझे मारीती धोंड॥”
पण या दुःखातही त्यांनी कधीही देवाला दोष दिला नाही. उलट “हेचि माझे प्रारब्ध” म्हणून स्वीकारले.
बहिणाबाईंच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे संत तुकाराम महाराजांचे शिष्यत्व.
ही गोष्ट कोल्हापूर येथे घडली. त्या काळात जयराम स्वामी नावाचे कीर्तनकार कोल्हापुरात आले होते. त्यांच्या मुखातून बहिणाबाईंनी पहिल्यांदा तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले. “देव तेथेच आहे जिथे तुका आहे” हे ऐकताच बहिणाबाईंचे मन पाघळले. त्यांना तुकोबा प्रत्यक्ष भेटावेसे वाटू लागले.
योगायोगाने संत तुकाराम महाराज देहूवरून पंढरपूरला जाताना कोल्हापुरात आले. बहिणाबाईंनी त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांनाच गुरू मानले. तुकोबांनीही तिच्या भक्तीची परीक्षा घेतली. “अभंग लिहू नकोस, संसार कर” असे सांगितले. पण बहिणाबाईंची तळमळ पाहून तुकोबांनी तिला अनुग्रह दिला आणि “तू माझी लेक आहेस” असे म्हणून आशीर्वाद दिला.
तुकाराम महाराजांकडून मिळालेल्या या अनुग्रहानंतर बहिणाबाईंचे पूर्ण जीवन बदलले. पती रत्नाकर पाटक यांनाही सुरुवातीला विरोध होता. पण बहिणाबाईंची निष्ठा आणि तुकोबांच्या कृपेमुळे पुढे त्यांनाही भक्तीमार्ग स्वीकारावा लागला.
तुकोबांच्या मृत्यूनंतर बहिणाबाई अधिकच एकलव्य झाल्या. त्यांनी तुकोबांनाच आपले सर्वस्व मानले. त्यांचा प्रसिद्ध अभंग याची साक्ष देतो.
“ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस॥”
या एका ओळीत त्यांनी संपूर्ण वारकरी परंपरेचा गौरव केला आहे.
बहिणाबाई या कवयित्री होत्या, पण त्या कागद-पेन्सिल घेऊन बसून काव्य करत नव्हत्या. त्यांचे अभंग हे त्यांच्या जगण्यातून आपोआप ओसंडून वाहत होते. म्हणूनच त्यांच्या अभंगांना “आत्मनिवेदन” असे म्हणतात.
स्वानुभवाची प्रामाणिकता, कोणताही दिखावा नाही. सासरचा त्रास, उपासमार, पतीचा राग, समाजाची टिंगल हे सगळे त्यांनी जसे आहे तसे लिहिले.
“दळण कांडण करिते। तरी मज म्हणती निंद्य॥”
पंडिती संस्कृत नव्हे, तर शेतकरी, वारकरी बोलतो तीच भाषा. त्यामुळे त्यांचे अभंग सामान्य माणसापर्यंत पोहोचले.
भक्ती आणि वैराग्याचा संगम,एकीकडे विठ्ठलावरची ओढ, दुसरीकडे संसाराचा वीट. दोन्हीचा सुंदर मेळ त्यांच्या अभंगात आहे.
गुरु तुकाराम महाराजांवरील त्यांची निष्ठा अढळ होती. प्रत्येक अभंगाच्या शेवटी त्या “बहिणी म्हणे” किंवा “तुका म्हणे” अशी सही करायच्या.
त्यांच्या नावावर सुमारे ६७५ ते ७०० अभंग उपलब्ध आहेत. यात “आत्मनिवेदन”, “गाथा” आणि विविध प्रसंगी लिहिलेले अभंग आहेत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीला ज्ञानदेवांनी पाया रचला आणि तुकारामांनी कळस चढवला, हे सांगणारा त्यांचा खालील अभंग आजही प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडी आहे,
संत कृपा झाली। इमारत फळा आली॥
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया॥
नामा तयाचा किंकर। तेणे विस्तारीले वार॥ जनी जनार्दन एकनाथ। स्नान दिला भागवत॥
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश॥
बहिणी म्हणे दृष्टी घ्या। तेणे रूप केले ओजा॥
बहिणाबाईंचे कार्य केवळ अभंग लिहिण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे कार्य बहुआयामी होते.
१७ व्या शतकात जेव्हा स्त्रियांना शिक्षणाला, लेखनाला बंदी होती, तेव्हा बहिणाबाईंनी लेखणी हात घेतली. त्या पहिल्या स्त्री कवींपैकी एक आहेत ज्यांनी आपले आत्मचरित्र अभंगातून लिहिले. त्यांनी दाखवून दिले की भक्तीला आणि ज्ञानाला लिंग नसते.
वारकरी धर्माचा प्रसाराबरोबर त्या गावोगावी जाऊन कीर्तन करायच्या. त्यांच्या अभंगातून त्यांनी वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान, “नामसंकीर्तन”, “संतसंगती” आणि “समदृष्टी” यांचा प्रचार केला.
सामाजिक समतेचा संदेश त्या देतात, “जात पात नको विचारू, भजनी लागा”. त्यांनी दाखवून दिले की खरा धर्म माणुसकीचा आहे.
दुःखावर मात करण्याचा आदर्श, त्यांचे जीवन हे लाखो स्त्रियांसाठी प्रेरणा आहे. संसारात राहूनही, त्रास सहन करूनही भक्ती कशी टिकवता येते याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
आपले संपूर्ण आयुष्य भक्तीत आणि लेखनात घालवल्यानंतर इ.स. १७००मध्ये, शके १६२० मध्ये संत बहिणाबाईंनी जळगाव जिल्ह्यातील “शिरूर” या गावी समाधी घेतली. आजही शिरूर येथे त्यांची समाधी आहे आणि दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते.
संत बहिणाबाई म्हणजे केवळ एक कवी नव्हत्या. त्या एक योद्धा होत्या. ज्या समाजाने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच समाजाला त्यांनी आपल्या अभंगांनी जागे केले.
त्यांचे जीवन आपल्याला संघर्षातही भक्ती टिकवता येते.शिक्षण आणि अभिव्यक्तीचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.गुरूवरील निष्ठा माणसाला उंचीवर नेते हे शिकवते.
“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” ही ओळ म्हणताना आजही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. कारण त्या ओळीच्या मागे एका स्त्रीचे संपूर्ण आयुष्य, त्याग आणि भक्ती उभी आहे.
*प्रा. दिलीप आनंदराव जाधव,सांगली.*
*राज्य कोषाध्यक्ष*
*कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य* .
*सचिव*
*सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली.*



