सांजीरबा महाराचा पराक्रम नेर्ले गावच्या जोगण्या-भावई उत्सवास ठरले योगदान

जोगण्या म्हणजे सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक..!जुन्या काळात गावात येणारी अरिष्टे, आजारपण किंवा दुष्काळ यांपासून गावाचे रक्षण व्हावे, म्हणून देवाला घालण्याची ही प्रथा आहे. ठराविक समाजातील लोकांची विशिष्ट वेशभूषा करून त्यांची विधिवत पूजा करून मानाने गावातून मिरवणूक काढली जाते गावातील वाईट शक्ती, रोगराई नष्ट व्हावी आणि गाव सुखी-समृद्ध व्हावे, हा यामागचा पारंपरिक उद्देश असतो.
साधारणतः २०० वर्षांपूर्वी नेर्ले गावात जोगण्या- भावई उत्सव सुरू झाला.
नेर्ले गावातील बौद्ध समाजातील *सांजरीबा* नामक महान शूरवीर, असामान्य व्यक्तीने सव्वा लाखी आष्टे ता वाळवा येथील जोगण्याउत्सव चालू असताना , *सोन्याची वाटी* पळऊन आणली ती आणताना आष्ट्यातील लोकांनी पाठलाग सुरु केला परंतु ती वाटी घेवून साखराळे गावच्या माळाने पुढे येवून सध्याच्या एमआयडीसी – परिसराच्या माळाने नेर्ले हद्दीत भिरकावून दिली. वाटी नेर्ले हद्दीत पडली पण वाटी घेवून येणारा बौद्ध समाजातील सांजरीबा मात्र त्या माळावर मारला गेला. कालांतराने महारकी शेती परिसरात शेतात काम करणाऱ्या लोकांनी ती वाटी *कै.दत्तात्रय रामचंद्र पाटील* तथा डी आर पाटील यांच्याकडे सोपविली. इथे ही गोष्ट थांबली नाही.तर महारकी परिसरात आषाढ महिन्याच्या अमावस्येला घुमन्याचा सतत आवाज ऐकू येऊ लागला.त्या विषयी ज्योतिषी विचारणा केली असता ,जोगण्या काढावयास पाहिजे असे सांगण्यात आले. तेव्हापासून नेर्ले गावात जोगण्या उत्सव चालू झाला.
अनेक वर्षे कै.दत्तात्रय पाटील यांच्या घराला जोगण्या काढण्याचा मान होता. कालांतराने तत्कालीन आर्थिक परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे त्यांच्यातीलच थोरले घर म्हणजे *कै.महादेव विष्णू नांगरे-पाटील* यांच्याकडे जोगण्या उत्सव सोपविण्यात आला. ते आजतागायत आहे. *सन १९८७ साली हा उत्सव आर्थिक व इतर कारणामुळे बंद पडला होता त्यानंतर १९९३ ला हा उत्सव पुन्हा सुरू झाला*
तालुक्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नेर्ले गावाची परंपरा असलेला बारा अलुतेदार-बलुतेदारांचा पारंपरिक ‘जोगण्या उत्सव हा सण आहे.नेर्ले परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जोगण्या उत्सवाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या उत्सवाच्या निमित्ताने गावाची एकजूट आणि सांस्कृतिक वैभव पाहायला मिळते.
ओटी वाटपाच्या कार्यक्रमानंतर या उत्सवामध्ये *दिवा पूजनाने* सुरुवात होते. कुंभार समाजाचा हा मान आहे .नांगरे वाड्यात कणकेचा दिवा करून त्याचे जंगम यांच्या हस्ते पूजन करून तो वाजत गाजत मारुती मंदिरात नेला जातो, दिवा नेत असताना ठराविक समाजाला शिव्या देण्याची आख्यायिका आहे. मागील वर्षीचा दिवा ज्या खड्ड्यात पूरला आहे तो खड्डा उकरून काढला जातो त्या खड्ड्यात गाढवे(कीटक), फुलपाखरू, बेडूक यासारखे कीटक अथवा प्राणी निघतात त्यावरून पुढील काळातील पावसाचा अंदाज बांधला जातो अशी आख्यायिका आहे.
दुसऱ्या दिवशी दैत्य म्हणजे *”पिसे”* हा खेळ प्रकार असतो.त्याचा मान नाभिक समाजाला आहे.यात *फिरते पिसे* आणि *जोगा पिसे* असे दोन प्रकार आहेत..हे मारूती मंदिरात वेष धारण करतात हे पिसे कमरेला लिंबाचा पाला बांधून प्रत्येक घरात जाऊन,उंबऱ्यावर पाला आपटून सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात आणि तेथील ठेवलेले नारळ ,गूळ खोबरे,दक्षिणा घेतात.
पूर्वी *१.ब्राम्हण-पाटील ,२.कुंभार-परीट व ३.नाभिक -चर्मकार समाजातील जोगा-जोगी जोडी होती*. कालांतराने ब्राम्हण आणि पाटील यांनी हा मान सुतार आणि गुरव यांना दिला.
मानाच्या नांगरे वाड्यात ३ जोडयांपैकी सुतार आणि गुरव या जोगण्या जोडीचे जंगम यांच्याकडून सर्वांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न होतो. या सोहळ्यात कुरावला म्हणून *मस्कर आणि वाघ* समाजाला मान आहे.पूर्वी जोगा-जोगीची अशी वेगळी वेशभूषा नव्हती. परंतु आज त्यामध्ये अमुलाग्र बदल झाला असून जोगा-जोगी सजवण्याचे काम कासेगाव(ता वाळवा)येथील *राजाभाऊ रणदिवे* करतात. त्यानंतर प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक जोगा किंवा जोगी ताशाच्या गजरात नांगरे वाड्यात आणण्यात येतात. त्याचा मान *तालीम मुल्ला* यांच्याकडे वर्षानुवर्षे आहे
या तिन्ही जोड्यांची गावातून समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढली जाते. आणि यात *” आहोरीच्या महोरीच्या ,कोल्हापूरीच्या सदा जोगण्या, सदा मिळाव्या उदं म्हणा उदं”* अशा घोषणा दिल्या जातात. जोगण्याभोवती शस्त्रधारी लोक असतात जेणेकरून जोगण्यांच्या हातातील वाटी कोणी पळूवून नेऊ नये. जोगण्या हे भगवान शिव व माता पार्वती यांचे प्रतीक आहे .त्यांच्या पायाला लावलेला काळा दोरा हातात किव्हा गळ्यात बांधला जातो.
आया-बाया आपली लहान मुले जोगण्यांच्या पायांवर घालतात. मिरवणुकीमध्ये *लिंबवड टाकण्याचा मान कदम भाऊपण्याला आहे*. तसेच मिरवणूक मार्ग असलेल्या प्रत्येक चौकामध्ये *नारळ फोडण्याचा मान महाजन बांधवांना आहे*. मानकरी काठीने लिंबू फोडतात गावातील पूर्ण वेडा झाल्यानंतर घुमट परिसरामध्ये असलेल्या मरीमी मंदिरामध्ये नाभिक-चर्मकार, कुंभार -परीट या जोडप्यांचा विधिवत विवाह संपन्न होतो.
त्यानंतर मुख्य आकर्षण म्हणजे बौद्ध समाजामध्ये *थळ* नावाचं एक ऐतिहासिक ठिकाण आहे.जोगण्या फिरून येईपर्यंत बौद्ध समाज बांधव या थळांमध्ये दिवा लावून,त्याच्यावर घोंगडे पांघरून घेऊन बसलेले असतात. हा दिवा विजून द्यायचा नसतो. विझला तर तेथे रक्त सांडावे लागते अशी आख्यायिका आहे. हा ऐतिहासिक मान दिवंगत *आनंदा तायाप्पा बंदसोडे* यांच्या घराला पूर्वीपासून आहे. या थळाला ते तोरण बांधून सजवत असतात. जोगण्याची पूजा करून ओटी भरतात. सर्व विधी झाल्यानंतर सुतार समाजाचा जोगा तलवारीने तोरण तोडतो आणि सर्व जोगण्या पुन्हा नांगरे वाड्याकडे मार्गस्थ होतात. नांगरे वाड्यात आल्यानंतर सर्व जोगण्यांचे पाय धुवून विधीवत पूजा केली जाते,ओटी भरली जाते तसेच आरती केली जाते यानंतर सन्मानानं त्यांना आपापल्या घरी सोडण्यात येते.
दुसऱ्या दिवशी खेळणी तमाशा इत्यादी करमणुकीची साधने नेर्ले गावचे मनोरंजन करतात. पूर्वी चा *यशवंत गोंधळी- काळमवाडी व काळू-बाळूच्या लोकनाट्य तमाशाने* नेर्ले गावचे वर्षानुवर्षे मनोरंजन केले.नेर्ले गावातील साळुंखे-पाटील भाऊपणा अलूतेदार-बलुतेदार मिळून हा उत्सव मोठ्या एकजुटीने साजरा करत असतात.असा हा नेर्ले गावची माहिती सांगणारा सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव असणारा व एकात्मतेचा संदेश देणारा जोगण्या उत्सव अबाधित राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना..!!संदर्भ :- नांगरे वाडा,भावकी व नेर्ले ग्रामस्थ
क्राईम पत्रकार बापूसाहेब कांबळे, नेर्ले



