मुरूम-बोरगाव शेत रस्ता बनला मृत्यूचा सापळा; इंगोले तांडा वस्तीतील शेतकऱ्यांचे हाल

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘पाणंद रस्ते मुक्त’ मोहिमेचा फज्जा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
प्रा. डॉ. महेश मोटे
मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) :
एकीकडे आधुनिक शेतीचे स्वप्न पाहिले जात असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी मानले जाणारे शेत रस्ते मात्र दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहेत. मुरूम ते बोरगाव (ग्रा. मा. ३२) दरम्यानचा रस्ता आणि अंबर नगर तांड्यापासून इंगोले तांड्याकडे जाणारा चार किलोमीटरचा पाणंद रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय झाला असून, हा रस्ता आता शेतकऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
मुरूम ते बोरगाव या जुन्या शेत रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि गुडघाभर चिखलामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आपला तयार शेतीमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचवू शकत नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकदा चिखलात ट्रॅक्टर अडकल्याने मजुरी आणि वेळेचा खर्चही वाढला आहे. काही ठिकाणी तर रस्ता आणि शेत यांची सरमिसळ झाल्याने रस्ता शोधणे कठीण झाले आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वात मोठा फटका इंगोले तांडा वस्तीवरील रहिवाशांना बसत आहे. पावसाळ्यात रुग्णवाहिका तर सोडा, पण साध्या दुचाकीही नेणे अशक्य झाले आहे. यामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे किंवा प्रसूतीसाठी महिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे हे एक मोठे आव्हान ठरत आहे. या परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.आम्ही दरवर्षी पेरणीपूर्वी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रस्त्यांची डागडुजी करतो, मात्र पावसाच्या पहिल्या फटक्यात सर्व प्रयत्न पाण्यात जातात, अशी व्यथा शेतकरी प्रकाश इंगोले (मुरूम) यांनी मांडली.पाणंद रस्ते मुक्त करण्याच्या शासनाच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी राम ढंगापुरे (इंगोले तांडा) यांनी व्यक्त केली.स्थानिक शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या मार्गाचे तातडीने मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास इंगोले तांडा वस्तीतील रहिवासी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा श्रीधर इंगळे (मुरूम) यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. इंगोले तांडा, ता. उमरगा येथील शेत रस्त्याची अवस्था….
पावसाने रस्त्याची केली दुर्दशा: पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चिखलात रूपांतर झाले असून, नागरिकांना ये-जा करताना जीवघेण्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची दैनावस्था: नागरिकांचे हाल कायम: दुरुस्तीअभावी रस्त्याची झालेली दुरवस्था पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली असून, पादचाऱ्यांना चिखलातून वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.



