ताज्या घडामोडी

नाशिकचा डंका! १४ वर्षांनंतर लाभला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा बहुमान

थरार रंगणार जिजामाता तलावावर!
७०० हून अधिक जलतरणपटूंची लागणार प्रतिष्ठा
राष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट भुवनेश्वर आणि जयपूरचे तिकीट होणार निश्चित!
पाण्यावर रंगणार तारुण्याचा धगधगता थरार!

नाशिक: नाशिककरांनो, श्वास रोखून धरा! तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकच्या भूमीला जलतरणाचा एक अथांग आणि थरारक इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना आणि नाशिक जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण वयोगट स्पर्धा नाशिकमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १८ ते २० जुलै दरम्यान नाशिकरोड येथील जिजामाता आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे हा पाण्यावरचा महासंग्राम रंगणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे जलतरणपटू जेव्हा या तलावात झेप घेतील, तेव्हा पाण्याचा प्रत्येक थेंब त्यांच्या शिस्तीची, वेगाची आणि जिद्दीची साक्ष देईल!

डिजिटल क्रांती: थेट प्रक्षेपण आणि हायटेक अचूकता!
या वेळची स्पर्धा केवळ सामान्य स्पर्धा नसेल, तर ती तंत्रज्ञानाचा एक अद्भूत नजराणा असेल. स्पर्धेचे क्षण अन् क्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर, वेळेची अचूकता मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टच पॅड आणि निकालांची क्षणाक्षणाची माहिती देण्यासाठी एलईडी स्क्रीनची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच, प्रेक्षकांना प्रत्येक सेकंदा सेकंदाचा थरार घरबसल्या आणि मैदानात थेट अनुभवता येईल. या हायटेक सुविधेमुळे स्पर्धेची भव्यता आंतरराष्ट्रीय पातळीची होणार यात शंका नाही.

महामुकाबलयात २७ जिल्हे आणि शेकडो जलतरणपटूंचे रणशिंग!
या जलतरण महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास २७ जिल्ह्यांमधून जवळ जवळ ७०० अव्वल दर्जाचे खेळाडू आपली ताकद पणाला लावणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वोत्तम जलतरणपटू नाशिकच्या या आंतरराष्ट्रीय तलावात प्रतीस्पर्ध्यांसाठी दोन हात करतील. सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर अशा दोन प्रमुख गटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून, देशात महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या भावी ऑलिम्पियन्सचा शोध घेणारे एक महाव्यासपीठ ठरणार आहे.

१४ वर्षांनंतर स्विमिंग फेडरेश ऑफ इंडियाने मान्यता दिल्या नंतर पुन्हा ऐतिहासिक आयोजन
महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशनचे सचिव श्री. राजू पालकर यांनी सांगितले की, १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्विमिंग फेडरेश ऑफ इंडियाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशनच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा आयोजित होत असल्याचा विशेष अभिमान आहे. त्यांच्या मते, ही स्पर्धा केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर पालक आणि प्रशिक्षकांनाही उच्चस्तरीय स्पर्धांचे स्वरूप, नियम आणि स्पर्धात्मक वातावरण जवळून अनुभवण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणार आहे.

लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धा: भुवनेश्वर आणि जयपूरचे तिकीट!
नाशिकच्या या रणधुमाळीत जीवाची बाजी लावून जे जलतरणपटू बाजी मारतील, त्यांच्यासाठी थेट राष्ट्रीय पातळीचे दरवाजे उघडणार आहेत. या स्पर्धेतून निवड झालेले ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत जलतरणपटू भुवनेश्वर, ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तर दुसरीकडे, सब-ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत चमकणारे सितारे जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज होतील. म्हणजेच, देशाच्या नकाशावर चमकण्यासाठी खेळाडूंना नाशिकच्या पाण्यात आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावीच लागेल. या राष्ट्रीय स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे भविष्यातील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळविण्याचा मार्गही खुला होणार आहे.

सुपर संडे आणि नोंदणीचा काउंटडाउन!
या महाकुंभाची अधिकृत सुरुवात शनिवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याने होईल. मात्र, त्यापूर्वीच म्हणजेच दिनांक १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता सर्व स्पर्धकांची उपस्थिती आणि नोंदणी तरणतलावावर केली जाणार आहे. नाशिक जिल्हा जलतरण संघटनेने १४ वर्षांनंतर मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसली असून, संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष आता नाशिकरोडच्या जिजामाता आंतरराष्ट्रीय तलावाकडे लागले आहे!

सुरक्षितता, शिस्त आणि उत्कृष्ट नियोजनावर भर
स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशन (MAA) यांच्या वतीने करण्यात येत असून, लाइफसेव्हिंग मुंबई ही संस्था सुरक्षा भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. दररोज सकाळी ८.०० वाजता स्पर्धांना प्रारंभ होईल. प्रत्येक दिवसाच्या अखेरीस विजेत्या खेळाडूंना पदके आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असून, स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??