सहकार्य, सेवा आणि नेतृत्वाच्या त्रिसूत्रीवर लायन्स क्लब ऑफ आगाशीची नवी वाटचाल उज्वला पुरकर यांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. २८
“सहकार्य, सेवा आणि नेतृत्व” या त्रिसूत्रीचा अवलंब करत लायन्स क्लब ऑफ आगाशीच्या माध्यमातून वर्षभर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि समाजोपयोगी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास लायन्स क्लब ऑफ आगाशीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा उज्वला पुरकर यांनी व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ आगाशीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या पदाधिकारी पदग्रहण समारंभाचे आयोजन नुकतेच केळवे येथील ‘ या निवांत रिसॉर्ट’ येथे उत्साहात पार पडले. यावेळी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना उज्वला पुरकर यांनी आगामी वर्षातील विविध सेवा उपक्रमांची रूपरेषा पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. याच कार्यक्रमात लिओ क्लब ऑफ आगाशीच्या अध्यक्षपदाची धुरा लिओ दैविक घरत यांनी स्वीकारली.
पीएमसीसी लायन चंद्रशेखर घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विकास सराफ, रिजन चेअरपर्सन ॲड. उन्नती धुरंदर, सचिन गांधी, प्रमोद पाटील, हनुमंत भोसले, श्रद्धा मोरे, नीलिमा पाठक, अंकित सावे, नितीन पूरकर यांच्यासह डिस्ट्रिक्टमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर घाग यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली, तर विकास सराफ यांनी नव्याने क्लबमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना लायनिझमचे महत्त्व सांगून सदस्यत्वाची शपथ दिली.
कार्यक्रमात मावळते अध्यक्ष डेनिस रोड्रिक्स यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा तसेच दोन एमजेएफ (MJF) सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
“महाराष्ट्राची लोकधारा” या आकर्षक संकल्पनेवर आधारित पदग्रहण समारंभात नव्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेत आणि लोकनृत्याच्या तालावर केलेली रंगतदार एन्ट्री ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.



