ताज्या घडामोडी

पालघर जिल्हा प्रतिनिधी :

सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ वाडाच्या अध्यक्षपदी अलमान येथील युवा उद्योजक निलेश मोकाशी यांची निवड झाली असून त्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला रोटरी परिवारातील सदस्यांसह सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन दुवा उपस्थित होते. याशिवाय असिस्टंट गव्हर्नर जतीन गोहिल, दिलीप मुळे, हेमांग गरोडिया, अजित दुबे, मिलिंद उलकंदे, भगवान पाटील, अमित पाटील, रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष भूषण सावे, रोटरी क्लब ऑफ उमरोळीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन प्रमोद पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक, शिक्षक, शेतकरी प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नव्याने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर निलेश मोकाशी यांनी आगामी वर्षासाठीच्या आपल्या कार्ययोजनेची माहिती देताना समाजोपयोगी आणि ग्रामीण विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागात आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल असून कृषी यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी प्रशिक्षित व कुशल कारागिरांची कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही समस्या लक्षात घेऊन गावागावांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देऊन कुशल ट्रॅक्टर मेकॅनिक आणि तंत्रज्ञ निर्माण करण्यासाठी विशेष कौशल्य विकास उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनालाही आपल्या कार्यकाळात विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मोकाशी यांनी स्पष्ट केले. वाढते तापमान, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असंतुलन रोखण्यासाठी ‘सीड बॉल’ अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील डोंगराळ आणि वनक्षेत्रात सीड बॉल टाकून नैसर्गिकरीत्या वृक्षसंवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, करिअर मार्गदर्शन, संवाद कौशल्य आणि सामाजिक जबाबदारी याविषयी विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब सक्रिय भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समारंभादरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचा शपथविधी पार पडला. यामध्ये निलेश मोकाशी यांनी अध्यक्षपदाची, तर मंदार पष्टे यांनी सचिवपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह विविध पदाधिकारी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सदस्यांनीही आपल्या पदाची शपथ घेत रोटरीच्या सेवाभावी कार्याला वाहून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोटरी क्लब ऑफ वाडामध्ये पाच नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. नव्या सदस्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यामुळे क्लबची ताकद आणि सामाजिक कार्याचा विस्तार अधिक व्यापक होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात रोटरीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामध्ये प्रामुख्याने कर्करोग रुग्णांना मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देताना समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्य, पारदर्शकता आणि लोकसहभाग यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी वर्षभर केलेल्या कामाचे सादरीकरण केले. रोटरी क्लब ऑफ वाडा चे संस्थापक अध्यक्ष ठाकरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्यामुळे रोटरी क्लब ऑफ वाडाच्या आगामी वाटचालीबाबत आशावाद निर्माण झाला असून नव्या नेतृत्वाखाली क्लब समाजहिताचे अनेक प्रभावी उपक्रम राबवेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??