ताज्या घडामोडी

आधुनिक युगातील शिक्षण व्यवस्थेचे बदलते स्वरूप

प्रस्तावना( मनिलाल शिंपी)

बदलत्या काळाबरोबर शिक्षणाचे संदर्भ आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयांची केवळ माहिती देणे नव्हे, तर तो स्वतः शिकण्यास समर्थ होईल अशी विविध कौशल्ये त्याच्यामध्ये विकसित करणे होय. आजच्या विद्यार्थ्याला आणि भावी काळात देशाची राजकीय, सामाजिक व आर्थिक सुव्यवस्था राखण्यात प्रभावी भूमिका बजावायची आहे. त्यासाठी त्याला योग्य प्रकारचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
एक व्यक्ती म्हणून आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये खंबीरपणा निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर आत्मसन्मानाने जीवन कसे जगावे, हेही त्याने शिकले पाहिजे. केवळ पदवी मिळवून नोकरी प्राप्त करणे आणि आर्थिक स्थैर्य मिळविणे एवढेच शिक्षणाचे उद्दिष्ट नसावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच सद्गुण, संस्कार आणि सत्प्रवृत्तींचाही विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करायला हवा.
*मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज*
लोकशाही व्यवस्थेबद्दल प्रेम, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण, समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव यांसारख्या मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांच्या मनात झाली तर त्यांचे संवर्धन होऊ शकते. विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात.
*तंत्रज्ञान आणि शिक्षण*
आज संगणक, इंटरनेट, विश्वकोश, माहितीकोश आणि विविध डिजिटल माध्यमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे शिक्षकांनीही सातत्याने अद्ययावत ज्ञान संपादन करणे आवश्यक झाले आहे. नृत्य, नाट्य, संगीत, चर्चासत्रे, परिसंवाद अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो.
*शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट*
शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण व सर्वांगीण विकास. ज्ञानविकास, बौद्धिक विकास, भावनांचे उदात्तीकरण, कलात्मकतेचे संवर्धन, कार्यकुशलता, उत्पादनक्षमता आणि उदरनिर्वाहाची पात्रता या सर्व बाबी शिक्षणामध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे.
*पालकांचा सहभाग*
पूर्वी शिक्षण प्रक्रियेत मुख्यतः शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांचाच समावेश होत असे. परंतु आज पालकांचाही सहभाग महत्त्वाचा मानला जातो. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून शाळेच्या विकासात पालकांचे योगदान वाढले आहे.
*नवीन अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास*
नवीन अभ्यासक्रमात प्रकल्प, तोंडी परीक्षा, सादरीकरणे अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, भाषिक कौशल्यांचा विकास होतो आणि भविष्यातील मुलाखतींसाठी ते सक्षम बनतात.
*भविष्यातील आव्हाने*
शाळांना भविष्यात अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. शैक्षणिक सुविधा, ग्रंथालये, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, नृत्य, नाट्य, संगीत यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे.
*पालक-शिक्षक संघाकडून अपेक्षा*
शाळेची सजावट, वृक्षारोपण, रॅली, विशेष दिनांचे आयोजन, शाळेच्या विकासासाठी निधी उभारणी अशा विविध उपक्रमांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
*निष्कर्ष*
शिक्षण आनंददायी आणि प्रभावी करायचे असेल तर पारंपरिक पद्धतींसोबत नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही अवलंब करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, प्रयोग, निरीक्षण आणि अनुभव यांद्वारे शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. आज शिक्षणाचे व्यापारीकरण वाढत असताना गुणवत्ता टिकविणे हे मोठे आव्हान आहे.
पालक आणि शिक्षक यांची मानसिकता सकारात्मक बदलली, विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाला समान महत्त्व दिले, तरच शिक्षण खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचे साधन ठरेल. म्हणून प्रत्येकाने आजच्या शिक्षण व्यवस्थेचे चिंतन करून तिच्या चांगल्या बाजू आत्मसात कराव्यात आणि काळानुसार बदल स्वीकारावेत.
*— सौ. संगीता नंदलाल पवार*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??